ramayan to shri ram birth place journey sakal
सप्तरंग

रामायण ते रामजन्मभूमी... एक प्रवास!

श्रीरामच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने रामजन्मभूमीच्या आंदोलनाचे वर्तुळ पूर्ण होत आहे. हे आंदोलन घरोघरी पोहोचवण्यात ‘रामायण’ मालिकेचा मोलाचा वाटा आहे. त्या प्रवासाची कहाणी...

विनोद राऊत

श्रीरामच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने रामजन्मभूमीच्या आंदोलनाचे वर्तुळ पूर्ण होत आहे. हे आंदोलन घरोघरी पोहोचवण्यात ‘रामायण’ मालिकेचा मोलाचा वाटा आहे. त्या प्रवासाची कहाणी...

आजही असे म्हटले जाते, की भाजपच्या उत्कर्षाचे दरवाजे पहिल्यांदा कुणी उघडून दिले असतील तर ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी... त्यासाठी एक ऐतिहासिक चूक आणि ती दुरुस्त करण्यासाठी घेतलेले दोन निर्णय कारणीभूत होते. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी राजीव गांधी यांनी संसदेत कायदा पारित केला.

ही ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी बाबरी मशिदीचे कुलूप तोडण्याचा आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेला मंजुरी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन गोष्टींनी देशात हिंदुत्वाची सुप्त लाट आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कधी काळी दोन खासदारांचा पक्ष असलेला भाजप आज तीनशेवर पोहोचला आहे. त्यासोबतच हिंदुत्वाचे राजकारण देशात प्रस्थापित झाले.

१९७६ मध्ये स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत रामानंद सागर यांच्या ‘चरस’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. ते आटोपून एका कॅफेमध्ये रामानंद सागर आपल्या तीन मुलांसह बसले होते. अंग गोठवणाऱ्या थंडीत सागर यांनी रेड वाईन ऑर्डर केली. त्या वेळी वेटरने लाकडी बॉक्समधून रंगीत टीव्ही उघडला आणि चित्रपट सुरू झाला. ते पाहून सागर अवाक झाले. आयुष्यात ते पहिल्यांदा टीव्हीवर व्हीसीआर आणि टेपशिवाय फिल्म बघत होते.

काही वेळ विचारात गढून गेलेल्या रामानंद सागर यांनी ‘मी चित्रपट सोडत असून आता केवळ टेलिव्हिजन करणार’ अशी घोषणा तिथल्या तिथेच करून टाकली. रामानंद सागर यांच्या निर्णयामुळे तिन्ही मुले चक्रावून गेली. सलग सहा रौप्यमहोत्सवी सिनेमे देणारा माणूस असा निर्णय कसा घेऊ शकतो, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र सागर यांचा निर्णय अंतिम होता. तिथूनच एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली...

रामानंद सागर सिनेमा बनवून वैतागून गेले होते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तीन तासांच्या सिनेमात मसाला टाकावा लागतो. एवढे करूनही तो आवडला नाही, तर प्रेक्षक सिनेमा फ्लॉप करतात. आर्थिक नुकसान झाल्यामुळे पुढचा सिनेमा बनवण्यासाठी पैसे नसतात किंवा कुणी निर्माता पुढे येत नाही. सिनेमा निर्मितीत विचार आणि कल्पनाशक्तीला तसा वाव नाही. दुसरीकडे टेलिव्हिजन एक तर निःशुल्क माध्यम आहे.

त्यामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. जर आवडले नाही तर प्रेक्षकांच्या हाती रिमोट कंट्रोलचा ऑप्शन तर असतोच. विविध कालखंडांत अगदी वाल्मीकींपासून वेगवेगळ्या पद्धतीने ‘रामायण’ समजून सांगण्यात आले आहे. आधुनिक काळात रामायण सागंण्यासाठी माझा जन्म झाला, असे रामानंद सागर यांना कायम वाटायचे.

देशात टीव्ही येण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात ‘रामायण’च्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्यात अनेक अडचणी होत्या. मुख्य म्हणजे त्या वेळी टीव्ही एकदम नवे माध्यम होते. एक यशस्वी दिग्दर्शक-निर्माता टीव्हीवर येतोय हेच मुळात कुणाच्या पचनी पडले नव्हते. छोट्या पडद्यावर मुकुट आणि मिशी चालणार नाही, असा सार्वत्रिक समज होता. त्यामुळे ‘रामायण’साठी पैसे गुंतवायला कुणी तयार नव्हते.

मात्र, वडिलांसाठी प्रेम सागर यांनी ‘विक्रम वेताळ’च्या मालिकेच्या माध्यमातून एक प्रयोग करून पाहिला. दूरदर्शनवर दुपारी चार वाजताची वेळ मिळूनही ती मालिका प्रचंड यशस्वी झाली. त्यातून मुकुट-मिशी चालणार नाही, असा गैरसमज दूर झाला. उद्योगपती अरुण मफतलाल यांनी ‘रामायण’ निर्मितीत गुंतवणूक करण्याचे पक्के केले.

अडथळ्यांचा सामना

‘रामायण’चा प्रवास खूप खडतर होणार आहे, याची कल्पनाही रामानंद सागर यांना तेव्हा आली नव्हती. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा टीव्ही सुरू केला; परंतु दूरदर्शनवर मनोरंजक किंवा खिळवून ठेवणारा कार्यक्रम त्यांना आढळला नाही.

त्याच वेळी त्यांनी दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना, तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांना भारतीय संस्कृतीचा भाग असलेल्या ‘रामायण’, ‘महाभारत’ इत्यादींसारख्या पौराणिक मालिका दूरदर्शनवर आणण्याच्या सूचना दिल्या. माहिती आणि प्रसार मंत्रालयाने खासगी निर्मात्यांच्या माध्यमातून टीव्ही मालिकांची निर्मिती करून त्या दूरदर्शनवर दाखवण्याची तयारी सुरू केली. त्याअंतर्गत अर्ज मागवले गेले. रामानंद सागर यांनी लगेच अर्ज केला.

‘रामायण’ची निर्मिती आणि प्रक्षेपणाला राजीव गांधी यांचा होकार असला, तरी विठ्ठलराव गाडगीळ यांचा त्यास तीव्र विरोध होता. अशा मालिकेमुळे देशातील सुप्त हिंदुत्व जागृत होईल. त्याचा फायदा हिंदुत्व विचारधारा असलेल्या भाजपला होऊ शकतो. भाजपचा मार्ग आपण का मोकळा करून द्यायचा, असा त्यांचा सवाल होता. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा त्यांना पाठिंबा होता.

त्यामुळे राजीव गांधी अनुकूल असले, तरी प्रत्यक्षात ‘रामायण’ मालिका होऊच द्यायची नाही, असे माहिती प्रसारण मंत्रालयाकडून ठरले होते. त्यामुळे मालिका प्रत्यक्षात प्रदर्शित होईपर्यंत दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. दरम्यानच्या काळात रामानंद सागर यांचा उत्साह घालवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला.

अगदी पायलट एपिसोड सादर केल्यानंतर एका क्लार्कने सागर यांना टेप परत करताना सुमार दर्जाचे संवाद असल्याची तक्रार केली. पेहरावापासून ते मेकअपच्या दर्जापर्यंत तक्रारी केल्या गेल्या. एवढ्या यशस्वी दिग्दर्शकाला दिल्लीत कित्येक चकरा मारायला लावल्या. पंतप्रधान कार्यालयाकडून जेव्हा ‘रामायण’संदर्भात विचारणा व्हायची तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जायची.

शाहबानो प्रकरणाने मार्ग मोकळा

शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये संसदेत कायदा पारित करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला. धर्मनिरपेक्षवादाच्या नावाखाली मुस्लिम धर्मीयांचे लांगुलचालन करण्याचा आरोप काँग्रेसवर लागला. खुद्द राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधीही या निर्णयाने खूश नव्हत्या.

भाजपला आयतेच कोलित हाती लागल्याने लालकृष्ण अडवानी यांनी देशभर काँग्रेसविरुद्ध रान पेटवायला सुरुवात केली. शाहबानो प्रकरणातील सरकारची भूमिका अनेक काँग्रेसच्या कट्टर समर्थकांच्याही पचनी पडली नव्हती. १८ जानेवारी १९८६ मध्ये रॉ आणि आयबी प्रमुखांनी या निर्णयामुळे बहुसंख्य हिंदूधर्मीय नाखूश असल्याचा अहवाल राजीव गांधींना दिला.

या निर्णयामुळे निवडणुकीत हिंदू मतदारांच्या रोषाचा फटका काँग्रेसला बसेल, अशी भीती होती. त्यामुळे बहुसंख्य हिंदू लोकसंख्येला खूष करण्यासाठी किंवा शाहबानो प्रकरणात केलेली चूक सुधारण्यासाठी राजीव गांधी यांनी तातडीने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिका दूरदर्शनवर सुरू करण्याचे आदेश दिले. दुसरे म्हणजे, शाहबानो प्रकरणानंतर काही आठवड्यांत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी दरवाजे उघडण्याचे आदेश दिले.

१९४९ मध्ये आजोबाने लावलेले कुलूप त्यांच्या नातवाने तोडले. या निर्णयामुळे रामजन्मभूमीच्या चळवळीवर, रामाच्या अस्तित्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले होते. तिथून रामजन्मभूमी आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दोन्ही मालिकांची निर्मिती करण्यास रामानंद सागर यांना सांगण्यात आले; परंतु त्यांच्या नकारानंतर ‘महाभारत’ बी. आर. चोप्रा यांच्याकडे गेले.

रामजन्मभूमी चळवळीला गती

दोन वर्षांच्या अडथळ्यानंतर २५ जानेवारी १९८७ मध्ये ‘रामायण’चा पहिला भाग सकाळी नऊ वाजता प्रक्षेपित झाला. या मालिकेने नवा इतिहास रचला. काही आठवड्यांत मालिकेची प्रेक्षकसंख्या चार कोटींवरून आठ कोटींवर पोहोचली. ‘रामायण’ सुरू होताच देशातील रस्ते, गल्लीबोळ आणि बाजारपेठेत शांतता पसरायची. रस्ते निर्मनुष्य व्हायचे. ‘रामायण’च्या प्रक्षेपण वेळेतच भाजपने दिल्लीत एक राजकीय कार्यक्रम ठेवला होता.

एक माणूसही त्या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. त्यावरून भाजप नेत्यांना ‘रामायण’ची ताकद लक्षात आली आणि भाजपने आपली ऊर्जा रामजन्मभूमी आंदोलनाच्या पाठीशी लावण्याचा निर्णय घेतला. अयोध्येत राममंदिर बनवण्यासाठी लालकृष्ण अडवानी यांनी १९९० मध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. या रथयात्रेने देशाचा आणि भाजपचा इतिहास बदलून टाकला.

रामजन्मभूमीच्या आंदोलनात अग्रस्थानी असलेले विहिंपचे नेते अशोक सिंघल यांनी एकदा सांगितले होते, की ‘रामायण’ आमच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट होते. या मालिकेमुळे भारावलेले अनेक तरुण बजरंग दलाचे कार्यकर्ते बनले. १९८४ मध्ये दोन जागा जिंकलेल्या भाजपने १९८९ पर्यंत ८५ जागांवर झेप घेतली होती.

‘रामायण’चे भारतीय समाज आणि राजकारणावर काय परिणाम झाले, याचे विश्लेषण अरविंद राजगोपाल यांनी ‘पॉलिटिक्स आफ्टर टेलिव्हिजन : हिंदू नॅशनॅलिझम ॲण्ड रिशेपिंग पब्लिक इन इंडिया’ पुस्तकात केले आहे. त्यामध्ये ‘रामायण’मुळे भारतात नेमके काय बदल झाले, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. या मालिकेमुळे हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना जोर धरू लागली.

सोबत या मालिकेच्या प्रभावामुळे असंख्य लोकांना रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. ‘रामायण’पूर्वी देशात असंख्य देवांची पूजा केली जात होती. मात्र या मालिकेनंतर रामाचे नाव देशाच्या अग्रभागी आले. छोट्या पडद्यावर आलेली ती पहिली पौराणिक मालिका ठरली.

‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी यांच्या मते त्यांच्या मालिकेमुळे भारतीयांच्या मनामनातला राम बाहेर आला. अयोध्येच्या आंदोलनात ‘रामायण’चा मोठा वाटा आहे. या आंदोलनाला ‘रामायण’ने गती, हिंमत आणि ऊर्जा दिली. रावणाची भूमिका साकारणारे अरुण त्रिवेदी आणि सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया हे कलाकार चांगल्या मताधिक्याने खासदार झाले.

त्या वेळी ‘रामायण’ची लोकप्रियता एवढी शिगेला पोहोचली होती, की राम साकारणारे अरुण गोविल आणि सुनील लाहिरी यांच्यासह अनेकांना भाजप व काँग्रेस पक्षांकडून लोकसभेची ऑफर आली होती. या मालिकेमुळे हरवलेली भारतीय संस्कृती, संस्कार या मातीत परत रुजले, असेही ते सांगतात.

दिवंगत रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांच्या मते रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे पहिले बीज रामानंद सागर यांनी पेरले होते. लालकृष्ण अडवानी यांनी त्याची वाढ केली आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते पूर्ण झाले. या सर्वाचे श्रेय ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनाही देतात. रामानंद सागर यांना ‘पद्मश्री’ ही काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला होता. काँग्रेसचे नेतेही अधूनमधून हा दावा करतात. मात्र सध्या त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही.

‘रामायण’चे महत्त्व जाणून असलेले लालकृष्ण अडवानी, अशोक सिंघल, संघप्रमुख सुदर्शन यांच्यासह अनेक भाजप आणि संघ परिवाराच्या नेत्यांसोबत रामानंद सागर यांचे कौटुंबिक संबंध होते. सागर यांच्या योगदानाबद्दल ते कृतज्ञ होते. मात्र, भाजपच्या दुसऱ्या पिढीच्या नेत्यांनी हे नाते जोपासले नाही. सागर कुटुंबाला अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रणही मिळाले नाही. मात्र त्यामुळे आमच्या रक्तातली रामभक्ती कमी थोडी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT