Chhatrapati Shivaji Maharaj esakal
सप्तरंग

छत्रपती शिवरायांना समजून घेताना...

शिवकाळाला साडेतीनशे वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेलाय. इतक्या वर्षांत या भूतलावर किती उलथापालथ झाली, किती माणसं जन्मली आणि मेली, किती गावं आणि शहरं लयाला गेली; तितकीच नवी उभारलीही.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

शिवकाळाला साडेतीनशे वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेलाय. इतक्या वर्षांत या भूतलावर किती उलथापालथ झाली, किती माणसं जन्मली आणि मेली, किती गावं आणि शहरं लयाला गेली; तितकीच नवी उभारलीही, किती राजे आणि सरकारं आली गेली, तंत्रज्ञानानं तर जणू आभाळ कवेत घेतलं तरीही या सगळ्या जगरहाटीत एक नाव मात्र सगळ्यांच्या हृदयावर पिढ्यानपिढ्या अढळ आहे ते म्हणजे ‘ छत्रपती शिवाजी महाराज’.

आजच्या आधुनिक युगात छत्रपती शिवरायांचं स्मरण करीत असताना, त्यांच्यासमोर नतमस्तक होत असताना जर त्यांना समजून घेता आलं, तर जगाच्या या पटलावर त्यांच्या विचारांचा अनुयायी म्हणून आपलंही नाव काळाच्या पटलावर कोरण्याचं सामर्थ्य अंगी येईल. मी शिवरायांचा किती मोठा मावळा आहे हे काही वस्तूंचा आधार घेऊन दाखवण्यापेक्षा जेव्हा ते आपल्या कृतीतून समाजाला दिसेल, तेव्हाच आपण त्यांच्या विचारांचे खरे अनुयायी झालोत असं समजावं.

आज डॉल्बीच्या मागं महापुरुषांच्या मूर्ती मिरवून आपण त्यांच्या आडून आपली नाचण्याची हौस तर नाहीत ना पूर्ण करत? जयंती म्हणजे नाचगाणं हा ट्रेंड तर नाही ना स्थिर होत? महाराष्ट्रातील बरीच शिवजन्मोत्सव मंडळं आता मिरवणुकीसोबतच पालखी सोहळे, व्याख्यानं, अन्नदान, वृक्षारोपण, दुर्गसंवर्धन असे नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून मंडळाच्या घटनेत शिवचरित्र असल्याची जाणीव करून देत आहेत.

त्या सर्वांचं कौतुकच पण अजूनही मिरवणुकीत सर्वांत पाठीमागं महापुरुषांची मूर्ती उभी करून समोरच्या डॉल्बीवर अर्थहीन गाण्यावर नाचणाऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. इथं नाचण्याला अजिबातच विरोध नाही. पण का? कुठं? कसं? आणि कोणत्या निमित्तानं नाचताय याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह असेल. जयंतीत नाचून नाचून मस्तक सुधारणार नाही पण ज्यांची जयंती साजरी करतोय त्यांचे विचार वाचून मात्र ते नक्की सुधारेल.

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास मला प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. त्या वेळी शिवरायांच्या प्रतिमा आणि मूर्तीच्या उदात्तीकरणासोबतच त्यांच्या विचारांचेही उदात्तीकरण होणे काळाची गरज असल्याचे मी सांगितलं.

आपल्या अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी महाराजांचं अश्वारूढ रूप भव्य स्वरूपात नजरेस पडणं गरजेचं आहेच पण त्यासोबतच जर त्यांचे तेजस्वी आणि महापराक्रमी विचार मेंदूत रुजवता आले, तर शिवरायांचे अनुयायीही नवा इतिहास घडवतील.

महापुरुषांच्या प्रतिमा आणि मूर्तींची विटंबना झाल्यावर ज्या तीव्रतेनं आपण निषेध व्यक्त करतो, निदर्शने करतो, समाजमाध्यमांवर व्यक्त होतो, तीच तीव्रता विचारांची विटंबना झाल्यावर का नसते? आपण डोक्यावर ज्यांना मिरवतो त्यांचा विचार डोक्यात घेऊन आपण का आचरण करत नाही? याचं उत्तर वाचनात आहे. आपले सर्व महापुरुष शरीरानं केव्हाच आपल्यातून निघून गेले आहेत. आज ते फक्त विचारांनी जिवंत आहेत. त्यामुळं जर त्यांना आपल्या मेंदूत पुन्हा जिवंत करायचं असेल, तर ते फक्त वाचनानंच शक्य होईल, हे ध्यानात घ्या.

शिवकालखंडात अफजलखानाचा वध केल्यावर, सुरतेची मोहीम फत्ते केल्यावर, आग्र्याहून सुटून सुखरूप राजगडावर पोहोचल्यावर महाराजांना किती जल्लोष करता आला असता पण ‘अपयशापेक्षा जो यश पचवतो तोच काळावर राज्य करतो’. शिवचरित्रातली ही शिकवण अगदी छोट्याशा यशात सुद्धा हुरळून जाणाऱ्यांना शिकण्यासारखी आहे.

तसेच मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंहांसोबत पुरंदर येथे झालेल्या तहात महाराजांना त्यांचे तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले, तहात स्वराज्याच्या आर्थिक नाड्याही तोडल्या गेल्या, पण अशाही परिस्थितीत महाराजांनी संयमानं हे अपयश पचवलं आणि आग्र्याहून सुटून आल्यावर अवघ्या आठनऊ वर्षांत गमावलेल्या सर्व किल्ल्यांसह सुमारे साडेतीनशे बलाढ्य किल्ले जिंकून घेतले.

‘संकटांना न डगमगता जर लढण्याची उमेद जागी ठेवून आपण रणांगणात शड्डू ठोकून उभारलो, तर गमावलेलं सगळं काही पुन्हा जिंकता येतं,’ हे छत्रपतींकडून शिकायला मिळतं.

मी शिवजयंतीनिमित्त जिथं जिथं व्याख्यानासाठी गेलो, तिथं खूप सकारात्मक बदल मला पाहायला मिळाला. सर्वच वयोगटातील श्रोत्यांवर शिवचरित्र परिणाम करताना जाणवलं. व्याख्यानानंतर कितीतरी दिवसांनी श्रोते फोनवरून किंवा समाजमाध्यमातून संपर्क करून व्यसन सोडल्याचं सांगतात, डॉल्बी बंद केल्याचं सांगतात, समाजोपयोगी उपक्रम राबविल्याचं सांगतात, आत्महत्येचा विचार सोडल्याचं सांगतात, नैराश्यातून बाहेर आल्याचं सांगतात. हीच ताकद आहे शिवचरित्राची.

मुळात आईच्या पोटात असल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा आपल्यावर गर्भसंस्कार झालेला असतो त्यामुळे नेणतेपण असू द्या किंवा जाणतेपण शिवरायांचा जयघोष कानी पडला की अंगावर आपसूक काटा उभारतो. म्हणूनच शिवराय कसं जगले, कसं वागले, कसं लढले हे जेव्हा श्रोते शब्दांतून ऐकतात, तेव्हा आयुष्यात त्यातला एकतरी विचार मनात रुजतोच आणि मग शिवचरित्रातला तो एखादा विचार सुद्धा आयुष्य बदलायला पुरेसा ठरतो.

महाराजांना अवघ्या पन्नास वर्षांचं आयुष्य मिळालं पण एवढ्यातही कितीतरी वेळा मृत्यूला त्यांनी धोबीपछाड देऊन एकाच वेळी अनेक शत्रूंसोबत लढण्याचं सामर्थ्य अंगी बाळगले. म्हणूनच जे जे शिवचरित्र अंगीकारतात त्यांच्याही अंगी एकाच वेळी अनेक संकटांशी सामना करण्याचं बळ येतं. त्यांच्यात बहु आघाड्यांवर काम करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं.

पुतळे, प्रतिमा, झेंडे, जिरेटोप, कवड्याची माळ, सिंहासन, किल्ले, तोफा, ढाली, तलवारी, घोडे या सगळ्या गोष्टींचे पावित्र्य ज्या एका नावात सामावले आहे त्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाच्या विचारांचं पावित्र्य जपणं हीच वर्तमान आणि भविष्यात आपली प्राथमिकता असली पाहिजे, कारण मूर्ती, स्मारकं, निशाण अमर नसतात पण विचार असतात म्हणून.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT