Mobile Selfie Sakal
सप्तरंग

मला मी आवडते!

सेल्फलेस, सेल्फिश, सेल्फलव्ह असं जे जे म्हणून स्वतःपुरतं निगडित आणि मर्यादित असतं, ते सगळं एक तर फार चांगलं किंवा टोकाचं वाईट अशी सरळसरळ वर्गवारी फार चटकन केली जाते.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

सेल्फलेस, सेल्फिश, सेल्फलव्ह असं जे जे म्हणून स्वतःपुरतं निगडित आणि मर्यादित असतं, ते सगळं एक तर फार चांगलं किंवा टोकाचं वाईट अशी सरळसरळ वर्गवारी फार चटकन केली जाते. उलटपक्षी त्याची गरज, त्यातलं तथ्य हे ओळखलं जात नाही. प्रेम करणारी आपली माणसं जवळ असताना स्वतःच स्वतःवर प्रेम करण्याची काय गरज, असं कित्येकांना वाटतं. पण सेल्फलव्ह ही एक व्यापक संज्ञा आहे आणि त्याहीपलीकडे तो जगण्याचा मस्तमौला अंदाजही आहे. आनंदाचे जिवंत झरे स्वतःत शोधण्याचा हा प्रवास आहे.

ग्रीक मायथोलॉजीमध्ये एको आणि नार्सिससविषयीचं एक मिथक प्रचलित आहे. स्वप्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला ही उपमा दिली जाते. हे खरं असलं, तरी नार्सिसिस्ट ही एक संज्ञादेखील आहे. स्वप्रेमात आकंठ बुडून स्वतःचं नुकसान करणाऱ्या मनुष्याला ही उपमा सर्रास दिली जाते. सेल्फी काढण्याच्या हुक्कीचा संबंधही तो व्यक्ती नार्सिसिस्ट असण्याशी जोडला जाऊ लागलेला आहे.

हे वाचल्यावर किंवा स्वप्रेमाचं असं इतकं नकारात्मक चित्र मिथकांमधून समोर आल्यावर तुम्हाला वाटेल स्वतःवर प्रेम करणं ही काही चांगली गोष्ट नाही.

हे असे सगळेच गैरसमज एका चित्रपटातल्या पात्राने मोडून काढले आणि हाडाच्या बॉलीवूड चाहत्यांना, त्यातही मुलींना एक नवाच ॲटिट्यूड दिला, त्याचं नाव ‘मैं अपनी फेवरिट हूं.’ प्रचंड बडबडी असणारी ही गीत नावाची नायिका मला खूप वर्षं माहीत नव्हती; पण मी बोलायला लागल्यावर खूप जण गीतसारखी बडबडी आहेस म्हणायचे. नंतर पुढे २०१७ मध्ये ‘मला मी आवडते’ नावाची एक कविता लिहिली. ती खूप जणींना स्वतःची वाटली, बरीच शेअर झाली आणि त्यानंतर मला ‘मैं अपनी फेवरिट हूं’ या प्रकरणाचा उलगडा झाला.

दरम्यान, एका मित्राने नार्सिसीसची गोष्टही सांगितली आणि स्वतःच्या प्रेमात असणं चांगलं की वाईट याचं मूल्यमापन सुरू झालं. सेल्फलेस, सेल्फिश, सेल्फलव्ह असं जे जे म्हणून स्वतःपुरतं निगडीत आणि मर्यादित असतं ते सगळं एक तर फार चांगलं किंवा टोकाचं वाईट अशी सरळसरळ वर्गवारी फार चटकन केली जाते.

उलटपक्षी त्याची गरज, त्यातलं तथ्य हे ओळखलं जात नाही. प्रेम करणारी आपली माणसं जवळ असताना स्वतःचं स्वतःवर प्रेम करण्याची काय गरज, असं कित्येकांना वाटतं, पण सेल्फलव्ह ही एक व्यापक संज्ञा आहे आणि त्याही पलीकडे तो जगण्याचा मस्तमौला अंदाजही आहे.

‘जब वी मेट’मधली गीत तिची भूमिका मांडत असताना म्हणते, ‘‘माझ्याबाबतीत जे काही चांगलं किंवा वाईट होईल, त्याला मी जबाबदार असावं. माझं वाईट होईल तेव्हा मी दुसऱ्याला दोषी धरता कामा नये.’’ गीत हे फार सहज पत्ते खेळता खेळता सांगून जाते. आपल्या चुकांचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणारी माणसं आपण.

आपल्याला आपल्या भल्या-बुऱ्याची अशी जबाबदारी घेणं कदाचित जमणार नाही; पण स्वप्रेमाचा हाही एक पदर असतोच हे किमान लक्षात तर येईल. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचा हेका चालवणं, दुराग्रही असणं, अहंकारी असणं, स्वतःचं म्हणणं खरं करणं, दुसऱ्याला कमी लेखणं या एवढ्या चुकीच्या समजुती आपल्या मनात घर करून असतात.

याउलट स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं, स्वतःचा आनंद स्वतः शोधणं आणि दुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार न धरणं असतं. अगदीच सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इतरांची काळजी करण्यापेक्षा आणि इतरांनी आपली काळजी घ्यावी ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतः स्वतःची काळजी घेणं, स्वतःला प्राधान्य देणं.

अहंकारी आणि दुराग्रही असणं आणि स्वतःला प्राधान्य देणं यातला फरक समजून घेतला, तर ‘मला मी आवडते’ हे टेचात इतरांना सांगता येईल. स्वतःवर प्रेम करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे माणसं स्वतःवरचं प्रेम वेगेवगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. स्वभावानुसार त्या बदलतही जातात. त्यात स्वतःचा मोठेपणा मिरवणं नसतं. आक्रमक होणं नसतं आणि हुकुमशहा होणंही नसतं.

स्वतःसाठी आणि स्वतःला चांगलं वाटावं म्हणून केलेल्या लहानसहान गोष्टी यात असतात. स्वतःला प्राधान्य देत स्वतःसाठी निर्णय घेता येणं ही स्वप्रेमाची खरी ताकद. हे निर्णय फार लहान असले तरी महत्त्वाचे असतात. जगरहाटी आहे म्हणून मन मारून एखादी गोष्ट करण्यापेक्षा वेळीच ती सोडून देण्याची मुभा आहे. स्वतःवर सक्ती करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं आहे.

या समजून घेण्यात एका गोष्टीची काळजी मात्र कायम घेतली पाहिजे. ती म्हणजे विनाकारण स्वतःला सहानुभूती देणं किंवा इतरांकडून तशी अपेक्षा करणं. स्वतःला कमी लेखणं थांबवलं पाहिजे. न्यूनगंड आणि अहंगंड या दोघांच्याही मधली एक अवस्था असते ती म्हणजे, आहे हे असं आहे म्हणत स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवून, स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःवर मेहनत घेणं.

स्वतःवर प्रेम करणं किंवा मला मी आवडते हे ठामपणे सांगणं म्हणजे स्वतःला विश्वासात घेणं, स्वतःवर विश्वास दाखवणं, स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणं आणि क्षमता वाढवण्यासाठी नेटाने धडपड करत राहणं. इतरांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतो तसंच, स्वतःला जिंकण्यासाठी धडपडणं. सगळे आपापल्या जागी बरोबर असतात.

मीही माझ्याजागी बरोबर आहे, हा आत्मविश्वास बाळगून असणं. म्हणून स्वतःवर प्रेम करणं ही मानसिक अवस्था नसून, वारंवार कृतीतून स्वतःप्रति व्यक्त करावी, अशी गोष्ट आहे.

मला मी आवडते म्हणणं ही विकृती नसून, स्वतःच्या आनंदासाठी कल्पकपणे स्वतःवर काम करण्याची वृत्ती आहे. आनंदाचे जिवंत झरे स्वतःत शोधण्याचा हा प्रवास आहे. जो सगळ्यांच्या साक्षीने होत असला तरी एकट्याचा आहे; पण स्वतःपर्यंत नेऊन सोडणारा आहे.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath11@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT