human discussion sakal
सप्तरंग

बोलून मोकळं व्हा

आपलं घरटं शेणाचं की मेणाचं, असा प्रश्न पडून उत्तर शोधण्याच्या आत दुःखाने तुमच्या मनाचा ताबा घेतलेला असतो. जीवलग आपल्यातून निघून जाण्याचं दुःख पचवायला मुळातच अवघड.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

आपलं घरटं शेणाचं की मेणाचं, असा प्रश्न पडून उत्तर शोधण्याच्या आत दुःखाने तुमच्या मनाचा ताबा घेतलेला असतो. जीवलग आपल्यातून निघून जाण्याचं दुःख पचवायला मुळातच अवघड. म्हणून माणूस तुमच्या समोर आहे तोपर्यंत मौनातून संवाद वगैरे साधण्याच्या भानगडीत न पडता बोलून मोकळं होऊन घ्यावं.

आदल्या दिवशी रात्री दीड वाजता ऑफिसमधून घरी गेलेला माझा सहकारी पुन्हा सकाळी बरोबर दहा वाजता कामावर हजर झाला. त्याला घाईने काहीतरी शेअर करायचं होतं. आपल्याला ट्रेन पकडायची असते त्यावेळी ज्या लगबगीने आपण रिक्षातून उतरून हिशेबाचे पैसे देतो आणि तडक प्लॅटफॉर्मकडे आगेकूच करतो, अगदी त्या घाईने त्याला त्याच्या डोक्यातलं-मनातलं शेअर करून डेस्कवरच्या कामाकडे वळायचं होतं.

सहकाऱ्याच्या आईने सकाळी त्याच्या बॅगेशेजारी जेवणाचा डबा ठेवल्या ठेवल्या त्याच्या वडिलांनी त्यावर पाचशेची नोट त्याला देऊ केली. त्यावर तो म्हणाला, की मी कमावतो तर आता तुम्ही हे पैसे का म्हणून देताय? तरीही वडिलांनी आग्रह केल्यावर सहकाऱ्याने पाचशेऐवजी शंभर रुपये द्या, असं सांगितलं; पण हे का, म्हणून प्रश्नही विचारलाच. त्यावर वडील म्हणाले, ‘‘काल माझ्या जवळच्या मित्राचा मोठा मुलगा अचानक गेला.

रात्री तुझी बराच वेळ वाट पाहिली. सकाळीही लवकर उठशील म्हणून वाट पाहत होतो...’’ ते ऐकल्यावर सहकाऱ्याला काय बोलावं सुचलं नाही. तो डबा उचलून तडक तिथून निघाला खरा; पण मागे वळून पाहिल्यावर त्याच्या बेडपाशी बराच वेळ रेंगाळताना त्याने स्वतःच्या वडिलांना पाहिलं... अर्थात हे सगळं सांगत असताना त्याला आणि ऐकताना मला गलबलून आलंच.

दुःख आणि त्यातही जीवलग आपल्यातून निघून जाण्याचं दुःख, याच जातकुळीतलं इतरांच्या वाट्याला आलेलं, पाहण्यातलं, कल्पनाही न करवणारं दुःख हे पचवायला मुळातच अवघड. म्हणून या अवघड विषयावर कधीच चर्चा होत नाही. क्रिया-कर्म करणं आणि या अशा प्रसंगातून तरून जाणं, शक्य तितक्या लवकर ते मागे सारण्यासाठी हात-पाय मारत राहणं आणि मारायला भाग पाडणं हे सतत होत असतं.

इतकं का म्हणून भीतो आपण दुःखाला? माझ्या सहकाऱ्याच्या वडिलांना त्यांच्या मित्राचा मुलगा गेला या गोष्टीचं दुःख, शोक होता. नकळतपणे त्यांच्या मित्राला कुठली पोकळी जाणवेल याची जाणीव त्यांना झाली आणि ते भांबावले. असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. सुख-दुःखाच्या अनेक कल्पना आपण करतो खऱ्या; पण त्यातही दुःखाच्या विचाराने कसेनुसे होतो.

झपाट्याने निर्मनुष्य अंधारा रस्ता तुडवावा तसे त्यातून बाहेर पडतो; पण त्या कल्पनांशी साधर्म्य साधणारं दुःख परिचिताच्या पदरात पडलेलं दिसलं की मात्र आतून तुटत जातो. त्या दुःखाची झळ आपल्यालाही पोहोचतेच. दुःखाच्या कल्पनेने माणूस सुख घट्ट आवळून तरी ठेवू पाहतो किंवा धीट तरी होत जातो. काही नातेसंबंध दुःखाने उजळून निघतात, लख्ख होतात... पुन्हा मूळ धरतात. जसं की वर मांडलेला प्रसंग.

अर्थात सहकाऱ्याने हा अनुभव शेअर केल्यानंतर तो विषय काही तिथेच थांबला नव्हता. पुढे त्याची चर्चा झाली. ‘दुःखाचं मूळ कारण म्हणजे तृष्णा’ हे दुःखाचं मूळ शोधण्याइतके सूर त्या चर्चेत मिसळले गेले. कारण मुळातच एखादी जवळची व्यक्ती जाते तेव्हा होतो तो शोक. दुःख त्याहून न्यारं असतं. दुःखाची जातकुळी प्रसंगानुरूप बदलत जाते. असं असलं तरी दुःखाची वर्गवारी कमी आणि जास्त अशी करता यायची नाही.

ते तुमचा ताबा घेणारं असतं. तरीही मैत्री तुटल्याचं, नोकरी गेल्याचं, शहर सोडण्याचं, अबोल्याचं या साऱ्याच दुःखाची जातकुळी वेगळी. अगदी आमच्या ऑफिसमध्ये झालेल्या चर्चेतलंच पाहिलं तर, अनेक गोष्टींची खंत आणि अनेक गोष्टींचं दुःख चर्चिलं गेलं.

या सगळ्यातलं महत्त्वाचं होतं ते संवाद पूर्ण न झाल्याचं दुःख. २८ ते ३३-३४ वय असणारी, ओव्हर टाईम करून आणि वर्क प्रेशर घेऊन थकलेली मुलं घरी पोहोचतात तेव्हा पालकांच्या अपेक्षांची कधीही पूर्ण न होणारी यादी समोर असतेच. बिलं भरण्यासाठी, ऑनलाईन करायच्या कामांसाठी, वेगवेगळ्या बुकिंगसाठी, नातेवाईकांना द्यायच्या विविध औचित्यांच्या शुभेच्छांसाठी, औषध मागवण्यासाठी, ऑनलाईन करायच्या बँकांच्या कामांसाठी ते मुलांवर अवलंबून असतात. या लहानसहान गोष्टींमुळे त्यांची मोठी कामंही अडतात. म्हणून एकदा का मुलांना समोर पाहिलं की त्यांना ही अडलेली कामं दिसतात व ते ती पूर्ण करून घेण्यासाठी मुलांच्या मागे लागतात.

झोपण्यापूर्वीच्या दोन तासांत ही सगळी कामं आणि फार महत्त्वाचे किंवा ज्यांच्यामुळे वाद होतील असेच मुद्दे गप्पा मारण्याच्या नावाखाली किंवा हाच तर वेळ मिळतो... आता नाही, तर कधी बोलणार, सांगणार तुम्हाला, असं म्हणून चर्चेत येतात. मग हलकंफुलकं, डोक्याला शांत ठेवेल असं किंवा ज्याने मुलांचं मन मोकळं होईल असं काहीच त्यांना सांगता येत नाही.

ऑफिसमध्ये सीनिअर्ससमोर आणि घरात आई-वडील यांच्यात ही सगळी मुलं पार भरडली जातात आणि बोलायच्या कितीतरी गोष्टी मनातल्या मनातच राहून जातात. अशा न बोलल्या गेलेल्या, बोलता न आलेल्या अनेक गोष्टींची जाणीव दुःखाची झळ पोहोचल्यावर पालक आणि मुलं दोघांना तीव्रतेने होते.

आपलं घरटं शेणाचं की मेणाचं, हा प्रश्न पडून, उत्तर शोधण्याकडे जाण्याच्या आत दुःखाने तुमच्या मनाचा ताबा घेतलेला असतो. म्हणून माणूस तुमच्या समोर आहे ते सारे क्षण मनातलं बोलून - म्हणून जगून घेण्याचे असतात. दुःखाच्या सावलीलाही उभं राहू नये, असं सगळ्यांनाच वाटतं; पण प्रत्यक्ष वाट्याला आलेल्या किंवा दुसऱ्याच्या दुःखाचा परिणाम झालेल्या सगळ्यांना दुःख उजळून टाकत असतं.

कधी पश्चातापाच्या जाणिवेने, तर कधी नातेसंबंध दृढ करून. असं असलं तरी आपल्या हाकाही ऐकू जाणार नाहीत इतक्या लांब माणसं जाण्याआधी मौनातून संवाद वगैरे साधण्याच्या भानगडीत न पडता बोलून मोकळं होऊन घ्यावं. लहानांनी मोठ्यांशी आणि मोठ्यांनी लहानांशीही...

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT