critical incident sakal
सप्तरंग

घटनाकथनाचा मोह अनावर

गंभीर प्रसंगांचं घटनानाट्य अधिक रंगवून सांगण्यात माणसांना एक वेगळाच आनंद मिळतो.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

गंभीर प्रसंगांचं घटनानाट्य अधिक रंगवून सांगण्यात माणसांना एक वेगळाच आनंद मिळतो. खरंतर तो आनंदही नसतो; पण मुळातच नाट्यप्रिय असणाऱ्या आपल्याला घटना फुलवण्याचा मोह अनावर झालेला असतो. आपण आपल्याही नकळत मूळ प्रसंगामध्ये आपल्या स्वतःची भर टाकत जातो.

यातून वास्तवात गंभीर नसलेली गोष्टही गंभीर होते आणि कधी कधी गंभीर गोष्टीतलं गांभीर्यच नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे घडलेल्या घटनेचं योग्य आकलन वैयक्तिक पातळीवर करूनच गरज असेल, तर सदर घटना समोरच्याला सांगायला हवी...

सानू आणि निहिरा आठ दिवसांपूर्वी घरात खेळत होत्या. सानूच्या आईला दुकानावर जायचं असल्याने, सानू आणि निहिरावर लक्ष ठेवा, असं मला सांगून ती पायऱ्या उतरणार इतक्यात सानू किंचाळली. तिसऱ्या मजल्यावरची पावणेदोन वर्षांची निहिरा आणि साडेसात वर्षाची सानू, दोघीच घरात. त्यात कानावर येणारी भेदरलेल्या आवाजातली किंकाळी. काही सेकंदात अनेक शंका-कुशंका मनात येऊन गेल्या.

शॉर्टसर्किट... या दोघी पडल्या की काय... किती नि काय काय शंका क्षणात दाटून आल्या. सानू पलीकडे दिग्मूढ होती. मेन डोअर उघडं असल्याने आतलं सगळं दिसत असलं, तरी काय झालं, हे समजत नव्हतं. सेफ्टी डोअर उघडायला हवं, हे सानूला समजलं नाही. निहिराला तर काहीच कळत नव्हतं.

आमच्या घरातल्या ज्यादा चावीने आम्ही सेफ्टी डोअर उघडत असताना सानू बोलली, कुछ जल रहा हैं. आत जाऊन पाहिलं तर देव घरातल्या कापडाचं एक टोक वेगाने असणाऱ्या पंख्यामुळे निरंजनावर उलटलं होतं. त्याने पेट घेतला होता. जरासाही उशीर झाला असता तर हे एकूण प्रकरण गंभीर होणार होतं.

सानूची आई देवघराकडे गेली. सानूने झुला हाताने धरून ठेवला होता. हे खरंतर प्रसंगावधान, कारण त्या झुल्याची गादी, वरची फुलांची माळ असं सगळंच पेट घेणारं होतं. तिने तो हातातून सोडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. जशी सानूची आई देवघरापाशी पोहोचली, सानू मला येऊन घट्ट बिलगली. डोळ्यातून घळाघळा अश्रू तिच्या लालबुंद गालांवर ओघळत आले.

सगळं थोडक्यात निभावलं होतं; पण या प्रसंगाने ती घाबरली आणि आदल्या दिवशीचं आमचं लुटूपुटूचं भांडणही अश्रूंच्या जोरदार पावसात वाहून गेलं होतं. चार-दोन लांब श्वास घेत सानूचे डोळे पुसले आणि आग लागल्यावर काय काय करायचं, हे तिला समजावून सांगितलं; पण एकूण हा आगीचा विषय तिच्या डोक्यातून चटकन जाणार नाही, हेही ठाऊक होतं. आणि झालंही तसंच.

जरा वेळाने सानू दिविजाला घटनास्थळी जाऊन घटनाक्रम सांगू लागली. त्यात बढाया होत्या आणि चटकन लक्षात आलं हीच ती वेळ, कथा नाट्य फुलवून सांगणाऱ्या या पिटुकल्या मेंदूला आणि भेदरलेल्या तरी बढाई मारणाऱ्या मनाला आवर घालण्याची. कारण सानूनामक कथाकथन करणाऱ्या आमच्या कल्पक मेंदूच्या बाळाने मूळ घटनेपासून फारकत असलेली जवळ जवळ काल्पनिक घटना आपल्या मित्र परिवारात पसरवली असती आणि ते सगळे आग लागलेलं ऐतिहासिक ठिकाण पाहायला झरझर आले असते. म्हणून सानूला वेळीच हटकलं. घडलेली घटना इतकी मोठी नव्हती, हे समजावलं.

लहान मुलंच काय, मोठी माणसंही गंभीर प्रसंगांची अशीच रसभरीत वर्णनं करत असतात, हेही लक्षात आलं. नीट निरीक्षण केलं, तर गंभीर प्रसंगांचं घटनानाट्य अधिक रंगवून सांगण्यात माणसांना एक वेगळाच आनंद मिळतो. खरंतर तो आनंदही नसतो; पण मुळातच नाट्यप्रिय असणाऱ्या आपल्याला घटना फुलवण्याचा मोह अनावर झालेला असतो.

मोठी घटना, गंभीर तक्रार, अपघाताचे प्रसंग, चोरीचं वर्णन, प्रत्यक्ष पाहिलेला अपघात, आजाराचं निदान हे आणि असं अजून बरंच काही सांगत असताना आपण आपल्याही नकळत मूळ प्रसंगामध्ये आपली स्वतःची भर टाकत जातो. यातून वास्तवात गंभीर नसलेली गोष्टही गंभीर होते आणि कधी कधी गंभीर गोष्टीतलं गांभीर्यच नष्ट होण्याची शक्यता असते.

सोबतच गंभीर घटना सांगत असताना आपण समोरच्याला पुरतं घाबरवून सोडतो. या सगळ्यामुळे होतं काय, की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, असा प्रकार होऊन बसतो. स्वतःसोबत समोरचाही टेंशनमध्ये येतो. परिणामी घटनेकडे तटस्थपणे पाहता येत नाही आणि त्या त्या वेळी रामबाण उपाय सुचवताही येत नाही.

तुम्ही मोठे असाल, तर गंभीर प्रसंगाचं इत्यंभूत वर्णन करताना त्यात नसतं नाट्य उभं करतोय का, हे स्वतःला विचारता यायला हवं. गोष्टी अतिरंजित करून सांगण्याची सवय मोडायला हवी आणि लहान मुलांना ती लागत असेल, तर वेळीच सावध पवित्राही घ्यायला हवा. कारण या अशा घटना पाहत आणि सांगत असताना आपण तर तणावात येतोच; पण आपल्या सोबतच्या माणसालाही तणावात आणतो.

हेच अनुकरण लहान मुलांकडूनही होत राहतं. तुमच्या नकळत तुमचा भोवताल गढूळ होत राहतो. हे सगळंच टाळायचं असेल, तर भावनेच्या भरात घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची शिस्त सगळ्यांनीच अंगीकारायला हवी. घडलेल्या प्रकाराचं योग्य आकलन वैयक्तिक पातळीवर करून मग गरज असेल, तर सदर घटना समोरच्याला सांगायला हवी.

नाही तर तुम्ही सांगितलेली अडचण ही फुसकी असते, हे लक्षात आल्यावर तुमच्या मदतीला धावून येणारी तुमची आपली वा वेळेला उभी राहणारी कुठलीही व्यक्ती एखादवेळी खरोखरीच अडचण असताना तुमच्याकडे कानाडोळा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी आपला ‘लांडगा आला रे आला’मधला मुलगा होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

माणसाच्या असं वागण्यामागच्या प्रेरणा या कळत-नकळतपणे लक्ष वेधून घेणे, सहानुभूती मिळवणे अशा असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला हे सगळं करण्यापासून थांबवायला शिकलं पाहिजे आणि सहानुभूतीसाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी आपण काही विचित्र वागतोय का, हे स्वतःलाही विचारलं पाहिजे; तर आणि तरच अडचणीच्या काळात, सुटकेच्या वाटा गवसू शकतील.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath11@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT