folk artists sambal sakal
सप्तरंग

लोककलावंतांची उपेक्षा

नेहमीप्रमाणं दुचाकीवरून कॉलेजला जात असताना गावाबाहेर पडताच उक्कडगाव रोडला एक गृहस्थ गळ्यात संबळ अडकवून चालत निघालेले दिसले.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

नेहमीप्रमाणं दुचाकीवरून कॉलेजला जात असताना गावाबाहेर पडताच उक्कडगाव रोडला एक गृहस्थ गळ्यात संबळ अडकवून चालत निघालेले दिसले. पुढं चालता चालता ते मागं वळून बघत होते. बहुधा त्यांना लिफ्ट हवी असावी हे कळल्यानं मी त्यांच्याजवळ गाडी थांबवली. हसऱ्या मुद्रेनं ते गाडीवर बसले. थोडं पुढं गेल्यावर मी त्यांची विचारपूस केली तेव्हा कळलं की ते उक्कडगावचे आहेत. गोंधळाच्या कार्यक्रमासाठी परगावी गेले होते.

पांगरीतून गाडी न मिळाल्यानं ते चालत निघालेले. सोमनाथ गोंधळी असं त्यांचं नाव. १९७२ ला आईवडील वारले आणि अंगठेबहाद्दर सोमनाथ त्यांच्या समाजातली गोंधळी कला सोबत घेऊन तुणतुणं, दिमडी आणि संबळ या तीन वाद्यांवर पोट भागवण्यासाठी उक्कडगावला विस्थापित झाले. बायको आणि तीन मुलांसह ते गेल्या तीस वर्षांपासून झोपडीवजा एका पत्र्याच्या खोलीत राहत आहेत.

पुढं मी त्यांना एकदोन गाणी आणि गवळणी ऐकून दाखवायची विनंती केली त्यांनीही दुसऱ्या क्षणात गाडीवरच त्यांची लोककला ऐकवायला सुरुवात केली ‘माझी येडामाई’ आणि ‘मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात’ ही दोन गाणी त्यांच्या मूळ चालीत गाऊन दाखवली. सोमा गोंधळीमामांची गाणी ऐकत ऐकतच माझी गाडी त्यांच्या गावच्या वेशीवर पोहोचली.

त्यांना तिथंच सोडण्याऐवजी हा कलावंत राहतो कुठं हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी मी त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडायला गेलो. गावाबाहेर असलेल्या शाळेच्या कोपऱ्याला त्यांची दहा बाय दहाची पत्र्याची झोपडी होती. मी गाडीवरून खाली उतरताच त्यांचं शेंडेफळ असलेलं पोरगं मला धावत येऊन बिलगलं. गोंधळीमामांच्या घरात डोकावून पाहिल्यानंतर ‘कला झोपडीत जन्माला येते,’ हे वाक्य अनुभवता आलं.

आत बसायला जागा नसल्यानं बाहेर उभा राहूनच गोंधळीमामासोबतच्या माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी सांगायला सुरुवात केली. ‘सायेब, आम्ही प्युअर गोंधळी हाव, आता आमची कला कुणीबी कराय लागलंय. जातिवंत कोणतंच ऱ्हायलं न्हाय बगा. खरा गोंधळ बाजूला ऱ्हायला आता नुसतं पिच्चर मदल्या गाण्यावर बाया नाचिवत्यात.

माझं येडंवाकडं घर हाय पर माझ्याकडं मुठीमुठी माणसं, सायेब लोकं येत्यात. म्या बी गोंधळाला पार मंबई, पुण्यापासून ती संभाजीनगरापस्तोर जाऊन आलोय. म्या आंगठेबहाद्दर हाय पण आख्खी रात गाणी म्हणाया सांगा म्या आन माझी बायकू उजडास्तवर गोंधळ घालताव.’

तंत्रज्ञानाच्या युगात अद्ययावत वाद्य आली, पियानो-बेंजो मिक्सरच्या आवाजात अस्सल लोककलेचा आवाज दबून जाऊ लागला. काव्यात्मकता पायदळी तुडवून, चाली बिघडवून फक्त ठेक्यासाठी नवनवीन गाणी लिहिली जाऊ लागली. आध्यात्मिक कार्यक्रमावरही मनोरंजनानं अतिक्रमण केलं.

देवादिकांचे पवित्र स्मरण करीत असतानाच जमलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी जागरणाच्या कार्यक्रमात चित्रपटातल्या गाण्यांच्या फर्माइशी व्हायला लागल्या, त्यांना चांगल्या बिदाग्या मिळू लागल्या, लोकं डान्सबारमध्ये पैसे उडवल्यासारखं वागायला लागले पण दुसरीकडं अस्सल जुनी कला सादर करणाऱ्या कलावंतांना मात्र तुटपुंजं मानधन देऊन बोळवण केली जाऊ लागली.

काळाच्या बदलत्या ओघात लोकांच्या चवी बदलणार यात दुमत नाही पण यात जुनी संस्कृती टिकवून, वारसा जपलेल्या सोमा गोंधळींसारखे कलाकार झोपडीतून पक्क्या घरात कधी येणार ? त्यांच्या मुलांनीही त्यांचा हाच वारसा पुढं चालवावा का शिकून सवरून नोकरदार व्हावं? श्रद्धा मनोरंजनाचं साधन झालीयं का?

गोंधळी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, ना कोणत्या कलाकाराला सरकारच्या वतीनं मानधन सुरू झालंय, ना त्यांच्यासाठी असलेली योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हालगीवाले, संबळवाले असे अनेक लोककलावंत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही विकासाच्या बाबतीत उपेक्षित असल्याची माहिती गोंधळी समाजातले सामाजिक कार्यकर्ते सतीश लोंढे यांनी दिली.

सततच्या जागरणामुळं जडलेली व्यसनाधीनता, आजारपण यामुळं गोंधळ्यांचं सरासरी आयुष्मान पन्नास वर्षांचं झालंय. संस्कृती टिकावी म्हणून तुटपुंज्या मानधनावर तर कधी कधी फक्त भाकरी, पीठ आणि मिठावर गोंधळीबुवा अहोरात्र सेवा करतात. त्यांच्या आयुष्यातला गोंधळ कमी होऊन त्यांच्या पुढच्या पिढीनं तरी शांततेत जीवन जगावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. बाकी जागरण गोंधळात वातीवर तेल घातल्यावर जशी ज्योत झळाळते, तशीच गोंधळी समाजातील नवी पिढी मुख्य प्रवाहात येऊन तेजाळावी याचसाठी आजचा हा शब्दप्रपंच.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि पीकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT