X app sakal
सप्तरंग

‘एक्स’विषयी बोलू काही...

आपल्याला आभासी जगात अवतरण्याची संधी देणाऱ्या ढीगभर मोबाईल अॅप्लिकेशन्सची स्पर्धा गोंधळ वाढवत आहे.

योगेश बोराटे, माध्यम अभ्यासक borateys@gmail.com

आपल्याला आभासी जगात अवतरण्याची संधी देणाऱ्या ढीगभर मोबाईल अॅप्लिकेशन्सची स्पर्धा गोंधळ वाढवत आहे. त्यात कोणा दोन बड्या कंपन्या तुम्हा-आम्हाला ‘कोणी ट्विटर घ्या, तर कोणी थ्रेड्स घ्या’ करत साधारण मागचा पंधरवडाभर झुलवताहेत. आता या गोंधळात भर पडली ती म्हणे कोणा ‘एक्स’ची! या नव्या ‘एक्स’ फॅक्टरचे प्रवर्तक जगद्विख्यात गर्भश्रीमंत एलन मस्क यांनी ‘ट्विटर’चे ‘एक्स’शीकरण केले, बोलू त्या ‘एक्स’विषयी...

डिजिटल विश्वातच नाही, तर वास्तव जगातही ‘लॅरी, द बर्ड’ नावाने ओळखली जाणारी ती निळी चिमणी ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटची २००६ पासूनची ओळख होती. ‘ट्विटर’वर ती २००६ पासून वापरात आली असली तरी प्रत्यक्षात २०१० मध्ये ही चिमणी ट्रेडमार्क झाली.

अगदी काल-परवापर्यंत वापरात असलेली नव्या स्वरूपातली चिमणी ‘ट्विटर’वर अवतरली ती २०१२ मध्ये. मस्क यांचे या चिमणीकडे लक्ष गेल्यानंतर, त्यांना ती बहुदा पिंजऱ्यात बंद करून ठेवलेली भासत असे. त्यामुळेच ही चिमणी पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी साधारण २०२२ सालच्या पहिल्या तिमाहीत ट्विटरच्या तत्कालीन संचालक मंडळासोबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या.

ऑक्टोबर, २०२२ मध्ये त्या विषयीचा आर्थिक व्यवहार पूर्णत्वास जात असताना मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ‘द बर्ड इज फ्रीड’ म्हणत, ती निळी चिमणी मोकळी केल्याचा संदेश जगभर प्रसारित केला होता. त्यांच्या त्या संदेशाला त्यावेळी अमेरिकन संदर्भातील ‘फ्री स्पीच’, अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेची आणि त्याविषयी तिकडे सुरू असलेल्या साधक-बाधक चर्चांची पार्श्वभूमीही मिळाली होती.

त्याच जोडीने ट्विटर कंपनीच्या मालकी हक्कांमध्ये होत असलेल्या बदलांची आर्थिक आणि व्यावहारिक झलक केवळ आभासीच नाही तर वास्तवातल्या जगालाही दिसली. मस्क ट्विटरचे मालक म्हणून प्रस्थापित झाले ते त्यानंतर.

त्यावेळी फ्री स्पीचसाठी म्हणून ‘ट्विटर’ची चिमणी मोकळी करणारे मस्क आता पुन्हा चर्चेत आले आहेत, ते ही निळी चिमणी पूर्णपणे हटवून, त्या ठिकाणी आपल्या जुन्या ‘एक्स डॉट कॉम’ या त्यांच्या मालकीच्या वेबसाईटशी संबंधित ‘एक्स’ हे अक्षर लोगो म्हणून ‘ट्विटर’च्या वेबसाईटवर बसवल्यामुळे!

एक प्रस्थापित ओळख पुसून, एक जुनी ओळख नव्या आणि वेगळ्या संदर्भाने ठसठशीतपणे जगासमोर आणण्याचा उद्योग मस्क यांनी गेल्या साधारण दीड वर्षाच्या कालावधीत करून दाखवला आहे. याला ‘ट्विटर’चे रिब्रँडिंग’ म्हणायचं की ‘एक्स डॉट कॉम’चा विस्तार, हे अद्यापही पुरेसे स्पष्ट व्हायचे आहे.

सुरुवातीला त्या अर्थाने ‘ट्विटर’चा लोगो बदलला असला, तरी ट्विटर वेबसाईटचे डोमेन नेम कायम आहे. मात्र, या पुढील काळात कदाचित ‘एक्स डॉट कॉम’ सर्व ठिकाणी आपले हात-पाय पसरायला सुरुवात करणार आहे. त्याचाच भाग असावा कदाचित, सुरुवातीपासून ‘Twitter’ अशा नावानेच असणारे ‘@twitter’ हे ट्विटर हँडल अगोदर ‘X’ हे नवे नाव धारण करून पुढे आले आणि तेच हँडल २६ जुलै, २०२३ रोजी ‘@X’ झाले.

त्या अर्थाने मस्क यांच्या या हालचाली ‘ट्विटर’ची ती निळी चिमणीच नाही, तर ‘ट्विटर’ हे नावही पुसून टाकत चालले आहेत. आता इतरही अशा अनेक बाबी हळूहळू ‘एक्स’ होणार आहेत, ‘या पूर्वीचे’ अशा अर्थानेही ‘एक्स’च!

अशा या ‘एक्स’विषयी बोलताना मस्क यांची नेमकी भूमिका आहे, ती ‘एक्स’ म्हणजे एक ‘सुपरअॅप’ म्हणून पुढे आणण्याची. अर्थात वापरकर्त्यांना त्यांना हव्या त्या सर्व सुविधा देणारे अॅप्लिकेशन म्हणून मस्क यांना हे ‘एक्स’ अपेक्षित आहे. मस्क यांची ही धारणा वापरकर्त्यांसाठी वास्तवामध्ये खरंच तशीच असणार आहे का, की त्या आडून आणखी बरंच काही होऊ पाहत आहे?

मस्क यांची आतापर्यंतची वाटचाल लक्षात घेतली तर या क्षेत्रातली जाणकार मंडळी वापरकर्त्यांसाठी थोडा सावधानतेचा इशारा निश्चितच देतील. त्याला कारण आहे, तो या क्षेत्राचा आजपर्यंतचा इतिहास. गेल्या काही काळातील अशा सर्वच घटनांची क्रोनोलॉजी, अर्थात घटनाक्रम पाहिला तर त्यातून या क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेची तीव्रता आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात येतात.

हे प्रकरण म्हणजे ‘ट्विटर’चे निव्वळ रिब्रँडिंग’ असे मानणाऱ्यांसाठी यापूर्वीची रिब्रँडिंगची अशी प्रकरणे आणि हे प्रकरण यामधील फरक समजून घेणे गरजेचे ठरणार आहे. यापूर्वी ‘फेसबुक’ किंवा ‘गुगल’चे रिब्रँडिंग हे या दोन्ही कंपन्यांच्या मातृसंस्थांच्या नावांमधील बदल होता. ‘फेसबुक’ची मातृसंस्था म्हणून ‘मेटा’ ही नवी कंपनी एक नवी ओळख म्हणून उदयाला आली, तर ‘गुगल’साठी ‘अल्फाबेट’ ही कंपनी मातृसंस्था बनली.

‘ट्विटर’च्या बाबतीत सध्या तसे घडत नाही, हा तो फरक. इथे ‘ट्विटर’चेच नाव पूर्णपणे बदलून ते ‘एक्स’ असे झाले आहे. ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’शी निगडित अशा घडामोडींमध्ये एक समान धागा आहे, तो या कंपन्यांविषयी त्या त्या वेळी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणाचा!

केंब्रिज ॲनालिटिका प्रकरण, जगभरातल्या निवडणुकांमधील हस्तक्षेपाविषयीचे आरोप आणि त्यानंतर ‘इन्स्टाग्राम’मुळे किशोरवयीन मुला-मुलींवर होणारे नकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर ‘फेसबुक’ला रिब्रँडिंगचा विचार करावा लागला होता. ‘ट्विटर’च्या बाबतीत गेल्या वर्षभरातली परिस्थितीही काहीशी अशीच म्हणावी लागते आहे.

ट्विटर ट्रोलिंग आणि कडव्या विचारधारांच्या समर्थनासाठी ट्विटरवरून मोहिमा चालविण्याचे प्रकार तसे कोणाला नवीन नव्हते. मात्र, मस्क यांनी ट्विटर विकत घेत असतानाच सुरू झालेली ‘डिलिट ट्विटर’ची चळवळ आणि त्यानंतर ‘ट्विटर व्हेरिफाईड’ अकाउंटसाठी पैसे आकारण्याची केलेली सुरुवात ट्विटरविषयीच्या विश्वासार्हतेला धक्का लावणारी ठरली.

त्यापाठोपाठ ६ जुलै, २०२३ रोजी सोशल मीडियाच्या जगात ‘मेटा’ या कंपनीनं ‘थ्रेड्स’ हे ट्विटरसदृश मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केले. ‘इन्स्टाग्राम’ला जोडलेले माइक्रोब्लॉगिंग अॅप्लिकेशन हे या ‘थ्रेड्स’चं वैशिष्ट्य. हे लाँच झाल्या झाल्या, एकाच दिवसात जवळपास तीन कोटी लोकांनी डाऊनलोड करून ते वापरायला सुरुवात केली.

‘थ्रेड्स’विषयीचा हा घटनाक्रम ‘मास अडॉप्शन’चा उत्तम नमुना म्हणून सध्या विचारात घेतला जातो आहे. ही सर्व पार्श्वभूमी ‘ट्विटर’समोरील आव्हाने वाढवणारी ठरली होती. त्यापाठोपाठ आता ‘एक्स’ आपल्यासमोर अवतरले आहे.

सुरुवातीला मस्क यांच्याच मालकीचे असणारे ‘एक्स डॉट कॉम’ हे डोमेन नेम आणि त्याच्याशी संबंधित वेबसाईट मस्क यांनी २०१७ मध्ये ‘पेपल’ या कंपनीकडून पुन्हा विकत घेतले होते. त्याच्याशी आपल्या भावना जोडल्या असल्याविषयीचे ट्विट मस्क यांनी तो व्यवहार पूर्ण होत असताना केले होते.

ज्या ट्विटरवरून त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या होत्या, ते ‘ट्विटर’च त्यांनी ‘एक्स’च्या अधिपत्याखाली घेतले आहे, हेही या प्रकरणाचे एक वेगळेपण. ‘स्टॅटिस्टा’च्या जानेवारी २०२३ साठीच्या आकडेवारीनुसार, जगभरात ‘ट्विटर’चे दरमहा साधारण ५५ कोटी ६० लाख (५५६ दशलक्ष) वापरकर्ते आहेत.

‘स्टॅटिस्टा’च्या अशा यादीमध्ये सध्या ‘एक्स डॉट कॉम’ कुठेही दिसत नाही. वेबसाईट रँकिंगच्या बाबतीत, ‘सिमिलर वेब’च्या आकडेवारीनुसार, ‘एक्स डॉट कॉम’ची ग्लोबल रँक आहे १ लाख ४८ हजार ४९७ वगैरे. ही सगळी आकडेवारी या क्षेत्रातली स्पर्धा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरते आहे.

अशा स्पर्धेत उतरण्यासाठी वास्तवात उपयुक्त ठरतात ते ग्राहक! आजच्या काळात ‘डेटा’, ‘डिव्हाईसेस’ आणि ‘डिस्ट्रॅक्शन’ वापरून, नानाविध क्लृप्त्या लढवून बिग-टेक आणि सोशल मीडिया कंपन्या तुम्हा-आम्हाला त्यांचे ग्राहक बनवतात. त्यासाठी तुम्हा-आम्हाला दिली जाणारी ‘सर्व्हिस’, ती मिळविण्यात खर्ची पडणारी आपली वेळ ही ‘अटेन्शन’ मानून, या कंपन्या त्यांचा ‘बिझनेस’ मार्गी लावतात.

मस्क यांनी ‘ट्विटर’साठी आणलेली ‘एक्स’ ही नवी ओळख तशी बँकिंग आणि अर्थकारणाच्या क्षेत्राशी निगडित आहे. ही ओळख आता यापूर्वी ‘ट्विटर’वर मुळातच असणाऱ्या ग्राहकसंख्येच्या मदतीने विस्तारणार आहे. ‘एक्स’चे ‘सुपरअॅप’ जगासमोर आल्यावर त्याद्वारे मिळणारी सर्व्हिस लक्षात घेत वापरकर्ते त्यासाठीचे अटेन्शन पुरविणार आहेत. त्या आधारे ‘डेटा - डिव्हाईसेस - डिस्ट्रॅक्शन’ ही साखळी मस्क यांच्यासाठी पुन्हा एकदा ‘बिझनेस’ करून देणार आहे.

‘ट्विटर’चे सहसंस्थापक नि यापूर्वीचे सीईओ जॅक डॉर्सी वगैरे मंडळी सध्या बिटकॉईनविषयीच्या चर्चा करताना दिसतात. त्यामुळे आपले वास्तवातले अतिश्रीमंत मस्क आभासी जगातल्या त्या स्पर्धेत या नव्या ‘एक्स बिझनेस’च्या मदतीने जोमाने उतरले तर ते नवल नसेल. त्यावेळी ‘ट्विटर’चे रिब्रँडिंग वगैरे कोणी विचारात घेणार नाही, इतकेच.

borateys@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT