MK Stalin Sakal
सप्तरंग

दक्षिणेचा नवा थलैवा !

देशाच्या राजकीय क्षितिजावरील दक्षिणेकडचा आश्‍वासक चेहरा म्हणून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नाव पुढे येत आहे.

वॉल्टर स्कॉट

देशाच्या राजकीय क्षितिजावरील दक्षिणेकडचा आश्‍वासक चेहरा म्हणून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नाव पुढे येत आहे. देशाच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधी त्यांना लाभली आहे. मात्र काहीही करून ही संधी साधायचीच अशा भावनेनं ते या संधीकडे पाहत नसून या संधीबाबत ते फारच सावध आहेत. तामिळनाडूमध्ये आधी स्थिर होऊन तेथे उत्तम सरकार देऊन मग राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावायची अशी त्यांची योजना आहे. तमिळनाडूच्या राजकारणात एम. करुणानिधी आणि जयललिता या दोन अत्यंत प्रभावशाली अशा नेत्यांच्या निधनानंतर वास्तववादी राजकारणाला सुरुवात झाली आहे. खरे तर दक्षिणेकडे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी देशाच्या राजकारणात मोठी भूमिका बजावायची तयारी केली होती; पण त्यांचा पराभव झाल्याने त्यांची संधी हुकली. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आपल्याला राज्यापुरते मर्यादित ठेवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्टॅलिन यांनी चमकदार कामगिरी करून आपल्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट सत्ता मिळविली. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या आशा वाढल्या.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची आघाडी तयार करण्याचा मनसुबा सध्या रचला आहे. त्यादृष्टीने त्यांची आखणी सुरू आहे; पण या सगळ्या घडामोडींमध्ये स्टॅलिन यांनी स्वतःला वेगळे ठेवले आहे. आपल्या राज्याकडे अधिक लक्ष देत तेथील स्थान बळकट करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. सत्ता स्वीकारल्यानंतर त्यांनी सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मात्र आपल्या भूमिकेत बदल करीत त्यांनी संघर्षाचा पवित्रा बदललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपल्या आक्रमक धोरणाला तात्पुरती का होईना मुरड घातली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जी आश्‍वासने दिली त्यांची पूर्ती करण्यासाठी त्यांना केंद्राची मदत लागणार आहे याची जाणीव असल्याने त्यांनी आपल्या धोरणात बदल केला आहे. त्यांचे वडील करुणानिधी यांनीदेखील राष्ट्रीय राजकारणात फारसे लक्ष घातले नव्हते.

राजकीय विश्‍लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार मणी यांनी स्टॅलिन यांच्या वाटचालीबद्दल भाष्य करताना जे मत नोंदविले आहे ते महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते स्टॅलिन भाजपबरोबर भविष्यात युती करणार नसले आणि कॉंग्रेसबरोबरच युती कायम ठेवणार असले, तरीही आताच्या घडीला भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका न घेण्याचाच त्यांचा कल आहे. आपला मुद्दा स्पष्ट करताना मणी सांगतात ‘‘ खरे तर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं स्टॅलिन यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता. जागावाटपाच्या लढाईत कॉंग्रेस अत्यंत आक्रमक होती. जागावाटपावरून कॉंग्रेसबरोबरची युती जर स्टॅलिन यांनी तोडली असती तर अल्पसंख्य समाजाच्या मनात संशय निर्माण होऊन मतदानात त्याचा फटका बसला असता. हे टाळण्यासाठी स्टॅलिन यांनी युती कायम राखत निवडणुकीपूर्वीची एक लढाई जिंकली होती. युती तुटली असती तर स्टॅलिन यांना भाजपबरोबर जायचे आहे असे वातावरण निर्माण झाले असते आणि अशी प्रतिमा उभी राहणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे जागावाटपात नुकसान सोसून स्टॅलिन यांनी निवडणुकीपूर्वीची धोरणांची लढाई जिंकली होती.’’ मणी यांच्या दृष्टीने हे धोरणयुद्ध आणि प्रतिमानिर्मितीचा खेळ खूप महत्त्वाचा होता. त्यात स्टॅलिन यांनी बाजी मारली आहे.

निवडणुकीनंतर आपल्या मित्रपक्षातील कोणाला वगळून नव्याने कोणाशी युती करण्याचा मानस नसल्याचे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचे प्रवक्ते आय. रवींद्रन यांनी तसे जाहीररीत्या सांगितलेआहे. खरे तर ‘विधुलाई चिरुथलागन काची’(व्हीसीके) या मागासवर्गीय समाजाच्या पक्षाला आघाडीतून वगळावे यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातला अंतर्गत दबाव मोठा होता. ‘पट्टली मक्कल काची’ या पक्षाला आघाडीत सामावून घेण्यासाठी अनेक प्रमुख नेत्यांचा आग्रह होता; पण स्टॅलिन यांनी हा दबाव झुगारून देत निवडणूकपूर्व आघाडीतील मित्रपक्षाला आघाडीत कायम ठेवणे यालाच प्राधान्य दिले. त्याचबरोबर डीएमडीकेचे अध्यक्ष विजयकांत हे आजारी असताना त्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मित्रपक्षांमध्ये मैत्रीचे बंध पक्के असल्याचा संदेश दिला. हे करीत असताना आधीच्या सरकारने वन्नीयार समाजाला जे आरक्षण दिले होते, तो निर्णय न बदलता सामाजिक अभिसरणाचे समीकरण कायम ठेवले. या सर्व घडामोडी ते जाणीवपूर्वक राबवीत आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाचे स्थान बळकट करायचे आहे. आपल्या कारभाराला १०० दिवस पूर्ण करताना त्यांनी विरोधकांनाही नेमका इशारा दिला आहे.

अण्णा द्रमुकचे नेते ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या चौकशीसंदर्भात राज्यपालांकडे काही फायली देऊन त्यांनी विरोधकांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनादेखील स्टॅलिन यांना दुखवायचे नाही, असे संकेत मिळत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी तमिळनाडू विधानसभेच्या शताब्दीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून करुणानिधी यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून द्रमुकवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकची पाठराखण करतानाच स्टॅलिन यांच्याशी संघर्षाचा पवित्रा घेतला जात नाही.

स्टॅलिन यांना राज्यात आपले काम करता येईल आणि राज्याचे निर्विवाद नेते म्हणून आपले स्थान बळकट करता येईल अशी परिस्थिती आहे. जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील अण्णा द्रमुक या प्रमुख विरोधी पक्षाची अवस्था कमकुवत झाली असून, पक्षातील नेत्यांना एकत्र ठेवणे व शशिकला यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे या दोन आघाड्यांवर अण्णा द्रमुकच्या प्रमुख दोन्ही नेत्यांना लढावे लागत आहे. सध्या तरी केंद्राच्या दबावाने शशिकला यांनी गप्प राहणे पसंत केले आहे; पण सत्तेअभावी आणि जयललिता यांचा करिष्मा नसल्याने अण्णा द्रमुक फारसा आक्रमक राहिलेला नाही. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर स्टॅलिन दिवसेंदिवस राज्यात आपले पाय भक्कम रोवत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT