ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यावर २५ जानेवारी १९८७ रोजी दूरदर्शनवर आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’ची आठवण देशभरात केली गेली. भारतीय जनमानसात वसलेल्या रामाला प्रत्यक्ष पडद्यावर आणण्याचे काम रामानंद सागर यांनी केले. त्यांच्या रामाच्या प्रतिमेला देशाने या पद्धतीने स्वीकारले की आज ३६ वर्षांनंतर ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ सिनेमातील राम, सीता, हनुमान, रावण या पात्रांना लोक स्वीकारायला तयार नाहीत. त्या ‘रामायण’ नावाचा इतिहास उलगडून सांगताहेत रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेम सागर...
कोविडकाळात अचानक एके दिवशी प्रेम सागर यांना तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा फोन आला. कोविडकाळात सरकारला सकारात्मकता म्हणून रामायण दूरदर्शनवर दाखवायचे आहे. तुम्ही किती पैसे घेणार? प्रेम सागर म्हणाले, जगात सर्वकाही पैशासाठी नसतं. हे काम देशधर्माचे आहे. यासाठी कुठलाही मोबदला नको. जावडेकर यांचा विश्वास बसला नाही. ३३ वर्षांनंतर रामायण पुन्हा दूरदर्शवर प्रसारित होणार होते.
तीन दशकांत जग आणि टेलिव्हिजन तंत्रज्ञान बदललं आहे. त्यामुळे लोक त्याच उत्कंठेने बघतील का, ही आंशका प्रेम सागर यांना होती; मात्र रामायणाची लोकप्रियता अबाधित राहिली. सर्वाधिक गाजलेली वेबसीरिज गेम ऑफ थ्रोनची दर्शकसंख्या होती दोन कोटी, तर पुन्हा प्रसारित झालेल्या रामायणची दर्शकसंख्या आठ कोटी. कम्प्युटर ग्राफिक्स नाही, स्पेशल इफेक्ट नाही, तरीही आजच्या पिढीने रामानंद सागर यांचे रामायण स्वीकारले.
रामायणचे रामायण
रामानंद सागर हे बॉलीवूडचे गाजलेले निर्माते, दिग्दर्शक होते. १९६१ ते १९७० च्या काळात त्यांनी सलग सिल्व्हर ज्युबिली सिनेमांच्या पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्माता म्हणून काम केले होते. नटराज नावाचा प्रसिद्ध स्टुडिओ त्यांचा होता. बॉलीवूडचा एवढ्या मोठ्या दिग्ददर्शकाला छोट्या पडद्यावर येण्याची गरज का भासली, असे प्रेम सागर यांना विचारले. ते म्हणाले, ‘रामायण’ हे रामानंद सागर यांच्या हातून घडायचे होते, त्यामुळे हे सर्व जुळून आले.
१९७६ मध्ये हेमामालिनी-धर्मेंद्र यांच्या एका सिनेमाचे चित्रीकरण स्वित्झरलँडच्या आल्प्स पर्वतरांगेत सुरू होते. आल्पच्या एका कॅफेमध्ये रामानंद सागर, सुभाष, आनंद आणि प्रेम सागर बसले होते. गोठवणाऱ्या थंडीत काम करून सर्व सागर कुटुंब आणि युनिट थकले होते.
रामानंद सागर यांनी रेड वाईन मागवली. वाईन टेबलवर आल्यानंतर वेटरने भिंतीवरचा लाकडाचा ठोकळा उघडला. त्यातील टीव्ही सुरू केला. रामानंद सागर हे पाहून थक्क झाले. ते म्हणाले प्रोजेक्टर किंवा व्हीसीआर कुठे आहे. त्या वेटरने सांगितले हा कलर टीव्ही आहे.
कलर टीव्ही बघताच रामानंद सागर यांनी टेबलावरच थेट घोषणा केली की, मी आता सिनेमा सोडतो आहे. यानंतर केवळ टेलिव्हिजन करणार आहे. त्यावर मी मर्यादा पुरुषोत्तम राम घेऊन येणार. तेव्हा भारतात रंगीत टीव्ही आला नव्हता. रामानंद सागर यांच्या बोलण्याला सागर कुटुंबाने आक्षेप घेतला; मात्र रामानंद सागर यांनी त्याच वेळी टेलिव्हिजनचे भविष्य ओळखले होते.
मालिका निर्मितीची रंगीत तालीम
सर्वत्र विरोध असताना रामानंद सागर यांनी रामायण काढायचे निश्चित केले. त्या वेळी दूरदर्शनमध्ये खासगी निर्मात्यासोबत मिळून काही मालिका आणण्याचे धोरण तयार झाले होते; मात्र त्यापूर्वी टीव्हीवर एक प्रयोग करणे गरजेचे होते.
ती जबाबदारी रामानंद सागर यांनी त्यांचा मुलगा प्रेम सागर यांना दिली. प्रेम सागर यांनी ‘बेताल पच्चीसी’ या पुस्तकावर आधारित ‘विक्रम वेताळ’ ही मालिका सुरू करण्याचे ठरवले. कथानक घेऊन ते अनेक निर्मात्यांकडे गेले; मात्र सर्वांचे एकच मत होते आता पडद्यावर मुकुट आणि मूछ (मिशी) बिलकूल चालणार नाही.
पैसे लावण्यासाठी अनेकांनी नकार दिल्यानंतर शेवटी आर. एस. अग्रवाल यांची ‘इमामी’ नावाची कॉस्मेटिक कंपनी, जी त्यावेळी सुरू झाली, त्यांनी १ लाख रुपये मालिकेसाठी गुंतवण्याचे कबूल केले. सागर परिवारासाठी ‘विक्रम वेताळ’ ही ‘रामायण’साठी एकप्रकारे रंगीत तालीम होती.
‘विक्रम वेताळ’च्या यशावर रामायणाचे भविष्य अवलंबून होते. अखेरीस ‘विक्रम वेताळ’ टेलिव्हिजनवर आली. दूरदर्शनने दुपारी ४ वाजताचा स्लॉट दिला. खरे तर या वेळेत मुलं खेळत असतात. विक्रम वेताळच्या कथा लोकांनी ऐकल्या होत्या.
या कथा पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या माध्यमातून पहायला जिवंत झाल्या. या मालिकेच्या प्रत्येक भागात एक कथा होती. त्यातून बोध घेता यायचा. बघता बघता ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. विशेषतः लहान मुलामध्ये... स्पेशल इफेक्ट काय असतात ते या मालिकेने देशाला दाखवले. यातून ‘रामायणा’चा मार्ग सोपा झाला.
या मालिकेत अरुण गोविल (राम), सुनील लाहिरी (लक्ष्मण), दीपिका चिखलिया (सीता), रावण (त्रिवेदी), दारासिंग या सर्व कलाकांरानी काम केले होते. हे सर्व कलाकार रामायणसाठी शिफ्ट झाली.
भारलेले वातावरण
रामानंद सागर यांच्यासाठी ‘रामायण’ एक स्वप्न आणि धार्मिक आस्थेचा विषय होता. त्यामुळे सेटवरही तसेच वातावरण असायचे. गुजरातच्या उमरगाव इथल्या वृंदावन स्टुडिओमध्ये संपूर्ण रामायणाचे चित्रीकरण झाले.
सर्व अभिनेते २४ तास उपलब्ध असायचे. एकाच ठिकाणी जेवायचे, तिकडेच झोपायचे. रामानद सागर यांना मध्यरात्री ३ वाजता कल्पना सुचायच्या. त्या वेळी सर्व कलाकांराना उठवून शूटिंग सुरू व्हायची. त्या वेळी मेकअपच्या आधुनिक सुविधा नव्हत्या.
हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंग याचा चेहरा हार्ड रबरचा होता. त्या वेळी प्रॉस्थेटिक मटेरियल उपलब्ध नव्हते. दारा सिंगचा मेकअप करायला तीन तास लागत. मेकअपनंतर ते जेऊ शकत नव्हते.
त्यांच्या शेपटीसाठी वेगळ्या खुर्च्या बनवून घेतल्या. केंद्र सरकारने १६ जानेवारी १९७८ ला रामायण प्रसारित करण्यास परवानगी दिली. केवळ दहा दिवसांत म्हणजे २५ जानेवारीला पहिला एपिसोड प्रसारित करायचा होता.
