सप्तरंग

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या...

कित्येकांचं मन वाढत्या वयाबरोबर आणि येणाऱ्या कटू अनुभवांसोबत कोडगं होत जातं.

सकाळ वृत्तसेवा

- विशाखा विश्वनाथ

कित्येकांचं मन वाढत्या वयाबरोबर आणि येणाऱ्या कटू अनुभवांसोबत कोडगं होत जातं. अशा सगळ्यांच्या आयुष्यात ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ विचारणारी जुनी-जाणती, अनुभवी जीवापासची माणसं सावलीसारखी सदोदित येत राहोत. वेळ आल्यावर दुसऱ्याला असं विचारण्याची संवेदनशीलता प्रत्येकात टिकून राहो...

ट्रेनच्या खिडकीजवळच्या सीटवर बसल्यावर एकाएकी प्रकर्षाने कवी ‘बी’ यांच्या ‘माझी कन्या’ या कवितेतल्या ओळी ओठांवर आल्या आणि कानात वाजूही लागल्या. मला मन आणि मेंदूचं हे एकमेकांना सोबत करत चालणं भारी आवडतं. काही एक आठवलं की त्या गोष्टी कुणाच्या आवाजात, कधी, कुठे, कशा ऐकल्या ते झरझर नजरेसमोरच येतं.

कानात वाजू लागतं. तसंच त्या कवितेचं झालं. कुठल्याशा सकाळी आमच्या गावच्या घरी आप्पा म्हणजे माझे आजोबा त्यांच्या विशिष्ट पद्धतीने मांडी घालून बसलेत, देवपूजा झाली आहे आणि गुणगुणतायत,

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या

असं दृश्य नजरेसमोर तरळून गेलं. आठवणींची गाडी भूतकाळाच्या स्टेशनात क्षणार्धात पोहोचली.

माझ्या वयाच्या इतरांची या कवितेशी ओळख ते सातवीत असताना झाली असेल. माझ्या आजोबांची आणि या कवितेची ओळख ते शाळेत होते तेव्हाची. त्यांना शाळेत अभ्यासाला असलेल्या या कविता वयाच्या ८६ व्या वर्षी तोंडपाठ असणं म्हणजे त्यांच्या तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्तीचा पुरावाच.

त्यांच्या मोठ्याने कविता चाली लावून म्हणण्यामुळे ‘माझी कन्या’ ही कविता माझ्यापर्यंत शाळेतल्या मराठीच्या पुस्तकाआधीच पोहोचली. प्रत्येकाला आपल्या जवळची व्यक्ती कधी ना कधी भारी वाटलेली असते. मला आप्पांच्या पश्चात दोन वर्षांनी ते असे कविता म्हणताना आठवले आणि खूप भारी वाटले. खरोखरच गाई पाण्यावर येतील की काय, अशी अवस्था झाली; पण चिडून, रागाने नव्हे तर समाधानाने.

कान आप्पांच्या आवाजात ती कविता ऐकायला म्हणून मागत होते. त्यांचा आवाज तर, आजारपणात क्षीण होत गेला होता, ते खूप दूर निघून गेले होते. त्यांच्या आवाजातला ताजेपणा रेकॉर्डरमध्ये कैदच केला नव्हता आणि आता तर सगळंच सुटून गेलं होतं. एखाद्या धाग्याचं रीळ बरंच लांबवर घरंगळत जावं आणि नंतर खूप धागा गुंडाळावा लागावा, तसं जीवाचं होऊन बसलं.

एव्हाना ट्रेन स्टेशनातून बाहेर पडली होती. भानावर येणं गरजेचं होतं; पण मन अजून विचारत होतं, गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? शेवटी युट्युबवर कविता शोधली, ऐकली, कानांची तहान भागवली. तेव्हा कविता ऐकताना सहज वाटून गेलं... एकट्यात म्हणा, चारचौघात म्हणा ज्यांना रडता येतं ती माणसं भाग्यवान असतात; पण त्याही पलिकडे ज्यांना गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या, हा प्रश्न माणसं विचारतात, विचारू शकतात ती अधिक भाग्यवान असतात.

रुटीन सांभाळताना, हजारो व्याप आणि जबाबदाऱ्या हाताळताना, व्यवहार जगताना आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाचा जीव कदरतो, अशक्य चिडचिड होते, वा वागण्या-बोलण्याचं ताळतंत्र सुटतं अशावेळी माणूस फक्त ओझी वाहत राहतो. रडू कोंडून आणि आवरून धरतो. तेव्हा तेव्हा त्याला खरी गरज असते, कुणी आपणहून विचारण्याची.

तुझं काही बिनसलंय का? काही खुपतंय का? चार प्रश्न विचारत बोलतं करण्याची. नेमकं तेव्हाच माणसं जजमेंटल होतात. त्या क्षणाच्या एका ठोक्यात माणसाच्या असण्या-नसण्याविषयी ठोकताळे बांधून मोकळे होऊन जातात. अशा सगळ्यामुळे माणसाचं मन ठेचकाळतं, आतल्या आत स्फुंदत राहतं.

कित्येकांचं मन तर वाढत्या वयाबरोबर आणि येणाऱ्या कटू अनुभवांसोबत कोडगं होत जातं. अशा सगळ्यांच्या आयुष्यात ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ विचारणारी जुनी-जाणती, अनुभवी जीवापासची माणसं सावलीसारखी सदोदित येत राहोत. आणि वेळ आल्यावर दुसऱ्याला असं विचारण्याची संवेदनशीलता प्रत्येकात टिकून राहो. कारण असं खुपदा होतं की, माझ्या कठीण काळात कुणी होतं का माझ्यासोबत, मीच केली ना मला सोबत असं म्हणून आपण माणसांना धीर देण्यापासून कचरतो.

रडणं, रागावणं, रुसणं हे आयुष्य रोचक बनवणारे स्वभावगुण फक्त स्त्रीच्याच नव्हे, तर पुरुषाच्याही अंगी असतात. फरक इतकाच दोघांच्या मनाची संपृक्तावस्था येण्याची वेळ वेगळी असते. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा समोरच्याची मर्जी राखून, त्याच्या कलाने घेऊन नक्की विचारा, ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांत चमक हवी, स्वप्नं रुजण्यासाठी ओल हवी, ते कोरडे नकोत आणि मनाच्या विहिरी सहभावनेने ओतप्रोत भरलेल्या हव्यात.

दुखरी, ठेचकाळलेली मनं हळूहळू क्रोधाकडे झुकतात. या दुखऱ्या मनांवर फुंकर घालण्यासाठी लागणारे चार शब्द प्रत्येकाकडे नक्कीच असतात. दुःखाच्या निरगाठी होऊ द्यायच्या नसतील, तर जबाबदारीने झुकलेले आपले आणि इतरांचे खांदे नेहमी झुकत जावेत, हा काही नियम नाही.

त्या दोन खांद्यांवरचा भार एकमेकांशी बोलून जरा हलका करताच येतो. आणि त्यातला एक खांदा अधूनमधून रडणं कोंडून ठेवलेल्या जीवांची गदगद दूर करून, त्यांच्या आसवांनी भिजवून घेतल्याने काही एक उणं होत नाही. उलट साचलेपण दूर होऊन, खळाळतं हसू चेहऱ्यावर विलसत राहण्याची शक्यता अधिक असते.

मनातल्या सगळ्या गाठी हळूहळू पिंजून त्यातली सरकी-सरकी बाजूला करावी आणि एक फुलवात वळावी, आपलं आणि दुसऱ्याचं मन सावरीच्या फुलागत हलकं हलकं करावं, हे वाटतं तितकं सोपं आणि आपण समजतो तितकं अवघड मुळीच नाहीये.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT