Writing Table sakal
सप्तरंग

बोधिचित्ताची मशागत

मोठ्या हौसेनं बनवून घेतलेलं लिखाणकामाचं एक डेस्क आमच्या घरात आहे. त्याचा शिरोभाग अगदी पारंपरिक 'Writing Desk' सारखा आहे. ती फळी उचलली की आत प्रशस्त ड्रॉवर आहे.

डॉ. आनंद नाडकर्णी

मोठ्या हौसेनं बनवून घेतलेलं लिखाणकामाचं एक डेस्क आमच्या घरात आहे. त्याचा शिरोभाग अगदी पारंपरिक 'Writing Desk' सारखा आहे. ती फळी उचलली की आत प्रशस्त ड्रॉवर आहे. ह्या डेस्कचे पाय चांगले चार फूट लांब आहेत. त्या पायांना चाकं आहेत. जिथं माझा लेखनासाठी बसायचा मूड होईल, तिथं हे डेस्क नेता येतं. म्हणजे ते माझे ‘मोबाइल’ लेखन-टेबल आहे.

अठ्ठावीस वर्षांपूर्वी, ज्या घरामध्ये मी हे टेबल बनवून घेतले, ते घर मात्र त्यानंतर काही काळातच मला सोडावं लागलं. आपण ज्या गोष्टींना ‘माझं’ समजून चालतो त्या गोष्टी ‘आपल्या’ नसतात, आपल्या इच्छेवर चालत नसतात हे जाणवण्याचा अनुभव होता तो. अत्यंत जवळची, प्राणप्रिय नाती कडू होता होता तुटण्याच्या टोकाला गेली होती.

राहत होतो, त्या प्रशस्त घरावरचा हक्क कायमचा सोडून बाहेर पडायचे होतं. ‘स्व’कष्टाचं, कमाईचं अशा विशेषणांनी मढवलेल्या साऱ्या वस्तूही तिथंच सोडायच्या होत्या. रोजच्या लागणाऱ्या कपड्यांच्या दोन बॅगा आणि हे आवडतं डेस्क घेऊन हा ‘रामराम’ सोहळा एकट्यानंच करायचा होता.

परिस्थिती अशी होती, की नवीन घर घ्यायला खिशात पैसे नव्हते. मोठ्या आशावादानं उभारणी केलेली संस्था आर्थिक दृष्टीनं प्रचंड अडचणीमध्ये होती. आणि त्यात भर म्हणजे, दोन्ही पायांमध्ये रक्तवाहिन्यांच्या त्रासांमुळं सूज आणि वेदना. घरामध्ये कधीकधी खुरडत-खुरडत चालायला लागायचं. भरीला एका पायावर होऊ घातलेले अल्सर्स... ह्या सगळ्यामुळं स्वतःच्या प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष. तिथून येणारी पैशाची आवक कमी.

संस्थेवरच्या कर्जाचा डोलारा कमी करण्यासाठी दिवसा, सकाळी दहा ते संध्याकाळी पाच ह्या वेळात वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन त्याचा निधी कर्जवसुलीसाठी द्यायचा. संध्याकाळपासून रात्री दहा-साडेदहा वाजेपर्यंत पेशंटस् पाहायचे आणि विरंगुळा हरवलेल्या छताखाली येऊन, दमल्या शरीरानं, झोपेची आराधना करायची.

आपलं दुःख जेव्हा असं भळभळतं असतं, तेव्हा आपण लगेच मलमपट्ट्या करायला लागतो. हे कुणामुळं झालं ?... ह्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती कोणत्या ?... प्रत्येक दोषारोपातून आपण जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करतो. दुःख कमी करण्यासाठी व्यसनांचा आश्रय घेतो... तेवढ्यापुरती सुटका. माझ्या मनात उत्पन्न झालेल्या जागृतीचा एक क्षण आठवतो आहे. त्या काळात नैमित्तिक धूम्रपानाची सवय वाढत चालली होती.

मी कधी घरामध्ये सिगारेट ओढायचो नाही. पण मध्यरात्रीनंतरही मन जागं राहायचं म्हणून एकट्यानं चोरटेपणी सिगारेट ओढायला सुरुवात झाली. एका रात्री अचानक वाटले की हा मार्ग बरा नाही. थांबलो. तो आजपर्यंत !... काय झालं असेल त्या क्षणाला.

एकतर अशा पर्यायांची निष्फळता कळली. पण अधिक महत्त्वाचं जाणवलं की माझ्या जगण्यावर माझा परफेक्ट आणि कायमचा कंट्रोल नाही आहे; हे सत्य झाकण्यासाठी चाललेली धडपड आहे ही. मला माझीच जखम बघवत नाही आहे... पण ती आहे ना! वाहती आहे ना!... अल्सर्स दोन प्रकारचे आहेत. शरीराचे आणि मनाचे. सूजही दोन प्रकारची... इनफ्लमेशन भावनांचं आणि रक्तवाहिन्यांचं. कसं एकसाथ रिॲक्ट करताहेत हे सारे भाग.

मनाची जखम भरायची तर ते हिलिंग आतून सुरू व्हायला हवं ना!... तर त्या रविवारी सकाळी, उन्हाळ्यातल्या दिवशी घरातून बाहेर पडण्याचा क्षण आला. माझे दोन सहकारी होते. एकाने बॅगा घेतल्या. दुसरा ढकलू लागला ते रायटिंग डेस्क. इमारत सोडली. सोसायटीच्या आवारात आलो... ओळखीचे कोणीही भेटू नये असे मन ओरडत होते. मेन गेटच्या जवळ एक उतार होता. त्यावरून डेस्क घरंगळत होतं, खडखड आवाज करत.

गेटवरच्या वॉचमनने मला एक मूक सलाम केला, सवयीनं. गेटबाहेरच्या रस्त्यावर आलो... आणि अचानक विचार आला, नवी सुरुवात, नवा प्रवास!... डोक्यावर आकाश आहे, पायाखाली रस्ता... खडखडणारे डेस्क म्हणजे जगण्याचा नवा ताल. तुझा इगो भुईसपाट होतोय. इगो म्हणजेच वास्तवाला वास्तवरूपात न पाहण्याचा अट्टाहास. बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे, 'That, which resists what is...'

माझ्या आयुष्यातला तो पाच-सहाशे मीटर्सचा पायी प्रवास मला शिकवत होता. कशालाही ‘धरून-पकडून’ ठेवण्याच्या अट्टाहासाचा फोलपणा. सुरक्षिततेच्या हव्यासामधून स्वतःभोवती बांधलेले तट... खंदक! आणि शेवटी त्यातच अडकलेला मी. माझा मुक्काम आता असणार होता अशा एका घरी, जिथं ह्या साऱ्या जायबंदीपणासकट माझा विलक्षण प्रेमानं स्वीकार झाला.

माझ्या बहिणीच्या सासु-सासऱ्यांच्या घरी मी पुढचे काही महिने, ‘नॉन पेइंग गेस्ट’ म्हणून राहणार होतो. त्यांचं घर होतं दुसऱ्या मजल्यावर. इमारतीला लिफ्ट नव्हती. आम्ही डेस्क चढवले जिन्यावरून. घरात आलो. आबा आणि आजींनी अगदी हसतमुखानं स्वागत केलं. त्यांच्या नातवंडांचा मी ‘मामा.’

म्हणून त्या कुटुंबातलं माझं नावच ‘आनंदमामा.’ तर आबा म्हणाले, ‘मामा, ह्या बाल्कनीमध्ये तुझी स्टडीरूम करतो आणि लागले की माझे डेस्क. त्यासमोर खुर्ची. शेजारी एक शेल्फ. हाताच्या अंतरावर, पंख्याचे बटण... समोरच हाताच्या अंतरावर माडाच्या झावळ्या... मोकळं आकाश... क्षणभर बसलो तिथं.

सत्याच्या सोबत, वास्तवाच्या बरोबर; अगदी आरामात राहण्याचा, सचैल असण्याचा क्षण होता तो. अस्थिरतेचा स्वीकार. अनित्याबरोबर दोस्ती... माझ्या दुःखामुळं माझ्या क्षमता आक्रसून घ्यायच्या की त्या क्षमतांचा विस्तार करायचा? ... दुःखाला अगदी धरून ठेवायचे?... रोजचा न्यायनिवाडा करायचा? की आताच्या या भळभळत्या दुःखाकडून शिकायचं?...

मनात विचार आला, सहाशे मीटर्स अंतरावरच्या घरात असणारे ते दोघे... एक प्रौढ, एक अगदी छोटूला जीव! काय करत असतील? त्यांना माझी आठवण येत असेल का? त्या दोघांमध्ये काय संभाषण होत असेल? “बाबा कुठे गेला?” ह्या प्रश्नानंतर काय उत्तर मिळाले असेल? मी पुन्हा गिरक्या घेत त्या आवर्तामध्ये गेलो... सावरलो. आयुष्यातल्या एकाही क्षणाला गोठवण्याची सिद्धी माझ्यात नाही... माझ्या सगळ्या संवेदना बदलत आहेत.