अडचणी अनंत
रामायण मालिकेचे तीन भाग प्रसारित झाले; मात्र सुग्रीवसाठी कुणी अभिनेता मिळत नव्हता. दुसरा दारासिंग कसा मिळणार, हा प्रश्नच होता. तीन भाग संपले, सुग्रीवचा पत्ता नव्हता. या भूमिकेसाठी पैलवानाची गरज होती. त्यामुळे सागर यांनी कोल्हापूर, पुण्यातील कुस्तीचे आखाडे शोधले.
शिवाजी पार्कजवळच्या आखाड्यातही या भूमिकेसाठी शोधाशोध झाली. मात्र कुणीच फायनल होत नव्हतं. आता काय करायचे, हा विचार डोक्यात सुरू असताना रात्री ३ वाजता शूटिंग सुरू होते. अचानक शूटिंगदरम्यान एक राक्षसासारखा माणूस पळत पळत येत होता.
त्याने १० फूट लांबीवरून रामानंद सागर यांच्या पायात उडी मारली. हा काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी शूटिंग लाईट्स सुरू केले. पैलवानसारख्या दिसणाऱ्या त्या व्यक्तीला रामानंद सागर म्हणाले, तू कोण आहे? ती व्यक्ती म्हणाली, मी सुग्रीव आहे.
मी इंदूरचा, पैलवान आहे. रामानंद सागर म्हणाले, ते ठीक आहे; पण तुला संवाद बोलता येतात, अभिनय करता येतो? तो म्हणाला, मला यातले काहीच येत नाही; मात्र मी सुग्रीव आहे. सागर यांनी सुग्रीव म्हणून त्या व्यक्तीला फायनल केले. संवाद आणि अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्याचे सर्व संवाद डब केले.
सिनेमॅटिक लिबर्टी
सिनेमॅटिक लिबर्टी हा शब्द महत्त्वाचा आहे; मात्र तो जबाबदारीसोबत येतो यावर रामानंद सागर यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे रामायणातील जे प्रसंग त्यांच्या मनाला पटले नाहीत, ते त्यांनी नव्याने केले.
राजा भरतच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगातून सागर यांनी वंशपरंपरा पद्धतीवर आसूड ओढले. त्यात वंशपरंपरेने राजा बनण्यापेक्षा जनतेचे मत आणि धर्मगुरूचे मत विचारात घेतले पाहिजे, असे सांगण्यात आले.
रामायण घडताना रामानंद सागर यांनी धर्मवीर भारती, शिवमंगल सुमनसह अनेक तज्ज्ञांसोबत तासन् तास चर्चा केली. सीता वनवासात जाते, तो प्रसंगही रामानंद सागर यांनी बदलवून टाकला.
त्यात सीता रामासोबत वाद घालताना दाखवली आहे. त्यात सीता म्हणते, राजधर्म आणि पतीधर्मापेक्षा मोठा राज धर्म आहे. माझ्यामुळे तुमच्यावर कुठलाही डाग नको म्हणून तुम्ही मला सोडून जा म्हणण्यापेक्षा मी स्वत: सोडून जाते.
या प्रसंगात राम रडतात, विनंती करतात, सीते तू सोडून जाऊ नकोस. कुठल्याच रामायणात हा प्रसंग लिहिला नाही; मात्र रामानंद सागर यांनी डेअरिंग केले. यासाठी सागर यांच्यावर एकाने खटला दाखल केला. दहा वर्षे ती केस चालली.
स्पेशल इफेक्ट
रामायण मालिकेतील सर्व स्पेशल इफेक्टचे काम प्रेम सागर यांनी केले. त्याचा प्रयोग विक्रम वेताळमध्ये झाला होता. त्यात पाण्याखालील जग चित्रित करायचे असेल, तर ७५ रुपयाचे बजेट होते. रामायणात कमी पैशात जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करून इफेक्ट करण्यात आले.
त्यासाठी प्रेम सागर यांनी हॉलीवूडची पुस्तके वाचून काढली. मिरर शॉट, मॅटिनी शॉट सर्वकाही केले. रामानंद सागर केवळ कल्पना सुचवायचे. ते प्रत्यक्षात आकारात आणण्याचे काम प्रेम सागर यांचे होते. कापसाच्या साह्याने ढग बनवले. लेझर प्रोजेक्टरच्या साह्याने स्पेशल इफेक्ट केले. आजपर्यंत जुगाड केलेले इफेक्ट कुणाच्या लक्षात आले नाही, हे प्रेम यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांचा जाच
रामायणचे प्रसारण सुरू झाले. ते लोकप्रिय होत गेले; मात्र प्रसारण खात्याचा जाच सुरूच होता. कार्डबोर्ड सेट आहे, कॉस्च्युम स्वस्त आहे. संवाद वाईट आहेत. या स्वरूपाच्या तक्रारीचे पत्र दूरदर्शनचे अधिकारी सातत्याने रामानंद सागर यांना पाठवायचे. रामायणने लोकप्रियतेचे शिखर गाठल्यानंतर दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी सागर यांना त्रास देणे बंद केले. आजही ती अंसख्य पत्रे प्रेम सागर यांनी जपून ठेवली आहेत.
‘रामायणा’ची जादू
रामायणातील राम, रावण आणि सीतेची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, दीपिका, अरविंद त्रिवेदी एवढे लोकप्रिय होते, की ते खासदार म्हणून सहज निवडून आले. रामानंद सागर यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गाधी यांनी अनेकदा कलाकारांसोबत प्रचारासाठी बोलावले; मात्र सागर यांनी रामायण हे धार्मिक प्रेरणेने बनवली असल्याने तिकडे येण्यास नकार दिला.
रामायणाचे कलाकार एवढे लोकप्रिय होते, की सागर त्यांना उज्जैनला घेऊन गेले तेव्हा शहराची लोकसंख्या पाच लाख होती; मात्र १० लाख लोक जमले होते. २७ व्या भागानंतर रामायणने विशाल रूप धारण केले. त्या वेळी रामायण सुरू असताना वीजपुरवठा बंद झाला, तर लोक वीज कार्यालय जाळून टाकत.
अनेक राज्य सरकारांनी रामायणाच्या वेळेनुसार लोड शेडिंगचे वेळापत्रक बनवले. रामायण सुरू असताना हिंदू, मुस्लिमात दंगली झाल्या नाहीत. कराची, लाहोरलासुद्धा रामायण सुरू झाल्यावर रस्ते निर्मनुष्य होत असत...
आदिपुरुष, वाद आणि सागर
‘आदिपुरुष’मधील रावणाचे पात्र विचित्र दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फारच वाईट संवाद टाकल्याचा राग प्रेम सागर यांना आहे. ते म्हणतात, रावण ज्ञानी पुरुष होता. रामायण साकारताना सर्वात कठीण पात्र रावणाचे होते. रावणाला सर्व वेद, पुराणे माहिती होती.
शिवस्तुती रावणाने रचली होती. रावण महापुरुष होता; केवळ अंहकारामुळे रामायण घडले. बॉक्स ऑफिसवर यशस्वी करण्यासाठी ‘आदिपुरुष’मध्ये टपोरी भाषा वापरली गेली. रावणाला मॉडर्न केले; मात्र असे करताना निर्मात्यांना ग्रथ, वेद, पुराणासोबत खेळण्याचा अधिकार नसल्याचे प्रेम सागर यांचे म्हणणे आहे.
तुम्ही आदिपुरुष का बघत नाही, यावर प्रेम सागर म्हणाले, मला तो बघायचाच नाही. मला दुःख होतं. मी धार्मिक स्वभावाचा माणूस आहे. राम माझा देव आहे. त्याच्या भक्तीसाठी सिनेमा बघायचा नाही, असे प्रेम सागर म्हणतात.
जर आदिपुरुषच्या निर्मात्यांना मार्वल कॉमिक्ससारखे बनवायचे होते, तर वाल्मीकीच्या रामायणवर आधारित हा चित्रपट आहे असं लिहू नका. त्यापेक्षा याला बॅटमन, सुपरमॅन असे नाव दिले असते, तर चालले असते.
रामायण परत बनवणार नाही
सागर कुटुंब पुन्हा रामायण का बनवत नाही, कमीत कमी रामायणाची मर्यादा कायम राहील. यावर बोलताना सागर कुटुंबीय पुन्हा रामायण बनवणार नाही. कारण क्लासिक कधीच रिपीट होत नाही. मोनालिसा, राजा रवी वर्मा परत होऊ शकत नाहीत.
त्यापेक्षा रामायणला थ्री डी एनिमेशवर आणण्याची सागर कुटुंबाची तयारी आहे. बड्या पडद्याकडे परत जायचे नाही. दुसरे म्हणजे वेबसीरिज आम्ही कधीच करणार नाही. वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सागर कुटुंबाचा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.