- विशाखा विश्वनाथ
कित्येकदा नियोजित स्थळी पोहोचण्याची चिंता आपण इतकी करत बसतो की वर्तमान हातातून सुटत जातो. पुन्हा भविष्यकाळाच्या खिडकीतून भूतकाळात डोकावलं की जरा संयमाने वागलो असतो तर समृद्ध जगलो असतो, असं वाटतं. आणि आपल्या श्वासांची वर्तुळनक्षी उगाच विस्कटते. ती विस्कटू द्यायची नसेल तर झालेल्या घटनांचा स्वच्छ मनाने स्वीकार करून शक्य तितकं आताच्या क्षणात जगणं हाच पर्याय आहे.
पहाटे पाचची गोष्ट. अलिबागला जाण्यासाठी म्हणून कल्याणच्या बस स्टॅन्डला नियोजित बसची शोधाशोध करत होते. रिझर्व्हेशन केलेलं, त्यामुळे कसलीच चिंता नाही, असं मी धरून चालत होते. आपण वेळेत पोहोचलोय, मस्त खिडकीतली सीट आहे, बाहेर पाऊस आहे आणि अलिबागला जायचंय म्हणजे एकूण उत्साहच होता; पण मला काय माहीत मी ज्या बसने जाणार आहे, ती बस तर निघून गेली.
पहाटे चारला उठून केलेली तयारी, सकाळी येणारा पाऊस, त्याने ओले झालेले कपडे आणि चक्क बस निघून गेली म्हणजे काय... सकाळी पाच वाजता डोक्याची तार हलली. बरं असं माझ्याच नाही अजून एक-दोन प्रवाशांच्या बाबतीत झालं. सगळेच चिडले, कंट्रोलरला सुनावलं. बाचाबाची झाली आणि पार मूडच गेला प्रवासाचा. असं वाटलं की लागली दिवसाची वाट. तेवढ्यात पुढची बस लागली. जाणीवपूर्वक खिडकीतली जागा हेरून बसले होते आणि मग एकदाची प्रवासाला सुरुवात झाली.
मी जवळ जवळ १५ वर्षांनी अलिबागला जात होते. तीही एकटी. फिरायला म्हणून नव्हे तर कामासाठी. मला काहीही करून माझा दिवस खराब होऊ द्यायचा नव्हता. पण सुरुवात तर मला हवी तशी झालेली नव्हती आणि म्हणून चिडचिडही होत होती. मग उपाय सुचला. कानात मनाचे श्लोक लावले आणि हळूहळू मन निवलं.
प्रत्येक श्वासाचं आपलं वेगळं अस्तित्व जाणवू लागलं. खिडकीतला पाऊस मन सुखावत होता, चिडचिड थांबली होती. गावागावातून शाळेसाठी जाणारी मुलं, गाव बदललं की गणवेशाच्या रंगात होणारा बदल जाणवत होता. बायकांच्या साड्यांचे गडद रंग, आंबाड्यात असणारी फुलं पाहताना आपण मुंबईबाहेर पडलोय याची जाणीव लख्ख होत गेली. आणि समजलं वर्तमानात जगणं किती किती गरजेचं आहे.
अलिबागला पोहोचल्यावर जिथे तिथे दिसणारी फुलं आणि मुंबईपासून जराच अंतरावर असणाऱ्या या शहराची भाषा आणि त्याचं फोटोजेनिक असणं क्षणाक्षणाला नवा आनंद देत होतं. इतकंच काय, आमच्या खांदेशात जिला डुक्कर गाडी म्हणतात, प्रमाण भाषेत जिला टमटम म्हणतात, त्या गाडीला इथे सितारा म्हणतात, हे समजल्यावर कुठे डुक्कर गाडी अन् कुठे सितारा?
हे एका सुरात मोठ्याने म्हटलं आणि एक आजी खळाळून हसल्या. तब्बल दोन तास उशिरा पण हसत आणि हसवत मी नियोजित स्थळी पोहोचले. आपण स्वतःला केलेली संगत-सोबत फार मोलाची आहे, हे समजलं.
एका अशक्य चिडचिडीचा प्रवास एका फुलपाखरी अनुभवात कधी बदलला समजलंसुद्धा नाही. संपूर्ण प्रवासभर जर सकाळी सुटलेल्या बसचा विचार केला असता, मीटिंगची वेळ चुकेल हेच डोक्यात ठेवलं असतं, तर कदाचित मी माझ्या प्रवासातल्या आनंदाला मुकले असते.
शाळेतली १५ वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी यातला नेमका फरक मला उमगलाच नसता आणि पुन्हा मी अलिबागचा प्रवास एन्जॉय केला नाही, हा नवा मनस्ताप करून घेत कुठलातरी वर्तमानातला क्षण खराब केला असता. वेळीच मन शांत केल्याने मला घडणाऱ्या घटनाक्रमातला त्रागा तर दूर करता आलाच; पण श्वासांची वर्तुळनक्षी अधिक उमगली.
आपण अगदी सहज म्हणतो ‘लाईफ इज अ सर्कल’ ते अगदी खरं असतं. समूहासोबत सहलीला जाणारी मी ते एकटी अलिबागला जाणारी मी, त्या समूहातल्या प्रवासात स्वतःचा एकांत शोधणारी मी हे एक स्वतःपासून स्वतःपर्यंत नेणारं माझ्या आयुष्याचं वर्तुळ मी या प्रवासात पूर्ण केलं होतं.
कित्येकदा आपलं होतं, असं की अमुक-तमुक घडणारी घटना, नियोजित स्थळी जाण्यासाठी होणारा उशीर किंवा वेळत पोहोचण्याची घाई या सगळ्यांची चिंता आणि काळजी आपण इतकी करत बसतो की वर्तमान हातातून सुटत जातो.
पुन्हा भविष्यकाळाच्या खिडकीतून भूतकाळात डोकावलं की अरेरे, इथे जरा संयमाने वागलो असतो, तर किती छान समृद्ध जगलो असतो आपण, असं आपल्याला वाटून जातं. आणि आपल्या श्वासांची वर्तुळनक्षी उगाच विस्कटते. ती विस्कटू द्यायची नसेल, तर झालेल्या घटनांचा स्वच्छ मनाने स्वीकार करून शक्य तितकं आताच्या क्षणात जगणं, हा उत्तम पर्याय आहे.
कारण, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुच शोधूनी पाहे, याचा शोध आपला आपण घ्यायचा ठरवतो तेव्हा किमान आपल्याकडे चार सुखाचे स्वतःला सोबत करणारे क्षण असणं ही आपल्या आयुष्याची मिळकत ठरते. या चार सुखाच्या क्षणांनी आत्मबळ व आत्मभान येत जातं.
भवतालभान येण्यासाठी हे आत्मभान असणं अधिक गरजेचं आहे, कारण भवताल अंगावर येणारा आहे, अशात आतली शांतता आपल्याला या वर्तमानात तरून जाण्यासाठी
खूप मदतीची ठरणार आहे. त्यामुळे आपल्या श्वासांची वर्तुळनक्षी या भवतालात सुबक, साधी आणि नेटकी रेखायची असेल, तर स्वीकाराला पर्याय नाही.
vishakhavishwan11@gmail.com
(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.