वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध प्रकार आहेत.
जीवनसत्त्वांपैकी एक अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व म्हणजे जीवनसत्त्व ‘ड’. या जीवनसत्त्वाचा मुडदूस या रोगाच्या इतिहासाशी निकटचा संबंध आहे. इसवी सन १८९०च्या सुमारास पाम नावाच्या इंग्रज वैद्यांनी सूर्यप्रकाश आणि मुडदूस यांचा संबंध दाखवून दिला होता. १९१८ मध्ये मेलँबी यांनी कुत्र्यांच्या पिलांवर प्रयोग करून मुडदूस रोग उत्पन्न करण्यात यश मिळविले. त्या पिलांना कॉड माशाच्या यकृताचे तेल देण्यात आले व ती रोगमुक्त झाली.
जीवनसत्त्व ड
लहान मुलांमध्ये हाडे तयार होण्याच्या सामान्य प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या मुडदूस या रोगास प्रतिरोध करणाऱ्या काही जीवनावश्यक घटकांना ‘ड’ जीवनसत्त्व अशी संज्ञा दिली जाते. अशी शक्ती असणारे व यासंबंधी संरचना करणारे बरेच पदार्थ आहेत.
त्यांपैकी दोन सेको-स्टेरॉइडे महत्त्वाची आहेत -
१. ड २ जीवनसत्त्व किंवा अरगोकॅल्सिफेरॉल (याला कॅल्सेफेरॉल आणि व्हायोस्टेरॉल अशीही नावे आहेत)
२. ड ३ जीवनसत्त्व किंवा कोलेकॅल्सिफेरॉल. मानवामध्ये या दोन्हींची जैवक्रियाशीलता सारखीच असते.
कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयावर (शरीरातील रासायनिक-भौतिक घडामोडींवर) या जीवनसत्त्वाचे नियंत्रण असल्यामुळे हाडे व दात यांची घडण व वाढ यावर त्याचा परिणाम होतो.
लहानपणी शरीरशास्त्राच्या पुस्तकातून ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ‘मुडदूस’ नावाचा रोग होतो, हे या रोगाच्या गमतीदार नावामुळे आयुष्यभर लक्षात राहते; परंतु या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने अनेक रोगांना कसे आमंत्रण मिळते, हे आता लक्षात येऊ लागले आहे. आमचे आजी-आजोबा आम्ही लहान असताना आम्हा मुलांच्या तोंडात ‘कॉड लिव्हर ऑइल’चा डोस का कोंबायचे, याचे मोलही आता समजते. ‘ड’ जीवनसत्त्व हे आपल्यासाठी अत्यावश्यक असले तरी ते खऱ्याअर्थाने जीवनसत्त्व या वर्गात मोडत नाही. कारण त्याची निर्मिती त्वचेखाली सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे होते, म्हणून याला ‘प्रोहोरमोन’ असे संबोधतात.
याचे डी-१ ते डी-५ असे अनेक प्रकार आहेत.
त्यातील केवळ डी-२ आणि डी-३ हे मानवी शरीरास उपयोगी आहेत. डी-२ ला अर्गोकॅलसिफेरॉल तर डी-३ मुळे अन्नातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस या खनिज पदार्थाचे शोषण होऊन रक्ताभिसरण होते आणि हाडे बळकट होतात, इतकेच आपल्याला माहीत होते.
आता मात्र डी-३ची महती वैद्यकशास्त्राला चांगलीच पटू लागली आहे. डी-३च्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे मधुमेह, हृदयविकार व कर्करोग यांना आमंत्रण मिळते, हे अलीकडे लक्षात येऊ लागले आहे. याच्या अभावामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा बिघडते व इतर संसर्गजन्य रोग उद्भवतात.
गुणधर्माने ‘ड’ जीवनसत्त्व उष्णतेला स्थिर असते. यामुळे ‘अ’ जीवनसत्त्व आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांच्यातील उष्णतेला टिकण्यामधील फरकामुळे ‘माकॉलम’ यांना ‘ड’ जीवनसत्त्वाचे अस्तित्व ओळखता आले. ड-२ जीवनसत्त्वाचे रंगहीन स्फटिक असून ते ११५०-११७० सेल्सिअसला वितळते. ड-३ जीवनसत्त्वाचे रंगहीन, सुईसारखे स्फटिक असून ते ८४०-८५० सेल्सिअसला वितळते. पिवळट तपकिरी रंगाच्या बाटलीत हवाबंद स्थितीत भरून प्रशीतकात (थंड करण्याच्या उपकरणात) ठेवल्यास ड-३ जीवनसत्त्व स्थिर राहते. तेलात अथवा प्रोपिलीन ग्लायकॉलात विरघळलेल्या स्थितीत ते स्थिर राहते. १८०० सेल्सिअसला तापविल्यास त्यातील मुडदूस प्रतिरोधक शक्ती नाहीशी होते.
सर्व प्राण्यांमध्ये अल्प प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व असते. यकृतात व इतर अंतस्त्यांत (छाती व पोट यांतील इंद्रियांत) ते जास्त प्रमाणात आढळते. दूध आणि अंडी यातही ते आढळते. माशांमध्ये ते जास्त प्रमाणात असते. माशांच्या जातीनुसार व ऋतुमानाप्रमाणे हे प्रमाण वेगवेगळे असते. वनस्पतींमध्ये ते अत्यल्प प्रमाणात आढळते, तर ताज्या पालेभाज्यांत ते अजिबात आढळत नाही.
स्वच्छ हवेतील (धूरमिश्रित, ढगाळलेली हवा नसावी) सूर्याची कोवळी किरणे फक्त तोंडावर, मानेवर, हातांवर पडली की, आपल्याला भरपूर प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. बाल्यावस्थेत आणि गरोदरपणात ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज अधिक असते; तसेच वयाच्या सत्तरीनंतर ही गरज हळूहळू वाढू लागते. किंबहुना अलीकडील जीवनशैलीमुळे सर्वानाच या जीवनसत्त्वाची गरज असते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात अंगावर घ्यावा; तसेच अतितीव्र सूर्यप्रकाश अंगावर जास्त प्रमाणात घेतला तरी त्वचेच्या कर्करोगाची भीती असते, हे ही लक्षात ठेवायला हवे. जीवनसत्त्व ‘ड’ हे म्लेदपेशींमध्ये साठवले जाते. म्हणूनच रक्तात त्याचे प्रमाण कमी होते. स्थूल व्यक्तींमध्ये ते कमी प्रमाणात होते. सावळ्या रंगाच्या व्यक्तींमध्येसुद्धा ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती कमी होते. त्वचेखाली निर्माण झालेल्या ‘ड’ जीवनसत्त्वाचे आपल्या यकृतात व नंतर मूत्रपिंडात हैड्रॉक्सिलशन होते व ‘ड’ जीवनसत्त्वाचे डी-३ मध्ये रूपांतर होते. म्हणूनच यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोग जडलेल्यांमध्ये याची निर्तीती कमी झालेली असते.
या जीवनसत्त्वाची उणीव असलेल्या गर्भवती महिलांच्या मुलांना बोलताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
गर्भात वाढणाऱ्या मुलाचा थेट आईच्या आरोग्याशी संबंध असतो. त्यामुळे तिच्यातील जीवनसत्त्वाचा अभाव बाळावर निश्चितच काहीतरी परिणाम करतो. गर्भवती महिलांसोबत तान्ही बाळे असणाऱ्या मातांनाही ‘ड’ जीवनसत्त्वाची अधिक आवश्यकता असते. ते पुरेशा सूर्यप्रकाशातून, व्यवस्थित शिजवलेले मासे, फिश लिव्हर ऑइल, चीज, दही, अंडी, सीरिअल प्रॉडक्टस यातून मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.