sukeshani sakal
सप्तरंग

सुकेशिणी!

महिलेचं खरं सौंदर्य तिच्या केसांत आहे आणि तेच नसतील तर ती विद्रूप होते, असा सर्वसाधारण समज... त्यामुळेच कदाचित कुठलीही महिला केस कापायला नाही म्हणते.

अवतरण टीम

- सुवर्णा धानोरकर, sakal.avtaran@gmail.com

महिलेचं खरं सौंदर्य तिच्या केसांत आहे आणि तेच नसतील तर ती विद्रूप होते, असा सर्वसाधारण समज... त्यामुळेच कदाचित कुठलीही महिला केस कापायला नाही म्हणते. म्हणूनच कॅन्सरग्रस्त महिलांसाठी मी केशदानाचा निर्णय घेतला. आपण जे केलंय ते फार वेगळं आहे हे माझ्या लक्षात आलं. शक्य असल्यास तुम्हीही केस दान करा. एखाद्या गरीब कॅन्सरग्रस्त मुलीपर्यंत त्याचा विग पोहोचू द्या...

‘चिनी कम’ चित्रपटातली तब्बू आठवते? अमिताभ बच्चनच्या हॉटेलमधून बाहेर पडल्यावर वळणावर जाताच लांबसडक केसांना एक छान झटका देऊन मागे वळून बघते. अमिताभला एक प्रेमळ लूक देते आणि पुढे जाते. ती लांब केसांची तब्बू ‘तिला’ प्रचंड आवडलेली. मुलगी असून ‘तिला’ जर ती आवडली तर मग मुलांना किती आवडली असेल विचार करा.

कुठल्याही मुलाला लग्नासाठी कशी मुलगी हवी विचारा... एक वेळ गोरी मुलगी हवी, असं म्हणणार नाही; पण लांब केसांची मुलगी हवी म्हणणारच... यातून मुलींचे लांब केस तिच्यासाठी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे ते लक्षात येतंच. (म्हणूनच पूर्वी पतीच्या निधनानंतर केशवपन करत. त्या स्त्रीला विद्रूप करत)... पण ज्यांच्या डोक्यावरचे केस क्षणाक्षणाला गळून पडतात त्यांचं काय...?

कॅन्सर... असा आजार ज्यात डोक्यावरचेच नाही, तर अंगावरचे केसही अक्षरश: गळून पडतात. आजाराने शरीर पोखरत असतानाच डोक्यावरचे झडणारे केस आत्मविश्वास कमी करत जातात. मनही पोखरतात. काहींच्या मनात फक्त त्या गळलेल्या केसांमुळे आत्महत्येचे विचारही येतात. खरंच, काय मानसिक स्थिती होत असेल हातात येणारे केस पाहून...

स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या केसात आहे आणि तेच नसतील तर ती विद्रूप होते, असा सर्वसाधारण समज... त्यामुळेच कदाचित कुठलीही स्त्री केस कापायला नाही म्हणते. टक्कल असलेले पुरुष डोळ्यांना सरावले आहेत; पण टकल्या स्त्रिया नाहीच. म्हणूनच अशा कॅन्सरग्रस्त मुली आणि स्त्रियांसाठी ‘तिने’ केशदानाचा निर्णय घेतला.

‘तिला’ वाटलं किती सुंदर दिसतो आपण लांब केसांमध्ये... ते केस मोकळे ठेवले, की आपलं सौंदर्य आणखीनच खुलतं; पण एक दिवस असंच स्वत: आरशात न्याहाळताना जाणवलं, की प्रत्येकीच्या वाट्याला हे सौंदर्य येतं का..? धडधड वाढली. मन भरून आलं. अचानक आठवलं आपल्या एका मैत्रिणीला कॅन्सर झालाय. आणखी एका मैत्रिणीच्या आईला केमो सुरू आहे.

एका सहकाऱ्याची बायको कॅन्सरने गेली... लिस्ट वाढत होती आणि या सगळ्यांसाठी काहीतरी करावं, असं वाटलं. एका मैत्रिणीच्या आईने केमोनंतर विग घेतला. तो लावताना तिचे डोळे भरून यायचे; पण जुनाच आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकायचा. आपल्या पुण्याच्या दिवंगत माजी महापौर नाही का, मुक्ता टिळक... केमोने केस गेल्यामुळे त्याही विग लावायच्या; पण ज्या गरीब स्त्रिया किंवा मुली असतील, त्यांचं काय? त्यांना हे विग परवडणारे आहेत का?

उत्तर शोधलं, तर कळलं नाही. किमान २०-२५ हजारांपर्यंत विग मिळतो. वर त्याचा मेंटेनन्स... खर्चिक उपचारांसोबत हा खर्च कसा परवडणार... म्हणून ‘तिच्या’ मनात आलं, आपण आपले केसच दान करूया... एखाद्या अनोळखी मुलीच्या डोक्यावर हा विग चढला की तिचा आत्मविश्वास दुणावेल, तिचा चेहरा खुलून जाईल, या विचाराने ‘ती’ हरखून गेली. ‘तिचा’ निर्णय पक्का झाला. ॲप्रोच हेल्पिंग हॅण्डस् फाउंडेशनशी संपर्क साधला गेला.

या संस्थेने २०१६ पासून गोरगरीब कॅन्सरग्रस्तांसाठी मोफत विग बनवून द्यायला सुरुवात केलीय. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. आजवर केवळ १२५ जणींनी केशदान केलंय. त्यातून ३० विग तयार करून गोरगरीब गरजूंपर्यंत पोहोचलेत; पण कॅन्सरग्रस्त आणि केशदान करणाऱ्यांचा आकड्यात किती तफावत... ती दूर करायची तर लांब केस असणाऱ्या महिलांमध्ये जागृतीची गरज आहे...

आपली इच्छा ‘तिने’ नवऱ्याला बोलून दाखवली. त्याचा प्रश्न, ‘हे करायलाच हवं का? इतके लांब केस कापणार तू...? इतर काही वस्तुरूपात दान कर...’ ‘तिचं’ उत्तर, ‘सगळंच दान करता येईल मनात आल्यावर; पण केशदान रोज करता येण्यासारखं नाही आणि यासाठी पटकन कुणी धजावणारही नाही. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचंय आणि ते इतरांनीही करावं म्हणून त्यांना तयार करायचंय.’

नवऱ्याला मुद्दा पटला; पण एक अडचण होतीच, ‘गेली १९-२० वर्षे आपल्याला स्क्रीनवर पाहणारे लोक डोक्यावर केस नसलेली अँकर पाहतील का...?’ म्हणून लागलीच सरांची भेट घेतली. त्यांना इच्छा बोलून दाखवली. त्या वेळी त्यांचा पहिलाच प्रश्न ‘कशाला...?’ मग त्यांना मुद्दा पटवून दिल्यावर त्यांनीही होकार दिला.

केशदानासाठी केसांची लांबी किमान १३ इंच असावी लागते. ‘तिचे’ केस १४ इंच. १३ पैकी एक ते दीड इंच केस विगसाठी बेसमध्ये टाचले जातात. खालचे केस लहान-मोठे असतील ते नीट सरळ कापून मग वापरता येतात. एका विगसाठी किमान तीन जणींचे केस लागतात. त्यातही प्रत्येकीच्या केसांचा पोत वेगवेगळा त्यामुळे जवळपास सारखे केस मिळेपर्यंत विग बनवता येत नाही; पण एकदा विग बनला की तो किमान १५ वर्षे टिकतो.

ॲप्रोच हेल्पिंग हॅण्डस् फाउंडेशनने पुण्यातल्या पेपिलोना कंपनीशी करार केलाय. त्यांच्याकडून गरिबांसाठी सवलतीत विग बनवून दिले जातात. मग ते फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचतात. कधी कधी काही विग हे कस्टमाइज्ड असतात. त्यांच्याकडून विगसाठी संस्था पैसे घेते.

दादरच्या नॅशनल हेअरक्राफ्ट सलूनमध्ये केशदानाची सगळी तयारी झाली. तो क्षण आला आणि ‘तिची’ हुरहूर वाढली. हेअर एक्सपर्ट तुषार चव्हाण यांनी ‘चांगलीच दिसशील’ असा विश्वास दिला. एवढंच नाही, तर त्यासाठी त्यांनीही खारीचा वाटा उचलला. एक रुपयाही न घेता दोन-अडीच तास वेळ देऊन मोफत केस कापून दिले. हे सगळं होत असतानाही ‘ती’ सहज वावरत होती; पण ‘पूर्ण केस काढल्यावर आपण कसे दिसू...?’ हा विचार मनात होता.

लगेच त्या सगळ्या अनोळखी मुली दिसल्या. ‘तिला’ वाटलं त्या तिच्याच लांब केसांकडे बघताहेत. मन भरून आलं. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एक एक बट कापणं सुरू होतं. ज्यावेळी सगळ्या बटा कापून झाल्या तेव्हा ‘तिला’ खूप हलकं वाटलं. आपण समाजाचं देणं लागत असताना नेहमी वस्तूरूपात काही ना काही गरजूंपर्यंत पोहोचवतो; पण आज आपण जे केलंय ते फार वेगळं आहे हे ‘तिच्या’ लक्षात आलं.

त्यावर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया खूप विचित्र किंवा अगदीच शॉकिंग असतील याची ‘तिला’ जाणीव होती; पण ‘ती’ खूश होती. ‘ती’ आणि आणखी एक-दोन जणींनी केशदान केलं, की एक छानसा विग तयार होईल आणि एका मुलीच्या डोक्यावर तो चढेल. तिचं सौंदर्य आणखी खुलेल. तिचा आत्मविश्वास वाढेल. शाळेत-कॉलेजमध्ये जाताना ती पुन्हा आनंदाने केस विंचरेल आणि घरातून बाहेर पडेल त्या वेळी तिचं सौंदर्यही सर्व जण न्याहाळतील. ज्यांचे हे केस, त्यांना ती मनोमन धन्यवाद देईल.

हे सगळे विचार ‘तिच्या’ मनात येत होते. त्याच वेळी तिरुपतीला होणारं केशदान आठवलं. वर्षाकाठी किमान २०० कोटींचा फक्त दान केलेल्या केसांचा व्यवहार... हा समोर आलेला आकडा. कदाचित तो यापेक्षाही अधिक असेल. रोज टनांनी केस दान होतात तिरुपतीला. ते खरंच गरजूंसाठी कितपत उपयोगात येत असतील? म्हणून ॲप्रोच हेल्पिंग हॅण्ड्ससारख्या संस्था महत्त्वाच्या वाटतात आणि हे केशदानही...

इतका वेळ तुम्ही विचार करत असाल ही ‘ती’ कोण... ही ‘तीच’ जी रोज सकाळी तुमच्यापर्यंत ‘साम टीव्ही’च्या माध्यमातून बातम्या घेऊन येते... सुवर्णा धानोरकर. ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’ची अँकर. सुवर्णाचं तुम्हा सर्वांना ‘सकाळ’च्या माध्यमातून आवाहन आहे, की शक्य असल्यास तुम्हीही केशदान करा. एखाद्या गरीब कॅन्सरग्रस्त मुलीपर्यंत त्याचा विग पोहोचू द्या... कारण प्रत्येकीला सुंदर दिसण्याचा, सुकेशिणी होण्याचा अधिकार आहे.

(ॲप्रोच हेल्पिंग हॅण्ड्स संस्थेचे स्वयंसेवक - शिशीर जैन - ८२७५३९४८८६ आणि संकेत - ७७०९६६९४९५. या संस्थेचे स्वयंसेवक मुंबई, पुणे, नागपूर, सांगली आणि राज्यातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही आहेत. शिवाय, ही संस्था राज्याबाहेर बिहारमध्येही काम करतेय.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT