कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कोणत्याही प्रकारची प्रचाराची भावना मनात न ठेवता जे घडलं ते तशाच पद्धतीने नवीन पिढीला कळावं, अशा दृष्टिकोनातून मी ‘दाहीदिशा’ सदरातून लिखाण केलं. जसा गोफ विणताना एकावर एक एक दोरा ठेवून चालत नाही; तर त्यात अनेक धागे असावे लागतात, तसाच गोफ विणायचा माझा प्रयत्न होता. जेणेकरून एक धागा तुटला तरी स्त्रियांच्या चळवळीची ही वीण कायम राहील.
स्त्रीआधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेच्या वाटचालीचा अनेक वर्षांचा काळ थोड्या शब्दांत आणि थोड्या काळात शब्दबद्ध करायचा म्हणजे आव्हानच असतं; पण ‘दाहीदिशा’ सदरातून मला हा संवाद मुक्तपणे साधता आला. कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कोणत्याही प्रकारची प्रचाराची भावना मनात न ठेवता जे घडलं ते तशाच पद्धतीने नवीन पिढीला कळावं, या दृष्टिकोनातून हे लिखाण केलं. या टप्प्यावर आल्यानंतर विविध चांगले अनुभव आले, त्यातील ज्या गोष्टी टिकून राहिल्या त्या ‘वटवृक्षा’ची आठवण समारोपाच्या या लेखातून येत आहे.
एखाद्या सामाजिक कामाला पूर्वी वटवृक्षाची उपमा दिली जात असे. आजकालच्या काळात अशा उपमा कालबाह्य झालेल्या आहेत. परंतु, एखादं मोठं वादळ येतं, त्या वादळात काही वृक्ष उन्मळून पडतात, तर काही वृक्ष वाचतात. त्यामुळे आपण नक्की कशा प्रकारचं काम उभं केलं, याचं उत्तर आपल्याला काळच देत असतो. संघटनेची आतापर्यंतची झालेली वाटचाल पाहिली तर नक्कीच या वटवृक्षाची पाळंमुळं ही खोलवर असल्याचं जाणवतं.
१९७५ च्या आंतरराष्ट्रीय महिला दशकापासून ते १९८५ पर्यंतचा काळ महिलांचा विकास, शांतता, समानता आणि मैत्री या संदर्भातील होता. १९९५ पासून त्याचे परिणाम दिसू लागल्याने ‘स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहूया’ हा विचार स्वीकारला गेला.
१९८५ ते १९९५ या काळातच महिलांना आरक्षण आणि त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग, महिला धोरण यांना अधिक मोठ्या प्रमाणात स्थान मिळत गेलं. त्यामुळे स्त्रियांच्या सामाजिक विचारांच्या पातळीवर असणाऱ्या जागृतीला मूलभूत रूप देण्यासाठीचा पाया खणल्याचं यानिमित्तानं जाणवतं.
इथे पुन्हा एका वृक्षाची मला आठवण होते, की ज्यामध्ये मुळं जशी जमिनीत खोलवर राहतात, तसं त्यावर त्याचं वय अवलंबून असतं. वृक्षाची मजबुती अवलंबून असते. वृक्षाला जी पानं-फुलं असतात आणि त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या असतात तेव्हा तो जमिनीत अगदी ठाम उभा राहतो. त्यामुळे त्याला दुहेरी पद्धतीने आधार मिळतो. एक जमिनीतून आणि दुसरा आकाशातून...
स्त्रियांच्या चळवळीत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी लेखिका-अभ्यासक पॅट्रिशिया यांनी महिला चळवळ म्हणजे नक्की काय, याबाबतचं केलेलं विवेचन नक्कीच अतिशय बोलकं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चुलीमधून किंवा उष्णतेच्या धगीवर ज्या वेळेला भात शिजायला लागतो, तेव्हा वरच्या बाजूलासुद्धा ताटलीत पाणी ठेवलं जातं.
ते पाणी उकळलं म्हणजे भात छान शिजतो... तशीच काहीशी, तळागाळातून येणाऱ्या स्त्रियांमधील नव्या विचारांमुळे समाजाच्या इतर घटकांना मिळणारी शक्ती अधिक महत्त्वाची आहे. संघटनेच्या माध्यमातून केलेला हा प्रवास तसाच आहे. गेल्या काही वर्षांमधील अनुभवांचे मांडलेले शब्द सगळे माझेच आहेत.
जसा गोफ विणताना एकावर एक एक दोरा ठेवून चालत नाही; तर त्यात अनेक धागे असावे लागतात तसाच गोफ विणायचा माझा प्रयत्न होता. जेणेकरून एक धागा तुटला, तरी स्त्रियांच्या चळवळीची ही वीण कायम राहील. स्त्रियांची चळवळ कशा प्रकारे आपल्याला अजून मजबूत करता येईल, असा विचार आला.
एकेकट्या स्त्रीवर काम सोपविण्यापेक्षा तिच्याबरोबर तयार झालेल्या छोट्या छोट्या समूहाचे मिळून एक महाजाल किंवा एक मोठा सेतू तयार होतो. त्या सेतूची एक वेगळी शक्ती असते. त्याचं प्रत्यंतर मला लेखन प्रवासात आले आणि ते मी लिहीत गेले. त्यातील लेख समाजमाध्यमावरून प्रसारित झाले, तसं वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांच्या प्रतिक्रिया मिळाल्या.
सामूहिकरीत्या वाचनासाठीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी त्याचा उपयोग केला. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्राच्या ग्रुपवर त्यांचं चांगलं स्वागत झालं. अनेक ठिकाणी स्त्रियांनी ते आपापल्या बचत गटांमध्येसुद्धा प्रसारित केलं. त्यामुळे ते ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ पुरवणीत प्रसिद्ध झालं असलं, तरीही प्रत्यक्षात त्याचा वाचक महाराष्ट्रभर पोहोचलेला होता, हीदेखील वस्तुस्थिती आहे.
त्यानिमित्तानं मला विविध महिला कार्यकर्त्यांच्याही आठवणी आल्या. त्यांच्यासाठी प्रयत्न करता करता अगदी आपण अचूक आणि निर्दोष काम केलं पाहिजे, यासाठी धडपडणाऱ्या महिला कार्यकर्त्या आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून मला आपलं काम कधी समृद्ध झालं, किती मजबूत झालं, याची पुन्हा एकदा प्रचीती आली. दीर्घकाळ ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर काम केलं त्यांचा सहभाग आणि त्यांच्या प्रत्यक्ष योगदानाची ही यशोगाथा आहे, असं मला वाटतं.
सर्व टप्प्यांवर विविध प्रसंगांमध्ये तावूनसुलाखून तयार झालेल्या कार्यकर्त्यांचं योगदानही तेवढंच आहे. संघटना सुरू झाल्यापासून ज्यांच्यासोबत काम केलं, अशा मीनाताई इनामदार, मृणालिनी कोठारी, विश्वस्त म्हणून पहिल्यापासून असलेल्या झेलम जोशी, शेलार गुरुजी आणि अपर्णा पाठक, अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, विभावरी कांबळे व अश्विनी शिंदे यांच्यासारख्या महिलांचा प्रत्यक्षातील सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
पण या सगळ्या कामांत अनेक नावं राहिली, त्याचीही रुखरुख मनात आहे. या प्रवासात अनेक मैत्रिणी होत्या. त्यातल्या काही जणी हरवल्या, थांबल्या; तर काही काळाच्या आड गेल्या. त्यामध्ये वत्सला पाटील, ज्योती कोटकर, शेलार गुरुजी, विद्युत भागवत, सुंदराबाई जाधव यांच्यामुळे खऱ्या अर्थाने संघटनेचं काम समृद्ध झालं.
सामान्य स्त्रियांचं मिळालेलं प्रेम, आदर, शक्ती आणि नव्या उमेदीनेच विधान परिषदेतील आमदार ते उपसभापतिपदापर्यंतचा हा २२ वर्षांचा प्रवास अनुभवाने परिपूर्ण करणारा आहे. सर्वांची मैत्री सोबत होती. त्यामुळे कधीच असं वाटलं नाही, की आपलं काम कुठेतरी अधुरं राहिलं आहे.
दाही दिशांचा प्रवास करत असताना मन मात्र तेवढंच ताजंतवानं आणि उत्साही राहिलं. त्याला कारण- समोरून येणारा प्रतिसाद फारच सुंदर होता. एक माझी आवडती कविता आहे, इंदिरा संत यांची. त्यामध्ये ‘उधळलेस तू जे माझ्यावर, उधळलेस तू जे माझ्यावर, अजूनही नाही शब्द वेगळे, अजूनही नाही शब्द वेगळे, अजूनही नाही रक्त वेगळे’ अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यात शेवटी म्हटले आहे, की ‘मुजोर फुटले पुरे तुरे जीवाला, मुजोर फुटले पुरे जीवाला... गेले भेदून दगडी अंबर!’ असे दगडी अंबर भेदत असतानाच मनातला आनंद तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे झालेला आहे. तो गगनातसुद्धा न मावणारा आहे, असेच मी माझ्या सदराचा समारोप करताना म्हणू इच्छिते.
(समाप्त)
neeilamgorhe@gmail.com
(लेखिका विधान परिषद उपसभापती आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.