दृष्टी आणि सृष्टी दोन्हीही गतिमान. माझ्या उद्ध्वस्तपणाचाही कोणताच ‘सॉलिड’ भाग माझ्याकडं नाही, असणार नाही. तरीही माझ्या मनाला इतका ‘जडपणा’ का आला आहे?... उत्तर मिळालं. कारण मी वाहत्या पाण्याचा बर्फ केलाय... माझ्या विचार-भावनांना हलके करायचे की जड, ते माझा दृष्टिकोन ठरवतो.

माझ्या हळव्या क्षणांना कमी लेखणं ही सवय, मी त्या दिवसापासून बदलायला लागलो आणि अचानक स्वतःकडं आणि इतरांकडं पाहायची उत्सुकता जागृत झाली. आबा आणि आजींनी मला कधीच माझ्या दुःखाबद्दल विचारले नाही. काय सांगायचं, कधी सांगायचं हा चॉइस त्यांनी माझ्यावर सोडला. पण निरपेक्ष आपलेपणात ते कमी पडले नाहीत.

त्यांच्या छायेखालचे चार-पाच महिने माझ्यासाठी इतका दिलासा देणारे होते, की त्यामुळं वास्तव स्वीकारून त्याला सतर्क कृतिशीलतेने सामोरे जाण्याची ऊर्जा मिळाली. यथावकाश मी घर तयार केले, नवा संसार सुरू झाला. संस्था आणि मी दोघेही सावरलो. आणि पाहता-पाहता अठ्ठावीस वर्षे झाली.

आज माझ्या समोर, उद्ध्वस्त कालखंडातून जाणारी व्यक्ती जेव्हा येते तेव्हा माझ्या वेदनेतून मला समोरच्या व्यक्तीबद्दलची आपुलकी मिळते. त्या व्यक्तीची वेदना न विचारताही मला कळते. आजी-आबांनी दिलेली मायेची पाखर मी आनंदाने अशा व्यक्तीवर घालत राहतो. आणि त्यातून कशाचीच अपेक्षा नसते... म्हणजे अठ्ठावीस वर्षांपूर्वीचे दुःख, मला समृद्ध जगण्याची प्रेरणा देऊ शकते.

दुःख-वेदनेमध्ये असलेली ही शक्ती मला माझ्या अपुरेपणाचे भान देते. स्वतःला आणि इतरांना मदत करताना माझ्याकडे काही जादुई-अमानवी शक्ती असणार नाहीत. प्रत्येक परिस्थितीला, संपूर्ण क्षमतेनं तोंड देण्याची माझी ताकद आजही काही परिपूर्ण झालेली नाही. तसे व्हावे असा माझा आग्रह नाही.

कारण दातदुखी असो की कमरेचा स्पाझम!... नात्यामधला मनोभंग असू दे की व्यावसायिक अपयश!... विरह असू दे की कायमचा वियोग... मी माझ्या ठसठसत्या, भळभळत्या भावनांकडं पाहत राहतो. त्याबद्दलच्या वैचारिक वादळांपासून स्वतःला सावधपणे दूर ठेवायचा प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे माझ्या समर्थनासाठी ह्या दुःख-वेदनांचे रामायण-महाभारत रचत नाही. ह्या रचनेतूनच गुंते निर्माण होतात हे मला अनुभवाने कळतं आहे.

त्रंगपा रिंपोचे नावाचे बौद्धभिक्षु सांगतात, की बोधिचित्त म्हणजे मनाच्या उन्नत अवस्थेकडे जायचे तर "Begin with a broken heart." स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या दुःख-वेदनांपासून दूर पळणे, त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करायला पाहणं ह्याचा उपयोग नाही होत. त्यामुळं आपण जगण्याच्या समग्र अनुभवापासून स्वतःलाच दूर नेतो. आपले मनोमय विश्व आक्रसत जाते. स्वतःबरोबरची मैत्री उसवते.

दुसऱ्यांबरोबरचं कनेक्शन विरून जातं. भोवतालच्या परिस्थितीबद्दल आणि मानवी नात्यांबद्दलची भीती वाढीला लागते. ह्या भीतीच्या जाळ्यात माणूस अडकतो... पण तो स्वतःला मुक्तही करू शकतो आणि अतिशय रसपूर्ण आयुष्य जगू शकतो. जगणं परिपूर्ण करण्याचा अट्टाहास त्याच्यापासून दूर गेलेला असेल तर.

... आता ह्या क्षणाला, मी आणि माझं रायटिंग डेस्क एकमेकांकडे पाहत अठ्ठावीस वर्षांची आमची दोस्ती अनुभवत आहोत. एका नाजूक, नि:शब्द शांततेमध्ये!

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सलील देशमुख पत्रकार परिषद घेणार

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT