world of cricket in Biopic movie film ms dhoni chakda xpress 83 lagan Sakal
सप्तरंग

‘बायोपिक’मधली क्रिकेटची दुनिया...

भारताचे क्रिकेट प्रेम किंवा क्रिकेट वेड सर्वश्रुत आहे.

अमोल शिंदे

क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती करणे हा काही नवीन विषय नाही. देव आनंद यांनी सर्वप्रथम १९५९ साली ‘लव्ह मॅरेज’ या चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका साकारून एका क्रिकेटपटूची प्रेमकथा पडद्यावर दाखवली होती.

पुढे याच देव आनंद यांनी आपल्या शेवटच्या कारकीर्दीत १९९० मध्ये आमिर खानला घेऊन ‘अव्वल नंबर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाची कथा क्रिकेटवरच आधारित होती. पण हा चित्रपट बहुतेक आमिर खानचा सर्वांत साधारण चित्रपट असेल, अगदी ‘मेला’ चित्रपटापेक्षा सुद्धा साधारण.

क्रिकेट आणि चित्रपट. दोन्हीमध्ये मनोरंजन, पैसा, रोमांच, दोन्हीमध्ये ग्लॅमर, अंगभूत कलागुणांना मिळणारा वाव आणि दोन्हीमध्ये प्रशंसकांची आणि टीकाकारांची कोट्यवधींची संख्या. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली, तरी त्यांच्यात खूप साम्य आहे.

भारताचे क्रिकेट प्रेम किंवा क्रिकेट वेड सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेकांनी क्रिकेट आणि बॉलिवुड यांची सांगड घालून पैसा कमावण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट विषय घेऊन तयार केलेल्या चित्रपटांमध्ये ‘लगान’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणता येईल.

भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास लिहायचा झाला, तरी पहिल्या काही चित्रपटांत क्रिकेट खेळावर आधारित या लगान चित्रपटाचे नाव सहज येईल. ‘मदर इंडिया’ नंतर ऑस्करसाठी नॉमिनेट झालेला हा दुसरा भारतीय चित्रपट. आशुतोष गोवारीकरने अत्यंत उत्कृष्टपणे ही कथा पडद्यावर मांडली होती. आमिर खानचा अभिनय आणि ए आर रहमानच्या संगीताने त्या कलाकृतीला चार चाँद लावले होते. लगानने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती.

२००१ मध्ये लगानमध्ये भुवन ही अजरामर व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आमिरने अव्वल नंबर सारखा चित्रपट केला असेल, यावर विश्वास बसत नाही. मध्यंतरी १९८४ मध्ये मोहन कुमार यांनी निर्मिती असलेला ‘ऑल राउंडर’ नावाचाही एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरवने क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

लगानच्या यशाने मात्र अनेकांना थोडा हुरूप आला. २००५ या वर्षात श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेला ‘इक्बाल’ हा एक अत्यंत अव्वल दर्जाचा चित्रपट आला होता. एका मूकबधिर मुलाचा क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला होता.

त्यात श्रेयस तळपदेने इक्बालची तर नसीरुद्दीन शाह यांनी त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. इक्बालचा भारतीय क्रिकेट संघात कसा समावेश होतो ते चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आले होते. चित्रपट लो बजेट असला तरी त्यातील श्रेयस तळपदे आणि नसीरुद्दीन शाह ह्यांचा अभिनय अतिशय उच्च दर्जाचा होता. क्रिकेटवरील हिट ठरलेला हा दुसरा चित्रपट.

पुढे २००८ साली भट्ट भावांनी इम्रान हाश्मीसोबत ‘जन्नत’ हा चित्रपट केला होता. क्रिकेट विश्वातील बेकायदेशीर सट्टेबाजीवर आधारित हा चित्रपट होता. शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

२००९ मध्ये आलेला क्रिकेटवर आधारित हरमन बवेजाचा ‘व्हिक्टरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस डिझास्टर ठरला होता. त्याच साली रिलिज झालेल्या ‘दिल बोले हडिप्पा’ या चित्रपटात रानी मुखर्जीने महिला क्रिकेटपटूची कथा सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या सिनेमाचे कथानक साधारण होते.

हाच फॉर्म्युला वापरून थोडाफार बदल करत २०११ मध्ये ‘पटियाला हाउस’ हा चित्रपट निखिल अडवाणी आणि अक्षय कुमार ह्यांनी आपल्या पुढे आणला. हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

गेल्या वर्षी आलेला शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा क्रिकेटवरील सिनेमा देखील आदळला. मागच्या काही काळापासून क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर बायोपिकच्या निर्मितीचा ट्रेंड बॉलिवुडमध्ये सुरू झालेला पाहायला मिळत आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.

सुशांत सिंगने या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक नीरज पांडेंनी रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन जागतिक क्रिकेटमध्ये ठसा उमटवणाऱ्या धोनीचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते.

हैदराबादमधून भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनचा जीवनपट उलगडणारा ‘अझहर’ हा चित्रपट २०१६ मध्ये आला. त्यात इमरान हाश्मीने अझहरची भूमिका साकारली होती.

भारतीय संघाचा यशस्वी कप्तान ते मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकलेला क्रिकेटर असा अझहरुद्दीनचा प्रवास या चित्रपटात आहे. क्रिकेटच्या शिखरावर पोहोचलेला हा कप्तान एक माणूस म्हणून कसा होता, याचा उलगडा दिग्दर्शकाने उत्तमपणे केला आहे. मात्र, खेळांवर आतापर्यंत आलेल्या अनेक चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटात क्रिकेटची लोकप्रियता कॅश करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाला जमले नाही.

२०१७ मध्ये सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट रिलिज झाला होता. सचिनचे आयुष्य सांगण्यासाठी चित्रपटाची रूढ असलेली चौकट निर्माता-दिग्दर्शकाने निवडली नव्हती.

सचिन स्वतःच त्याच्या आयुष्याची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. ‘डॉक्युड्रामा’च्या आकृतिबंधात सिनेमा उलगडत जातो. नव्वदच्या दशकात एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला सचिन केवळ एक खेळाडू म्हणून न राहता तो एक ब्रँड कसा बनला, एक फिनॉमिना कसा झाला, ही सारी गोष्ट इथे अनुभवायला मिळते.

पुढे १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाचे आपल्यातील बरेच क्रिकेटरसिक प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकलो नसले, तरी ‘८३’ या चित्रपटाद्वारे कबीर खानने तो क्षण आपल्याला रुपेरी पडद्यावर जगण्याची संधी दिली. ‘८३’ मध्ये त्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रवास समाविष्ट आहे, ज्याने देशाला विश्वास ठेवण्यास आणि खंबीरपणे उभे राहण्यास शिकवले.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही एका कलाकाराला महत्त्व देऊन हा चित्रपट पुढे सरकत नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्र हा या चित्रपटाचा प्राण आहे. हा चित्रपट ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍फक्त १९८३ मध्‍ये जिंकलेल्या विश्‍वचषकाच्‍या आठवणींना उजाळा देत नाही, तर हा चित्रपट १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला मानसन्‍मान मिळवून देणाराही आहे.

ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात, त्याच वयात ज्या खेळाडूनं किमया करत आपल्या खेळाच्या बळावर परिस्थितीच्या नाकावर टिचून आयपीएलमध्ये आपलं स्थान मिळवलं, तो खेळाडू म्हणजे प्रवीण तांबे. ज्याची परिस्थितीने २० वर्ष परीक्षा घेतली, त्या प्रवीण तांबेची प्रेरणादायी कथा श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेल्या ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाद्वारे आपल्या पाहायला मिळाली. श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी आपल्याला क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसला.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे व्हॉइस कथन टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे. त्यामुळे या चित्रपटाद्वारे राहुल द्रविड यांचीही व्हॉइस निवेदकाच्या रूपाने सिनेसृष्टीत एन्ट्री झाली, असेच म्हणता येईल.

यात भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाबाश मिठू’ चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला. खऱ्या आयुष्यात सुपरहिट असलेल्या मिथाली राजचा प्रवास पडद्यावर दाखवताना चित्रपटाचा निर्माता मात्र सुपरफ्लॉप ठरला. महिला क्रिकेटमधील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक भारताच्या झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

थोडक्यात काय तर क्रिकेट या विषयावर आजवर अनेक चित्रपट तयार झालेत आणि जोपर्यंत भारतात क्रिकेट वेड जिवंत आहे, तोवर या विषयावर चित्रपट येतच राहणार. पण ह्या गर्दीत क्रिकेटवर आधारित नसला, तरी खेळाडूचा जीवनपट म्हणून परफेक्ट वाटावा, असा ‘भाग मिल्खा भाग’ सारखा एखादाच चित्रपट कायमस्वरूपी छाप सोडून जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT