जोखड भिरकावण्याचं आव्हान! sakal
सप्तरंग

जोखड भिरकावण्याचं आव्हान!

सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आदिवासी अन् वेठबिगारांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा दिला.

अवतरण टीम

वाटेवर काटे वेचीत चाललो

विवेक पंडित

pvivek2308@gmail.com

सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आदिवासी अन् वेठबिगारांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा दिला. कवी अनिल यांच्या ‘वाटेवर काटे वेचीत चाललो...’ कवितेप्रमाणे ते मोठमोठ्या संकटांचा सामना करत एकेक पाऊल पुढे टाकत राहिले. वेठबिगारांना मालकांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं. त्यादरम्यान पंडित यांनी अनुभवलेला संघर्ष लढा आजपासून दर शनिवारी त्यांच्याच शब्दांत...

धावा, धावा... धरा, धरा... ससा पळाला, ससा पळाला... धरा...’ मी मोटरसायकलवर होतो. माझ्या मागे सेवानिवृत्तीनंतर संघटनेत सहभागी झालेले निवृत्त तहसीलदार रा. वि. भुस्कुटे म्हणजेच भुस्कुटे भाऊ होते; तसेच वन विभागाच्या वनरक्षकाची नोकरी सोडून संघटनेत आलेला महादू जाबरही होता. आमचा पाठलाग करीत शे-दीडशेचा जमाव पाड्याच्या दिशेने धावत आला. त्यांच्या हातात ट्युब्ज, सळ्या, दांडके, कुऱ्हाडी, दगड अशी निरनिराळी हत्यारं होती. एकच आरडाओरडा करीत सर्व जण आमचा पाठलाग करीत होते. एखाद्या सिनेमातल्यासारखा प्रसंग होता. मला धरून मारायला ते जीवाच्या आकांताने, त्वेषाने माझा पाठलाग करीत होते. आम्ही तिघं अन् ते शे-दीडशे. त्या दिवशी मृत्यू माझा पाठलाग करतोय, असं मला वाटलं; पण खरं तर मी जीवनाच्या दिशेने वेगाने जात होतो...

अडणे गावात संघटनेच्या बैठकीसाठी गेलो होतो. वेठबिगारांना मुक्त करण्याचं काम सुरू होतं. शेतावर राबणाऱ्या आदिवासी मजुरांना सरकारने दिलेलं किमान वेतन सात रुपये होतं. प्रत्यक्षात मात्र चार रुपये किंवा दोन पायली भात इतकंच वेतन दिलं जात होतं किंवा इतकीच मजुरी होती. सर्व मजुरांना संघटित करून किमान मजुरी मिळाली पाहिजे, यासाठी गावा-गावात संघटनेच्या सभा होत होत्या. त्यासाठी मुक्त झालेले वेठबिगार आणि शेतात राबणारे मजूर संघटित होत होते. वसई तालुक्यातील दहिसर, कणेर, देपिवली, माजिवली, अडणे, भाताणे, भिनार, मेढे इत्यादी निरनिराळ्या गावांमध्ये संघटनेची बीजं हळूहळू रुजायला लागली होती. आदिवासी संघटित होत होते. पिढ्यान् पिढ्या ज्यांनी मालकी गाजवली होती, तो मालकवर्गही संघटित होण्याचा प्रयत्न करून आम्हाला विरोध करायचा आटोकाट प्रयत्न करीत होता.

अडण्याच्या सभेला जाण्यासाठी आम्ही दुपारीच भाताणेमार्गे गेलो होतो. परत यायचाही तो एकमेव रस्ता होता. मी त्या गावात गेलो आहे आणि रात्री भाताणेमार्गे परतणार आहे, याची खबर भाताण्यातील मालकांपर्यंत पोहोचणं स्वाभाविक होतं. तशी ती खबर भाताणे गावाला लागली. आदिवासी समाजातील बहुसंख्य मजूर संघटनेत येत असतानाही काही जण मात्र भयापोटी मालकांच्या बाजूने असायचे. त्यातल्याच काही थोड्या बऱ्या असलेल्या रघू सायरे, विष्णू तुंबडा यांच्यासारख्या मालकधार्जिण्यांनी मी येणार असल्याची आणि भाताणेमार्गेच परत जाणार असल्याची खबर भाताणे गावच्या मालकांना आणि त्यांच्या मुलांना दिली होती.

संघटना झाल्यापासून आदिवासी गुलामीला विरोध करू लागला, आदिवासींची मुलं गुरं राखण्यास नकार देऊ लागली, मजुरी वाढवून मागायला लागली, ‘अरेला कारे’ करायला लागली... हे काही मालकवर्गाला सहन होण्यासारखं नव्हतं. कारण त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात येत होती, त्यांच्या सत्तेला हादरे बसत होते. त्या रात्री सात-आठच्या सुमारास भाताण्याच्या पाड्यात राहणारी यमुना दुकानावर काहीतरी आणण्यासाठी गेली होती. यमुना संघटनेची सभासद. निरक्षर; पण तल्लख... अडणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शे-दीडशे लोकांच्या हातामध्ये तिने हत्यारं पाहिली. ‘आज पंडितला सोडायचं नाही. आज त्याचं कामच काढायचं. त्याला जिवंत बाहेर जाऊच द्यायचं नाही’ ही त्या जमावाची कुजबुज तिने ऐकली होती. घरी येऊन ताबडतोबीने तिने तिच्या नवऱ्याला, लोड्यादाला म्हणजेच शंकर काटेला याला त्याबाबत सांगताच तो धावपळ करीत मला अडण्याला भेटायला आला. वाटेतच तो मला भेटला. आम्हाला त्याने थांबवलं. ‘भाऊ, आज तुम्ही थळ्याच्या पाड्याला राहा.’ अडणे आणि भाताणेच्या मधे थळ्याचा पाडा होता. ‘आज तुम्ही परत नका जाऊ... थळ्याच्या पाड्यालाच झोपा... सकाळी जा’ असा आग्रह करत त्याने मला सर्व हकिकत सांगितली. लोड्यादाही संघटनेचा सभासद... आडदांड आणि आक्रमक. मालकाच्या भयापोटीच्या मानसिक गुलामीतून नुकतेच मुक्त झालेले यमुना-लोड्यादा. मालकाच्या गुलामीचं जोखड भिरकावून दोघेही निडर झाले होते एव्हाना...

वर्षभर झालं होतं, आजूबाजूच्या वेठबिगारांना मुक्त केलं होतं. लोक संघटित होत होते. शांतपणे मालकांचे हल्ले, मारहाण पचवत होते; पण आम्ही कोणालाही कोणावर हात उगारू दिला नव्हता. ‘लोड्यादा, मला कशाला मारतील ते? आपण काय बिघडलंय त्यांचं?’ मी लोड्यादाला समजावयाचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. लोड्यादा मला हात जोडून विनंती करीत होता, ‘भाऊ, नका जाऊ...’ जणू तो स्वतःच्या आयुष्याची याचना करीत असावा इतका अगतिक झाला होता. आम्हाला तिघांनाही असं वाटलं, की नेहमीच अशा गावा-गावात बातम्या यायच्या. ‘आज पंडितचे हात-पाय तोडून टाकू. कसा गावात येतो बघू...’ पण ती आव्हानं स्वीकारतच आम्ही गावा-गावात जात होतोच. ‘अजून तरी असा कोणी प्रयत्न केला नव्हता, हीसुद्धा तशीच अफवा असावी. मारणारेच असतील तर मी मरायला तयार आहे. तुमचं काय?’ मी लोड्यादाला विचारलं. ‘भाऊ, तुम्ही जर मरणार तर लोड्यादा मागे राहील का? मीही मरायला तयार आहे,’ तो लागलीच म्हणाला. शेवटी, लोड्यादाच्या सांगण्यावरून मुख्य रस्त्यावरून जायच्या आधी एका मैदानातून पाड्याकडे रस्ता जायचा ती वाट पकडायचं ठरवलं. ‘तेथील पायवाटेने मी मोटारसायकल घ्यावी आणि मुख्य रस्त्याकडे न जाता पाड्याकडे जावं आणि मग पाड्याचे लोक मला सुरक्षित घेऊन जातील’ ही लोड्यादाची सूचना मी त्याच्या आग्रहाखातर अखेर मान्य केली. लोड्यादा आमच्या आधी धावपळ करीत पाड्याच्या दिशेने गेला. मी मोटरसायकल चालवत निघालो आणि समोर पाहतो, तर लोड्यादाने दिलेल्या माहितीप्रमाणे जमाव सर्व शस्त्रानिशी उभा ठाकलेला आणि आरडाओरडा करीत असलेला मला दिसला. प्रसंगावधान राखून मी मोटरसायकल ताबडतोबीने उजव्या बाजूने पाड्याच्या दिशेने वळवली.

सशाची शिकार करताना त्याची खोड काढली जाते, त्याला दगड मारले जातात, त्याला पळायला लावतात आणि तो एकदा का पळायला लागला, की मागून त्याचा पाठलाग करतात... तो कोणत्या वाटेने जाणार त्याचा अंदाज घेऊन जाळी लावून ठेवली जाते, त्याला वाघुर म्हणतात. ससा त्या दिशेने जाताच तो त्या वाघुरामध्ये अडकतो आणि मग लाठ्याकाठ्यांनी त्याला जायबंदी केलं जातं आणि मारलं जातं. सशाची शिकार ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने जमावाने माझी शिकार करायची ठरवली होती, हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं होतं. माझ्या परतीच्या रस्त्यावर जमाव उभा होता. मी उजवीकडे वळताच जमाव माझा पाठलाग करीत पाड्यापर्यंत आला. पाड्याच्या लोकांना आधीच खबर मिळाली असल्याने लोड्यादा, त्याची बायको यमुना, बाळा लहांगे, बापू पागे, भुऱ्या मुकणे, काशिनाथ पागी, यशवंत, लक्ष्मण, पाड्यातले जवळपास सर्व जण पाड्यावरच जमले होते. मला पाहताच राजदूत थांबवून यमुना भीतीने मला खेचून घट्ट मिठीत धरून तिच्या घरात घेऊन गेली. माझ्या पाठोपाठ भुस्कुटे भाऊ, महादूही आले.

जमावाचे नेतृत्व प्रभाकर कासार, सुनील खोत आदी मंडळी करत होते. त्या भागात केवळ काँग्रेस पक्षाचाच बोलबाला होता. ज्यांच्यावर वेठबिगारीचे गुन्हे दाखल झाले ते सर्व मालक काँग्रेसचेच होते. तेव्हा सरकारही काँग्रेसचं होतं. प्रशासनावर अंकुश त्यांचाच होता. ते प्रशासनाच्या द्वारे आमच्यावर सर्व पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होतेच; शिवाय आम्हाला ठार मारण्यासाठी त्यांनी ज्या गावात संघटना जाईल तिथे शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या. मालक काँग्रेसमध्ये, मात्र त्यांची सर्व मुलं त्यांनी शिवसेनेत पाठविली. एका बाजूला मालकांकडून सत्ताधारी काँग्रेसमार्फत; तर दुसऱ्या बाजूला मालकांच्या मुलांकडून विरोधी पक्षातील सेनेमार्फत आम्हाला कडवा विरोध होत होता. आम्हाला चेतावणी देऊन उद्युक्त केलं जात होतं, जेणेकरून आमच्या प्रतिक्रियेत काहीतरी आगळीक झाली, तर सरकारमार्फत आम्हाला नक्षलवादी ठरवून संपवून टाकायची रणनीती अवलंबली जात होती. तशी सर्व प्रकारची तजवीज दोघांमार्फत केली जात होती. शिवसेनेचे वसई तालुक्याचे त्यावेळचे प्रमुख धर्माजी पाटील काही दिवसांपूर्वीच भाताणे गावात आले होते व ‘काहीही करून पंडितचा बंदोबस्त करा’ असा आदेश देऊन गेले होते. त्यानुसारच हा हल्ला नियोजित केला गेला होता.

जमावाने आम्ही पाड्यात जाताच संपूर्ण पाड्याला घेराव घातला. मालकांचे नेतृत्व करत असलेला प्रभाकर कासार लोकांना येऊन धमकावू लागला. ‘पंडितला आमच्या ताब्यात द्या. नाही तर सगळ्या पाड्याला आग लावून टाकू. आज पंडितचे तुकडे करणार आणि दारूबरोबर चाखना करणार...’ लोड्यादावर दबाव वाढत होता; पण तो खंबीर होता. पाड्यावर मोजून पंधरा-वीस कुटुंबं आदिवासींची... त्यात काही मालकांना सामील असलेली... जे काही संघटनेत होते, ते सर्व भयभीत होते. लोड्यादाने सांगितलं, की ‘तुम्ही आग लावा, काहीही करा... आम्ही भाऊला तुमच्या ताब्यात देणार नाही.’ लोड्यादा एखाद्या निश्चल कातळासारखा धीटाने लढत होता. शे-दीडशेच्या सशस्त्र जमावासमोर एकटा लोड्यादा आणि त्याच्या सोबतीला मोजके आदिवासी... पाठीशी कोणता राजकीय पक्ष नाही की सरकार तर नाहीच नाही.

मला जरी लोड्यादाच्या घरात कोंडून ठेवलं होतं, तरी बाहेरचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता. लोड्यादा काटेला हा मजबूत गडी होता. भीती कशाशी खातात, हे त्याला माहितीच नव्हतं. अंगाने धष्टपुष्ट... त्याचा आवाज जसा चढू लागला तसं जमावातलेही काही जण आवाज चढवू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इथे काहीतरी अघटित होईल. म्हणून मी स्वतःहून झोपडीच्या बाहेर गेलो आणि पाहतो तर एक मोठा जाडजूड दांडा उचलून लोड्यादा प्रभाकर कासारच्या डोक्यात घालण्याच्या तयारीतच होता. जर तो फटका प्रभाकर कासारला बसला असता तर तो जागीच ठार झाला असता. मी ताबडतोब लोड्यादाला धरलं आणि प्रभाकरपासून दूर नेलं. लोड्यादा माझ्यावर वैतागला होता, ‘भाऊ, कशाला रोखलं तुम्ही? आता यांचं कामच काढतो.’ त्याला मी समजावून सांगितलं... ‘लोड्यादा, आपली लढाई दूरची आहे. आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे. आताशी कुठे सुरुवात झाली आहे. आता जर आपल्या हातून काही विपरीत झालं तर सर्व जण आपल्याला संपवून टाकतील. पाटलांनी केलेले सगळे गुन्हे माफ होतील. मात्र, आपला छोटासा गुन्हा असला तरी त्याचं भांडवल केलं जाईल. प्रभाकर मेला जरी नाही तरी आपण त्याच्यावर हल्ला केला, याचीच मोठी बातमी होईल. त्याने मला मारून टाकलं तरी बातमी होणार नाही; पण आपल्या हातून काही विपरीत झालं तर त्याची बातमी जरूर होईल; कारण सरकार त्यांचं आहे. नंतर हेच सरकार तुम्हाला सर्वांना त्रास देईल. आपल्याला संघटना करता येणार नाही. सरकारच्या हातात खूप बळ आहे. ते येईल आणि तुम्हा सर्वांना, आपल्याला चिरडून टाकतील. आपण आता शांत राहूया, बचाव करू फक्त. पुढे आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि ती आपण कायद्याने लढू...’ मी कसंतरी लोड्यादाला समजावलं.

आदिवासी पाड्यातील लोकांनी प्रभाकर कासारला ढकलत बाहेर नेलं. जमावातील बरेच जण दारूच्या नशेत तर्रर्र होते. हातात सळया आणि ट्युब्ज घेऊन आरडाओरडा करीत होते. त्यातच शाखाप्रमुख सुनील खोतही होता. यशोदाने हिंमत करून त्याला ढकललं. तीन गटांगळ्या त्याला खाव्या लागल्या. मधू पुढे आला. मधूसुद्धा धडधाकट. लोड्यादाला सांगू लागला, की ‘पाड्याच्या बाहेर सगळे बसले आहेत. फक्त भाऊंची परवानगी घे. जरी ते शंभर-दीडशे लोक असले तरी आम्ही पंधरा-सोळा जण त्यांचं काम काढू शकतो.’ लोड्यादाने मला विचारलं... ‘आपल्याकडून काही आगळीक व्हायला नको, संयम पाळा,’ मी म्हटलं. (क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT