लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल
आजही ती गोष्ट आठवली तर माझा नाही तर आमच्या सुयश हॉस्पिटलमधील त्या वेळच्या असलेल्या सर्व डायरेक्टर, कन्सल्टंट स्टाफ यांच्या अंगाचा थरकाप उडतो. आम्हाला गँगस्टरच्या नावाने खंडणीचा फोन आला होता. त्यांनी आमच्यासह आमच्या कुटुंबीयांचेदेखील काही बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. त्यांना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणादेखील काम करीत होती. पण काही केल्या खंडणीबहाद्दर सापडायला तयार नव्हते. आम्ही त्यांना खंडणी तर दिली नाहीच उलट त्यांना पकडून त्यांचा खरा चेहरा समोर आणला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
गोष्ट आहे २००३ मधील. आमचे सुयश हॉस्पिटल नुकतेच २००१ मध्ये सुरू झालेले होते. हॉस्पिटल कॉर्पोरेट मल्टिस्पेशालिटी असले तरी फरक कुठे पडत होता तर आम्ही हॉस्पिटलची आम्ही सर्व संचालक मंडळी हॉस्पिटल सुरू झाल्याच्या अगोदरपासूनच कित्येक वर्षे नाशिकमध्येच आणि आजूबाजूला जवळील शहर-गावांमध्ये प्रॅक्टिस करणारेच होतो.
आमचे पॅशन, आमचे अक्षरशः वेड म्हणजे आमची मेडिसिनची प्रॅक्टिस, पेशंट बरा करणे ही आहे. आम्ही हे सर्व स्वतः करीत असल्यामुळे बँकेच्या वेळेनंतर जमा झालेली रोकडदेखील आम्ही सायंकाळी जाताना घरी घेऊन जात असू आणि दुसऱ्या दिवशी ती परत आणून बँकेत भरत असू. ही आमची नेहमीचीच कामकाजाची पद्धत होती. (Wings of Positivity saptarang Latest Marathi Article by Dr Hemant Ostwal Nashik News)
कुठल्याही व्यवस्थापनात कोणी ना कोणी कर्मचारी कामचुकार, थापाड्या, खोटारडा असतो, ज्याला कामे न करता फक्त टाइमपास करायचा असतो अशा लोकांना व्यवस्थापन सांभाळणाऱ्याला वेळप्रसंगी दोन शब्द बोलावेच लागतात. कधी दंडाची, क्वचित प्रसंगी गरज पडली तर कामावरून काढून टाकण्याची पाळीदेखील येते. हा सर्व दैनंदिन व्यवस्थापनाचा सगळीकडे एक भागच असतो, तसाच तो आमच्याही दैनंदिन कामकाजाचा एक भागच होता आणि आजही आहे.
याबरोबरच नाशिक शहरामध्ये किंवा जवळपासच्या गावांमध्ये जाऊन वैद्यकीय ज्ञान वाटणे, गावातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे ज्ञान अद्ययावत करणे हे त्या वेळीदेखील आणि आजदेखील एक महत्त्वाचे नेहमीचेच काम आहे. मला आठवते, त्या वेळी असाच आमचा कार्यक्रम ज्याला इंग्रजीमध्ये ‘सीएमई’ म्हणजेच कंटिन्यूअस मेडिकल एज्युकेशनचा प्रोग्राम निफाड तालुक्यातील सर्व डॉक्टरांसाठी निफाडमध्ये एके दिवशी रात्री आठला आयोजित केलेला होता.
त्या दिवशी आम्ही तिघे-चौघे जण, त्यात आमचे फिजिशियन डॉ. यतीन्द्र प्रसाद दुबे, आमचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रशांत पाटील, माझे सहकारी डॉ. भास्कर शेलार आणि मी असे आम्ही सर्व संध्याकाळी नाशिक शहरातून साडेसहा-पावणेसातच्या दरम्यान निफाडकरिता निघालो होतो आणि चांदोरीच्या पुढे पुढे आमच्या मोबाईलवर एक धमकी देणारा थ्रिटनिंग कॉल आला. समोरच्याने आम्हाला सांगितले, की तो छोटा राजनच्या टोळीशी संबंधित आहे.
तो आणि त्याची टोळी किती खतरनाक आहे, वाईट आहे, त्याच्या टोळीने त्या वेळपावेतो कसे अनेक लोकांना त्रास देऊन त्यांच्याकडून मोठमोठाल्या रकमा खंडणी म्हणून घेतलेल्या आहेत आणि अर्थातच ज्यांनी ज्यांनी त्यांचे ऐकले नाही त्यांची कशी खांडोळी केली याचे अगदी सविस्तर वर्णन त्याने केले. अर्थातच आता आमचा नंबर त्याने लावला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या सुयश हॉस्पिटलसमोरच्या दोन नंबरच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील रिकाम्या फ्लॅटसमोर एका बॅगेमध्ये दोन लाख रुपये तेही पाचशेच्या नोटांमध्ये म्हणजे एकूण चार बंडले सकाळी दहाला ठेवण्याची ऑर्डर सोडली आणि अर्थातच त्याबरोबर पोलिसांकडे गेल्यास, तक्रार केल्यास तुम्ही कसे जिवानिशी जाणार, तुम्ही तर जालच परंतु तुमच्या घरच्यांनाही आम्ही संपवून टाकू, त्याबरोबरच त्याने आमच्या घरी कोण कोण आहे हे व्यवस्थित सांगितले. त्याला ही माहिती सर्व अगदी सखोल होती.
आतातरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडला असेल. आम्ही जे काही काम करतो त्याचा अगदी इत्थंभूत अभ्यास आधी करतो. ज्याच्यावर ट्रॅप लावायचा असतो त्याची पूर्ण कुंडली आम्ही आधी मांडत असतो. तुमचा अभ्यास आम्ही गेल्या दीड-दोन महिन्यांपासून करीत आहोत, असा शेवटचा जोरदार हातोडा त्याने आमच्यावर मारला. ‘आता फोन ठेवा. बरोबर रात्री नऊला परत फोन करेन,’ असा जबरदस्त दम देऊन त्याने फोन ठेवला. आम्ही निफाडला पोचणारच होतो. आता आम्हाला जबरदस्त टेन्शन आले होते. काय करावे? निफाडला पोचलो.
निफाड तालुक्यातील डॉक्टर चांगल्या संख्येने सीएमईसाठी उपस्थित झालेले होते. त्यामुळे प्रोग्राम कॅन्सलदेखील करता येत नव्हता. इकडे खंडणीसाठी ठार करण्याच्या धमकीचा कॉल आणि इकडे हॉस्पिटलतर्फे व्याख्यान अशा विचित्र परिस्थितीत आम्ही सापडलो होतो. डॉक्टर दुबेंनी व्याख्यान सुरू केले आणि आम्ही मोबाईल सांभाळून बसलो. त्या हॉलमध्ये आणि बाहेरही मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते. त्याकाळी आजच्या एवढे मोबाईल नेटवर्क चांगले नव्हते.
फार कमी ठिकाणी नेटवर्क मिळायचे. आता आम्हाला प्रश्न पडला होता, येथे नेटवर्क मिळत नाही मग कसे करायचे? त्या गुंडांनी फोन लावला आणि आपला फोन नाही लागला तर न जाणे तो काहीतरी उलटा ग्रह करून आपल्याभोवती अवघड प्रकार करून टाकायचा. तो हॉल एका तीनमजली हॉटेलमध्ये होता. आम्ही टेरेसवर गेल्यावर नेटवर्क मिळते का बघू, या असा विचार करून टेरेसवर गेलो. सुदैवाने टेरेसवर फार चांगले नव्हे पण बऱ्यापैकी नेटवर्क येत होते. अगदी बरोबर नऊच्या ठोक्याला त्या बदमाशाचा फोन वाजला. पुनश्च एकवार दमदाटी, पुनश्च एकवार सर्व डिटेल म्हणजे त्या वेळी आम्ही कुठे होतो, बरोबर कोण कोण होते, निफाडला होतो सर्व अगदी बरोबर सांगितले.
सकाळी दोन लाख रुपये ठेवण्यासाठी परत एकदा आठवण दिली. ‘आम्ही बघतो’ असे सांगायचा प्रयत्न केल्या केल्या तिकडून लगेचच दमबाजी सुरू झाली. ‘तसं काही डोक्यात असेल तर आत्ताच सांगा. तुम्ही निफाडहून नाशिकलाच परत येणार नाही याची व्यवस्था करू का?’ असा सरळ सरळ दम आम्हाला मिळाला. मग आम्ही नाइलाजास्तव दोन लाख रुपये ठेवण्यासाठी होकार दिला. इकडे डॉ. दुबेंचे व्याख्यान दहाला संपले.
झटपट दोन घास पोटात टाकत आम्ही तेथून आमची लवकरात लवकर म्हणजे सव्वाअकरा-साडेअकराच्या दरम्यान सुटका करून घेतली आणि अर्थातच अत्यंत तणावपूर्ण वातावरणात विचारमंथन करीत आम्ही नाशिकला रात्री बाराच्या सुमारास पोचलो. त्यावेळी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आमचे मित्र होते. रात्री बाराला त्यांना फोन करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळची फिल्डिंग लावली.
ज्या ज्या नंबर्सवरून फोन आले होते ते नंबर्स त्यांना दिले. त्यांनी त्वरित रात्रीच्या रात्री ते नंबर कुठले आहेत हे शोधण्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लावली. ते नाशिक शहरातीलच लँडलाइन्सचे नंबर होते. आम्हाला त्यांनी सकाळी बीएसएनएलकडून कॉलर आयडी बसवून घ्यायला सांगितले. ‘तुम्ही चिंता करू नका, आपण सकाळी व्यवस्थित फिल्डिंग लावू,’ असे हिंमतपूर्ण आश्वासन दिले. त्यांनी पैशांऐवजी कागदाचे बंडल तयार करून बॅगेत भरून बॅग तयार करून ठेवायला सांगितली.
सकाळी दहाला त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी म्हणजेच त्या वेळच्या आमच्या राजीव गांधी भवन, नाशिक महापालिकेशेजारील सुयश हॉस्पिटलच्या समोरच्या लेनमधील दुसऱ्या बिल्डिंगमध्ये त्याने सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या मजल्यावर ती आमच्यातीलच दोन जणांना ठेवायला सांगितली. इकडे आम्ही दोघा-तिघांनी हॉस्पिटलमधील गोष्टी सांभाळायच्या होत्या. जशा की तिकडे लँडलाइनवर फोन आला तर कॉलर आयडीच्या मदतीने तो नंबर सगळ्यात आधी लिहून ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचे काम आम्हाला जे होते, ते म्हणजे, समोरच्या गँगस्टरला आमची इत्थंभूत माहिती कशी काय मिळत होती ते शोधणे. आमच्यातीलच कोणी स्टाफमधील त्यांना सामील आहे का, हा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे होते.
आम्ही त्या रात्री जवळपास झोपलोच नाही. सकाळी साडेआठलाच आम्ही सर्व हॉस्पिटलला तयार होतो. पीआय साहेबांशीदेखील बोलणे झाले. त्यांनीदेखील दहा माणसांची टीम तयार केली होती. ते सर्व साध्या वेशात येणार होते. दरम्यान, सकाळी आम्हाला ज्या दोन नंबरवरून फोन आले होते त्यांचा पत्ता लागलेला होता. ते नंबर म्हणजे पहिला सेंट्रल बसस्थानकावरील लोकल एसटीडी-पीसीओचा नंबर होता आणि दुसरा शालिमारवरील एसटीडी-पीसीओचा होता.
त्याकाळी कुठलीही सीसीटीव्हीसारखी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने एसटीडी-पीसीओमध्ये आल्या-गेलेल्याची ओळख पटविणे जवळपास अशक्यप्राय काम होते. सकाळी नऊला परत एकदा लँडलाइनवर फोन आला. पोलिसांना न कळविण्याबाबत सक्त सूचना पुन्हा एकदा दमदाटीने मिळाल्या. सोबत शार्प दहाला पैसे ठेवण्यास सांगण्यात आले आणि अर्थातच परत एकदा तुमची सगळी माहिती आम्हाला कशी आहे, आम्ही कोण कोण, कुठे कुठे बसलेलो होतो, आमच्याकडे काय काय चालले होते याचे इत्यंभूत वर्णन त्याने सांगितले. आम्ही शांतपणे विचार करायला सुरवात केली.
या इत्थंभूत वर्णनाने आम्ही अत्यंत सावध झालो. सोबतच खंडणी फक्त दोन लाखांची मागणे, जे काही धमकीवजा खंडणीचे फोन आले ते फोन लोकल एसटीडी-पीसीओमधील असणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे सविस्तर अगदी सखोल वर्णन करणे (जे की फक्त आमच्या सुयश परिवारातील एखाद्या माणसालाच शक्य होते) आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने मागितलेली खंडणीची रक्कम फक्त दोन लाख.
दोन लाखांचा आकडा आणि छोटा राजन हा ताळमेळ आमच्या डोक्यात काही केल्या घुसत नव्हता. आम्ही पीआय साहेबांशीदेखील चर्चा केली. त्यांचेही मत तसेच पडले. पण दहाला आम्ही सर्वांनी मिळून पैसे ठेवायचे म्हणजेच कागदांचे बंडल असलेली बॅग ठेवायची हे ठरवले आणि आजूबाजूला साध्या वेशातील पोलिस त्यांच्यामध्ये स्वतः वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेब असणार होते. आमच्यातील दोन जणांनी जाऊन ती बॅग ठेवायची आणि उरलेल्या दोघा-तिघांनी हॉस्पिटलमध्ये थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य ती हालचाल करायची असे ठरले. मी स्वतः हॉस्पिटलमधील टीम सांभाळत होतो.
आम्ही बारकाईने लक्ष ठेवून होतो. बरोबर नऊ वाजून ५९ मिनिटांनी आमच्यातील दोन जणांनी समोरच्या इमारतीमध्ये ठरलेल्या ठिकाणी कागदांची बंडले असलेली बॅग ठेवली आणि परत फिरले. हॉस्पिटलमध्ये मी लँडलाइनजवळच बसलेलो होतो. बरोबर दहा वाजून सहा मिनिटांनी लँडलाइनची रिंग वाजली आणि परत एकदा शिव्यांची लाखोली वाहून खूप दमदाटी करण्यात आली. त्यांना बरोबर कळून चुकले होते, की आम्ही पोलिसांची मदत घेतलेली आहे. साध्या वेशामध्ये पोलिस सर्व ठिकाणी हजर आहेत हे त्यांच्या लक्षात आले.
‘आता बघा, तुमच्या फॅमिलीचे कसे हाल करतो. तुमचे स्वतःचे हाल तर कुत्रे पण खाणार नाहीत वगैरे वगैरे...’ अशी दमबाजी मला करण्यात आली. ‘तुम्ही काय काय करता आहात याची पल पल की खबर हमे रहती है। यह भूलना मत अब इसके आगे कब, कहा, कैसे रखना है। हम बतायेंगे। हमारे फोन का इंतजार करना और ये बताने की जरूरत नहीं की दोबारा पुलिस के पास गये तो क्या होगा?’ इत्यादी इत्यादी.
आम्ही सगळे सुन्न झालेलो होतो. एका बाजूला असे वाटायचे, नाही. ही आपल्या इथलीच काही टारगट मुले असावीत; परंतु ना जाणो खरेच छोट्या राजनच्या गॅंगची माणसे असली तर कुठे आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात टाकायचा? एवढे सगळे झाल्यानंतरदेखील आम्ही पोलिसांना सर्व कळविले. यादरम्यान जो सकाळी लँडलाइनवर दमबाजीचा फोन आला होता तो पुन्हा एकदा सीबीएसजवळील एसटीडी-पीसीओ बॉक्समधूनच आलेला होता. फक्त प्रत्येक वेळी तो अक्कलहुशारीने नवीन एसटीडी पीसीओ शोधत होता.
पोलिसांनी त्यांच्या बाजूने तपासयंत्रणा कामाला लावून तपास सुरू केलाच होता. आता आमच्या हातात परत तो केव्हा फोन करतो याचीच वाट बघणे होते. संपूर्ण दिवस आम्ही अस्वस्थतेतच घालविला होता. संध्याकाळी साधारणतः सात-साडेसातच्या दरम्यान आमच्याच एका कर्मचाऱ्याचा फोन आला, ‘सर, मला काही गुंड खूपच जास्त मारता आहेत. माझा जीव वाचवा.
मला मदत करा. सर, हे लोक तुमची सगळ्यांची आणि तुमच्या सर्वांच्या कुटुंबीयांची माहिती विचारात आहेत. मला फार भीती वाटते. हे लोक खूप वाईट, भयानक, बदमाश गुंड आहेत. माझ्या जिवालादेखील केव्हाही धोका होऊ शकतो. यांच्याकडे हत्यारेही आहेत. सर, लवकर या.’ त्याला जेव्हा विचारले, की तू कुठे आहेस, तर ‘मला माहीत नाही. मी आपल्या हॉस्पिटलजवळ उभा होतो. मला चार लोकांनी रिक्षात टाकले आणि माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती.
त्यामुळे मला कळत नाही. सर, तुमच्याही सगळ्यांच्या जिवाला धोका आहे. तुमच्या कुटुंबीयांच्याही जिवाला धोका आहे. सर, आपण काहीतरी करा पण मलाही वाचवा आणि सर्वांना वाचवा’ हे बोलताना तो जोरजोरात रडत होता. एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. आम्ही कॉलर आयडीवरून आलेला नंबर लगेचच पोलिसांना दिला आणि या वेळी तो नंबर कॅनडा कॉर्नर परिसरातीलच होता म्हणजे हॉस्पिटलपासून अगदी जवळच होता. ज्या पद्धतीने सर्व चालले होते त्यातून अजूनही उलगडा होतच नव्हता.
अजूनही हे कळत नव्हते, की हे छोटा राजनच्या टोळीचेच काम आहे की आपली स्थानिक टारगट मुले आहेत, गुंड आहेत. छोट्या राजनची टोळी असेल तर आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता दाट होती यात काही शंका नाही; परंतु हे कृत्य जर स्थानिक असेल तर त्यातल्या त्यात परिस्थिती तेवढी धोकादायक नसणार होती. मात्र जोपर्यंत प्रकरण संपणार नव्हते तोपर्यंत खूपच जास्त धोका होता यात काही शंका नाही. पोलिस डिपार्टमेंट त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करीतच होते; परंतु यश अजूनही दृष्टिपथात येत नव्हते.
आता रात्रीचे आठ वाजून गेले होते आणि परत आमच्या कर्मचाऱ्याचा फोन आला. तो रडत रडत सांगत होता, ‘सर, मला खूप मारले आहे. मला आता मारून हॉस्पिटलच्या जवळच टिळकवाडीमध्ये आतमध्ये सोडले आहे. मला चालतादेखील येत नाही. मला घ्यायला या.’ आम्ही ताबडतोब तेथे पोचलो. हा आमचा कर्मचारी एकटाच तेथे जमिनीवर पडलेला होता. थोड्याफार जखमा त्याच्या अंगावर दिसत होत्या. काही काळे-निळे डाग त्याच्या शरीरावर, चेहऱ्यावर दिसत होते; परंतु त्याने जेवढे वर्णन केले होते त्या पद्धतीचा मार एका डॉक्टरच्या नजरेला नक्कीच दिसत नव्हता. मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली.
त्याला आम्ही ताबडतोब आधी हॉस्पिटलमध्ये आणले. सर्व प्रकारच्या तपासण्या, एक्स-रेसहित केल्या. त्याला औषधे दिली. त्याला फारसे काही झालेले नव्हते हे लक्षात आले. खायला-प्यायला दिले. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याही हाताला फारसे काही लागले नाही. रात्रीचे दहा वाजत आलेले होते. आता आम्ही आमच्या मनाशी काही ठरविले आणि आमच्या माणसाला आम्ही विश्वासात घ्यायला सुरवात केली. त्याच्याकडून आम्ही दोघा-तिघांनी एकट्याएकट्याने सविस्तर माहिती घेतली आणि मग आम्ही तिघांनी ती माहिती एकमेकांकडून पडताळून बघितली तर त्यामध्ये फरक पडत होता.
आमचा संशय अजूनच बळावत चालला होता, मग आम्ही दोघांनी त्याला विश्वासात घेतले. साम, दाम, दंड, भेद वापरून सगळ्या प्रकारांनी आम्ही त्याला समजावून सांगत होतो. जेव्हा त्याला समजावून सांगितले, की आता या सर्व गोष्टी पोलिस रेकॉर्डवर आलेल्या आहेत आणि जर तू यामध्ये सामील आहेस हे सिद्ध झाले तर तुझे पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकते. तू जेलमध्ये जाऊ शकतोस. तुझ्या पूर्ण आयुष्याची वाट लागू शकते.
ज्यांनी ज्यांनी हे असे उद्योग आधी केलेले आहेत ते कसे आजही जेलमध्ये सडत आहेत आणि उद्या ते जेलमधून सुटले तरीही त्यांना कुठे नोकरी मिळू शकेल काय? त्यांना कोणीही उभे करतील काय? आमचा हा कर्मचारी अविवाहित होता. मग त्याला विचारले, ‘जर कोणी अविवाहित असा जेलमध्ये गेला तर त्याला कोणी आपली मुलगी देईल काय?’ थोडक्यात काय तर त्याला सविस्तरपणे होणाऱ्या परिणामांची पूर्ण कल्पना दिली की संपूर्ण आयुष्य यानंतर कसे उद्ध्वस्त होणार आहे. आत्तापर्यंत रात्रीचा एक वाजत आला होता आणि कुठेतरी आमचे बोलणे त्याच्यावर परिणाम करत होते. आमचा हा हीरो आता ओक्साबोक्शी रडायला लागला. धायमोकलून रडायला लागला. सगळे सत्य त्याने रडत रडत सांगितले.
आमच्या या हिरोला दारूचे व्यसन लागले होते. अर्थातच व्यसन लागण्यामध्ये मित्र कंपनीचा हात होता. ड्यूटी संपली की ही सगळी गॅंग दारू प्यायला बसायची. पैसे कमी पडायचे. दारूमध्ये त्यांच्या गप्पा व्हायच्या. त्या बोलण्याच्या नादात त्याने त्या सर्व मित्रांना सांगितले, की बँकेच्या वेळेनंतर जमा झालेली रोकड आम्ही संचालक घरी घेऊन जायचो. जी आम्ही दुसऱ्या दिवशी आणून बँकेत भरायचो. आम्ही ती रक्कम घरी न्यायचो हे त्याला माहिती होते; परंतु दुसऱ्या दिवशी आणून आम्ही ती बँकेत भरायचो हे त्याला माहीतच नव्हते.
त्यामुळे त्याचा समज असा झाला होता, की यांच्याकडे प्रचंड पैसे जमा होत आहेत. त्यामुळे या दारुड्या मित्रांनी खंडणीचा प्लान बनविला होता. यांच्याबरोबर जोडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे, आम्ही त्याला त्याच्या कामावरून, कामावर असताना दारू पिण्यावरून खूप बोलून आर्थिक दंडात्मक कारवाईदेखील त्याच्यावर केलेली होती. त्याचा रागदेखील त्याच्या डोक्यात धुमसत होता. त्या प्लानला जास्त परिणामकारक बनविण्यासाठी त्यांनी छोटा राजनच्या नावाचा वापर केला होता.
याबरोबरच त्याने सर्व अगदी बारीकसारीक गोष्टींचा खुलासा केला होता. आता आम्हाला त्यांना आमच्या बाबतीत सविस्तर इत्थंभूत माहिती कशी मिळत होती याचाही उलगडा झाला. अर्थातच या आश्वासनावर की आम्ही त्याला जेलमध्ये टाकणार नाही, त्याचे आयुष्य बरबाद करणार नाही म्हणून अगदी साष्टांग दंडवत घालत, रडत रडत, विनवण्या करत त्याने हे सर्व सांगितले होते आणि आम्हीही ते सर्व सकारात्मकतेने घेतले. आमच्या लक्षात आले होते, की हा सर्व खेळ दारूने केला होता. या दारूच्या व्यसनाने हा सर्व प्रकार झालेला होता.
आम्ही कडक पावले उचलली तर या मुलाचे आयुष्य पूर्ण बरबाद होणार होते. त्याच्या आई-वडिलांचा तो एकुलता होता. आधार होता. नुसते या मुलाचे आयुष्य बरबाद होणार नव्हते तर त्याच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचाही चक्काचूर होणार होता. म्हातारपणात त्यांचे खूप हाल झाले असते. त्यांची म्हातारपणीची काठीच हरविणार होती. आम्ही सर्वांनी हा सकारात्मकतेने विचार केला; परंतु त्याबरोबर सकारात्मकता हेही शिकवत होती, की त्याला आणि त्याच्या मित्रांना अगदी सहजासहजी सोडून दिले तर या सर्वांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाऊन हीच मंडळी सराईत गुन्हेगारदेखील बनू शकतील.
यांचे आयुष्य बरबाद व्हायला नक्कीच नको, तेही सर्वार्थाने म्हणजे या प्रकाराने ही मंडळी जेलमध्ये सडायलाही नको आणि त्याबरोबरच यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा मिळणार नाही असेही व्हायला नको. ‘आजी मेली तरी चालेल परंतु काळ सोकवायला नको’ आणि म्हणून आमचे मित्र सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ताबडतोब सर्व कळविले. त्याबरोबर आमच्या भावनाही सर्व सांगितल्या.
त्यांच्या सर्व काही लक्षात आले. मग त्यांनीही पहाटे तीनला या सर्व मंडळींना ताब्यात घेत छानपैकी टायरमध्ये घालत जबरदस्त सलगपणे चार-पाच तास पोलिसी झटका म्हणजे अर्थातच आयुष्यभर न विसरणारा मार, चोप त्या सर्वांना म्हणजे एकूण पाच लोकांना दिला. मग सकाळी पुढचा महिनाभर रोज पोलिस ठाण्याला यायचे, असा दम देऊन सोडले. जवळपास रोज नंतरही त्यांची धुलाई सुरू होती; परंतु त्यांच्या सुदैवाने व आमच्या सकारात्मकतेने ही मंडळी जेलमध्ये सडली नाही, ना त्यांचे आयुष्य बरबाद झाले.
त्यातील आमचा कर्मचारी तर आजही आम्हाला भेटायला येतो. आता तो स्वतःच लेबर कॉन्ट्रॅक्टर झाला आहे. स्वतःची चारचाकी आहे. चांगले घरही त्याने नाशिकमध्ये घेतले आहे. त्याची दोन्ही मुले आज कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत. त्याचे आई-वडीलही आता त्याच्या जवळच नाशिकमध्ये राहतात. आज तो स्वतःचे पोट तर भरतोच आहे; परंतु लेबर कॉन्ट्रॅक्टर होऊन तो अनेक हातांनाही काम देतो आहे.
निव्वळ पोलिसांच्या हातात न देता आम्ही हा प्रसंग सकारात्मकतेने घेतल्याने आम्ही स्वतः तर वाचलोच परंतु पाच जणांचे आयुष्य बरबाद होता होता वाचले होते.
(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.