carlos alcaraz sakal
सप्तरंग

अल्काराझचा अश्वमेध सुसाट

सुनंदन लेले saptrang@esakal.com

रॉजर फेडरर निवृत्त झाला, नदाल दुखापतींनी बेजार झालाय आणि जोकोविचचं वय झपाट्यानं वाढत चाललं आहे. नवीन खेळाडू आहेत पण त्यांच्यात सातत्य राखण्याची क्षमता दिसत नाहीये... काय होणार पुरुषांच्या टेनिसचं. का महिलांच्या टेनिसची झालेली गत होणार आहे, २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलो असताना मी काळजीनं माझ्या प्रशांत लेले नावाच्या मित्राला विचारत होतो.

प्रशांत म्हणाला, अजिबात काळजी करू नकोस. मला दोन नावे स्पष्ट दिसत आहेत जे योग्य प्रगती करतील आणि प्रस्थापितांना धक्का देतील, एक आहे यानिक सिन्नर आणि दुसरा आहे कार्लोस अल्काराझ. यातील अल्काराझच्या बाबतीत मला खात्री आहे आणि सिनरच्या बाबतीत आशा आहे.

तुम्ही म्हणाल, की ‘लेले’ आहे म्हणून तुम्ही उगाच कौतुक करत आहात आणि त्याचं मत आम्हाला सांगत आहात. तसं अजिबात नाही. प्रशांत लेले साधा माणूस नाही. पहिला पक्का पुणेकर, प्रशांत लेले स्वत: चांगला क्लब पातळीचा टेनिस खेळाडू आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रशांत लेले विम्बल्डनला लाइन अंपायर म्हणून कित्येक वर्ष काम करत होता.

विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यांपर्यंत त्यानं लाइन अंपायरचं काम केलंय. खेळाडूंना खेळताना पाच फुटांच्या अंतरावरून बघितल्यावर प्रशांतनं ही भविष्यवाणी केली होती म्हणून मला त्यात उत्सुकता वाटू लागली होती. ही गोष्ट २०२१ मध्ये झाली आणि लगेच पुढील वर्षी २०२२ साली अल्काराझने अमेरिकन खुली स्पर्धा जिंकून पहिलं ग्रँन्ड स्लॅम विजेतेपद आपल्या नावे केलं.

कार्लोस अल्काराझ गोन्सालीझ आणि व्हर्जिनियाला २००३ मध्ये ५ मे रोजी अपत्य झालं, ज्याचं नाव कार्लोस अल्काराझ गार्फीया ठेवले गेले. वडील कार्लोस अल्काराझ गोन्सालीझ स्वत: क्लबमध्ये टेनिस खेळायचे आणि नवोदितांना थोडं शिकवायचे. त्यांनी कार्लोस अल्काराझ गार्फीयाच्या हाती वयाच्या चौथ्या वर्षी टेनिसची रॅकेट दिली.

मासा पाण्याशी जुळवून घेतो तसे कार्लोसनं टेनिस रॅकेट आपलीशी करून घेतली. कार्लोसची प्रगती अगदी झपाट्यानं चालू झालेली बघून कार्लोस अल्काराझ गोन्सालीझनं हुशारीनं त्याची भरती स्पेनचा महान माजी खेळाडू जुआन कार्लोस फरेरोच्या टेनिस अकादमीत केली.

फरेराच्या अकादमीत आल्यापासून जाणत्या गुरुला मेहनती शिष्य मिळाला. सूर जुळले आणि महान टेनिसपटूची जडणघडण सुरू झाली. सुनियोजित मेहनतीनं प्रगतीच्या रस्त्यानं जाऊन प्रवास केल्यानं सतराव्या वर्षी कार्लोसनं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या मुख्य यादीत प्रवेश मिळवला. जेव्हा वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कार्लोसनं मद्रीद खुल्या स्पर्धेत रफाएल नदालला मातीच्या कोर्टवर पराभूत केलं तेव्हा टेनिस जगताला मान वळवून कार्लोसकडं बघावं लागलं.

२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवास केलेल्या कार्लोसनं त्याच वर्षीच्या शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत कमाल करून दाखवली. अमेरिकन खुल्या स्पर्धेत कॅस्पर रूडचं आव्हान चार सेटमध्ये मोडून काढत कार्लोसनं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं. त्या विजयानं त्याचा आत्मविश्वास वाढला.

नवा विक्रम प्रस्थापित करताना वयाच्या १९ वर्ष ४ महिने आणि ६ दिवसांचा असताना कार्लोसनं जोकोविचच्या जागी जागतिक क्रमवारीत आपले अव्वल स्थान नक्की केलं. पुढील वर्षी कमालीचं सातत्य दाखवत कार्लोस अल्काराझनं फ्रेंच आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आणि विम्बल्डन चक्क जिंकून दाखवले. मोठा टेनिस स्टार उदयाला आल्याची ती सुस्पष्ट निशाणी होती.

एकदोन विजेतेपद पटकावून नंतर फॉर्म संपल्याचं बऱ्याच खेळाडूंच्या बाबतीत दिसतं. तसेच काही खेळाडू असंही दिसतात की ते सतत उपांत्य पूर्व, उपांत्य किंवा अगदी अंतिम फेरी गाठतात पण ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याची क्षमता दिसत नाही. डेनिल मेदवेदेवबद्दल मला खूप सहानुभूती वाटते. इतका सातत्यानं चांगला खेळ करून हा खेळाडू मुख्य स्पर्धांच्या निर्णायक टप्प्यावर येतो पण शेवटचा दणका देताना तो कुठेतरी कमी पडतो. झ्वेरवेरचे किंवा त्सित्सिपास सारख्या दर्जेदार खेळाडूंचं तसंच होताना दिसतं.

यानिक सिन्नर आणि अल्काराझ दोनच खेळाडू असे वाटतात जे अंतिम ध्येय गाठू शकतात. खास करून नोवाक जोकोविचसारख्या तरबेज खेळाडूला पराभूत करताना लागणारं कौशल्या दमसास आणि प्रदीर्घ रॅलीज करताना दाखवावं लागणारं सातत्य सिनर आणि कार्लोस अल्काराझमध्येच दिसते आहे.

२०२२ पर्यंत कार्लोस अल्काराझ खेळताना स्पॅनिश बुल म्हणजे प्रत्येक गुण खेळताना अखेरपर्यंत लढणारा खेळाडू वाटत होता. २०२३ मध्ये त्यानं जोकोविचला पराभूत करून विम्बल्डन विजेतेपद जिंकले, त्या वेळी बक्षीस समारंभात जोकोविचने कौतुक करताना, अरे किती पळतोस... जरा एकदोन गुण सहजी दे की मला, असे हसत हसत म्हणले होते. हातातून निसटून गेलेला पॉइंट परत मिळवताना कार्लोस टेनिस कोर्टवर जी पळापळ करतो ती टीव्हीत बघूनही मला दम लागतो.

गेल्या एका वर्षात कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनरने खेळात लक्षणीय प्रगती खेळात करून दाखवली आहे. दोघांच्या सर्व्हिसमध्ये ताकद आली आहे. फटके मारताना तंत्राबरोबर ताकद दिसू लागली आहे. दमसास दोघांचा चांगला दिसत असला, तरी कार्लोस अल्काराझ त्यातही जरा उजवा दिसतो आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे निर्णायक मोठे गुण खेळताना दडपण झुगारून दर्जेदार फटका धोका पत्करून मारताना अल्काराझ कचरत नाही. ज्याला पुरून उरणं असं म्हटलं जातं अगदी तसंच त्याचा खेळ बघताना जाणवते.

एकीकडे यानिक सिनर आणि अल्काराझ दोन खेळाडू पुरुष टेनिसची पताका समर्थपणे पेलताना दिसू लागले असताना दुर्दैवाने महिलांच्या टेनिसमधला सातत्याचा अभाव निराश करणारा आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या बाद फेरीतील सामने बघताना तो दर्जा अभावाने दिसला जो नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ किंवा सेरेना विल्यम्स खेळताना बघायला मिळायचा. यानिक सिनर आणि अल्काराझ या दोन खेळाडूंनी दुखापतीपासून स्वत:ला दूर राखण्याची किमया साधून दाखवली, तर टेनिसच्या खेळात नवे दर्जेदार युद्ध बघायला मिळेल.

रॉजर फेडरर निवांतपणे सामने बघायचा आनंद घेत असताना जोकोविच अजून लढतो आहे आणि नदाल तंदुरुस्त होऊन पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत लढायची तयारी करतो आहे. बियान बोर्ग, जॉन मॅकेन्रोनंतर पीट सॅम्प्रस, त्यानंतर फेडरर नदाल मग जोकोविच आणि आता कार्लोस अल्कराझ गार्फीया टेनिस जगतावर राज्य करायला सज्ज झालाय. खेळ कोणासाठी थांबत नाही. नवा तारा जन्माला घालून खेळ आपलं तेज कायम ठेवतो असं म्हटलं जातं त्याची प्रचिती कार्लोस अल्काराझला खेळताना बघताना ठळकपणानं समोर येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT