United States Joe Biden sakal
सप्तरंग

एका फुग्याचं कवित्व

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री चीनच्या अध्यक्षांना चीनमध्ये भेटण्याची यात शक्‍यता होती. तूर्त ती दुरावली. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात चीन थेट अमेरिकी आकाशात टेहळणी करत असताना बायडेन प्रशासन

श्रीराम पवार, shriram1.pawar@gmail.com

आकाशातून निघालेला फुगा काय काय उलथापालथ घडवू शकतो, याचं दर्शन अमेरिकेनं हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा वापर करून पाडलेल्या चिनी फुग्यावरून होऊ शकतं. हा प्रचंड आकाराचा बलून किंवा फुगा अमेरिकी भूमीवरून निघाला असताना अमेरिकेनं तो पाडला.

त्यासाठी ‘एफ १६’ या फायटर एअरक्राफ्टसारख्या आधुनिक विमानाचा आणि संवादयंत्रणांचा वापर केला गेला. हा फुगा पाडणं हे एक मोठंच मिशन असल्यासारखं त्याचा व्हिडिओ सार्वत्रिक करून गाजावाजा केला गेला.

चीनच्या मते, हा फुगा हवामानाचा अभ्यास करण्यासाठीच्या निरुपद्रवी उपक्रमाचा भाग होता, तर अमेरिकी मतानुसार, तो एक गुप्तचर-उपक्रमाचा हेरगिरी करण्यासाठी सोडलेला ‘स्पाय-बलून’ होता. या फुग्यानं अमेरिकेच्या हवाई हद्दीचा भंग केला, म्हणजेच अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा तयार झाला, तेव्हा तो पाडणं हाच मार्ग होता.

ज्याला ‘ग्रे झोन टॅक्‍टिस’ म्हणतात - ज्यात प्रतिपक्षाच्या सहन करण्याच्या मर्यादा ताणत नेल्या जातात - असे उपद्‌व्याप करण्यात चीन मुरलेला खेळाडू आहे; मात्र, त्याला खणखणीत उत्तर देऊन अमेरिकेनं चीनला धक्का दिला आहे. एकतर दोन देशांत आधीच संबंध फार काही सौहार्दाचे नाहीत.

एक स्वतःला एकमात्र महासत्ता समजणारी शक्ती आणि दुसरी, आता आपणही महाशक्ती बनलोच आहोत म्हणून अमेरिकेच्या स्थानाला धक्का देऊ पाहणारी शक्ती यांच्यातील स्पर्धासंघर्षाचा विस्तार नाना क्षेत्रांत होतो आहे, त्यात या फुग्यानं नवा आयाम जोडला, किंवा तो आधीच होता, त्याची जगाला माहिती झाली.

यातून काही घडलं असेल, तर ते म्हणजे दोन देशांतील संबंध आणखी संशयाचे बनले. इतके की, या फुगाप्रकरणाचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचा दौराच रद्द केला. हा दौरा उभय देशांतील संबंधांत महत्त्वाचा होता.

तब्बल सहा वर्षांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री चीनच्या अध्यक्षांना चीनमध्ये भेटण्याची यात शक्‍यता होती. तूर्त ती दुरावली. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात चीन थेट अमेरिकी आकाशात टेहळणी करत असताना बायडेन प्रशासन करतं काय, असा सवाल विचारायची संधी तिथल्या विरोधी रिपब्लिकन पक्षाला मिळाली; तर ‘असे बलून गेली काही वर्षं येत आहेत, बायडेन प्रशासनानं या वेळी तो दिसताच उद्‍ध्वस्त केला ही बायडेन प्रशासनाची अखंड सावधानताच,’ असं प्रत्युत्तर दिलं गेलं.

हे पुन्हा बायडेन यांच्या एकाधिकारशाही देशांच्या विरोधातील मोहिमेशी सुसंगत. म्हणजेच, एका बाजूला अमेरिकेतील अंतर्गत राजकारणात हा फुगा तरंग उमटवतोय, दुसरीकडे अमेरिका-चीन यांच्यातील संबंधांना आणखी एक झटका देतानाच चीनच्या महत्त्वाकांक्षांना रोखणारा व्यूह साधण्याच्या प्रयत्नांना बळही देऊ शकतो. एका फुग्याची कहाणी अशी बहुआयामी आहे म्हणून दखलपात्रही.

हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वातावरणात असे मोठे फुगे सोडणं नवं नाही. अमेरिकेनं पाडलेला फुगा मात्र त्यापलीकडे अधिक काहीतरी शोधत असल्याचा अंदाज आहे. त्यावरची उपकरणं; खासकरून, तो पाडल्यानंतर सापडलेलं सेन्सर, त्यासाठी केलेली सौरऊर्जेची व्यवस्था, ॲन्टेना अशा काही बाबी हा फुगा हेरगिरीसाठी वापरला जात असावा, असा संशय तयार करणारी आहेत.

अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणांचाही असाच संशय आहे. तो नेमका कुठून कसा प्रवास करत आला याचे तपशील लगेचच समोर आलेले नाहीत; मात्र, जेव्हा हा फुगा अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनातील मॅन्टोनापर्यंत पोहोचला, तेव्हा तो पाडायचा निर्णय अमेरिकी सुरक्षायंत्रणांनी घेतला. तो पाडताना दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली, त्यातील एकानं लक्ष्यभेद केला. या एका क्षेपणास्त्राची किंमत चार लाख डॉलर इतकी आहे.

म्हणजेच, इतकी महागडी कारवाई करूनही, हा सुमारे ६५ हजार फुटांवरून निघालेला फुगा फोडला पाहिजे, असं अमेरिकी सुरक्षायंत्रणांना वाटत होतं, याचं एक कारण म्हणजे, जिथून तो निघाला होता तो भाग अमेरिकी अणुकार्यक्रमाशी संबंधित आणि या देशाचा क्षेपणास्त्रसाठा ठेवला जाणारा भाग आहे. तेथील कोणतीही माहिती अन्य कुणाला मिळण्याची शक्‍यताही अमेरिकेला सहन होण्यासारखी नाही.

अमेरिकी हवाई हद्दीचा भंग केल्याबद्द‌ल, हा फुगा बनवणाऱ्या कंपनीवरही अमेरिकेनं बंदी आणली. ही कंपनी चीनच्या  लष्कराशी संबंधित असल्याचं अमेरिकेचं सांगणं आहे. यानंतरही आणखी असेच दोन फुगे अमेरिकेच्या आकाशात आणि कॅनडावरून जात असताना पाडले गेले. यातून आता आकाशातून जाणाऱ्या प्रत्येक वस्तूकडे संशयानं पाहिलं जाईल हे स्पष्टपणे दिसतं.

हे फुगे चीननंच पाठवले हे आता उघड झालं आहे. याचं कारण, चीननं ते अमान्य केलेलं नाही. फक्त हा प्रामुख्यानं हवामानविषयक माहिती गोळा करण्यासाठीचा उपक्रम असल्याचा चीनचा दावा आहे. यात ‘प्रामुख्यानं’ या खास चिनी मखलाशीची दखल घेतली पाहिजे.

चीन फक्त, हवामानविषयक माहितीसाठीच हा फुगा होता, असं म्हणत नाही. ‘प्रामुख्यानं’ तो त्यासाठी असेल तर, इतर कोणती कामं त्याकडून चीनला अपेक्षित होती, असा संशयाला जागा देणारा प्रश्‍न आपोआपच उपस्थित होतो. फुगा पाडल्यानंतर, तो अमेरिकेवरून जाण्यासाठी बनवलाच नव्हता, त्यावरचं नियंत्रण सुटल्यानं तो भरकटला असावा, असंही चीनकडून सांगितलं गेलं.

खरंतर आता अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असताना फुग्यासारख्या पुरातन साधनाचा वापर टेहळणीसाठी करण्यात कितपत लाभ, हा एक प्रश्‍न उपस्थित केला जातो. फुग्यांचा वापर करून अन्य देशांच्या भूभागाची माहिती मिळवण्याचे प्रयत्न नवे नाहीत. लष्करी कामात असा वापरही नवा नाही. अगदी चीनमध्येही दहाव्या शतकापासून हे प्रयोग केले जात असल्याच्या नोंदी आहेत. फ्रान्समध्ये १७९४ मध्ये फुग्यांचा वापर लष्करी टेहळणीसाठी झाला होता, तसाच तो अमेरिकेच्या गृहयुद्धातही झाला होता.

अर्थात्, हे फुगे फार तर ‘अधिक उंचीवरचे टेहळणीबुरुज’ इतकंच काम करू शकत होते. यात मोठा बदल झाला तो पहिल्या महायुद्धाच्या काळात. फुग्यांचा वापर शत्रुपक्षाच्या हालचाली टिपण्यासाठी, त्याची छायाचित्रं घेण्यासाठी सुरू झाला. असे फुगे उद्‍ध्वस्त करणं हे लढाऊ वैमानिकांचं एक काम बनलं होतं.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत फुगे वापरण्याच्या तंत्रात आणखी प्रगती झाली; खासकरून, जपाननं अधिक उंचीवरून टेहळणी करू शकणाऱ्या फुग्यांची निर्मिती केली. सुमारे नऊ हजार फुग्यांचा प्रत्यक्ष बॉम्बफेकीसाठी वापर केला गेला. फुगे हवेच्या वेगानुसार जात असल्यानं त्यांची लक्ष्य साधण्याची क्षमताही मर्यादितच होती.

आगी लावणं, हे या फुग्यांचं महत्त्वाचं काम होतं, ते वाऱ्याच्या साथीवरच अवलंबून होतं; मात्र हे फुगेही युद्धाचा भाग होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धात प्रतिपक्षाकडील भूभागात टेहळणीसाठी फुग्यांचा अधिक जोरदार वापर सुरू झाला. अमेरिकेनं ५० च्या दशकात यासाठीचा ‘प्रोजेक्‍ट जेनेट्रिक्‍स’ नावाचा एक प्रकल्पच हाती घेतला होता,

ज्यातून सोव्हिएत संघ आणि त्यांच्या गटातील देशांवर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. फुग्यासोबत अन्य साधनांचाही यासाठी पूर्वापार वापर केला जातो. अमेरिकेनं पाकिस्तानातील पेशावरचा विमानतळ हा आपली कमी उंचीवरून उडणारी विमानं टेहळणीसाठी चीनवरील आणि सोव्हिएत संघावरील आकाशात धाडण्यासाठी वापरल्याचं प्रकरण प्रसिद्ध आहे. अमेरिकेचं असं एक विमान सोव्हिएत संघानं पाडलं तेव्हा आयसेनहॉवर आणि ख्रुश्‍चेव्ह यांच्यातील भेट रद्द झाली होती.

चीननं अमेरिकेचं असंच विमान १९५२ मध्ये पाडलं आणि त्यातील दोन सीआयए एजंटांचा कमालीचा छळ करत त्यांना दोन दशकं तुरुंगात ठेवलं होतं. सुमारे ७५ वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘रॉसवेल बलून क्रॅश’ म्हणून ओळखलं जाणारं प्रकरण इतिहासप्रसिद्ध आहे. हे काहीतरी परग्रहावरून आलेलं प्रकरण असावं, असे सिद्धान्त अनेकांनी मांडले होते, त्यावर पुस्तकंही निघाली.

अमेरिकेच्या हवाई दलानं ९० च्या दशकात जाहीर केलं, त्यानुसार हा अमेरिकेचा टेहळणीप्रकल्पाचा भाग होता. तो फुगा सोव्हिएत संघाच्या अणुचाचण्यांची माहिती मिळवण्यासाठी सोडला गेला होता.

भारतीय हद्दीतही चिनी फुगा!

चिनी टेहळणीफुग्याचं अस्तित्व भारतीय आकाशातही आढळल्याचं सांगितलं जातं. १९७८ मध्ये भारतीय आकाशात असा फुगा आढळल्याची नोंद अमेरिकेनं आता खुल्या केलेल्या कागदपत्रांत आढळते. म्हणजेच, लष्करी स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी या आयुधाचा वापर नवा नाही, त्यात अमेरिकाही धुतल्या तांदळासारखी अजिबातच नाही.

यानंतर प्रश्‍न असतो तो आधुनिक उपकरणांची रेलचेल असताना चीनला तुलनेत फुग्यांचं जुनाट तंत्र का वापरावंसं वाटतं? अनेक तंत्रांच्या आजच्या काळात उपग्रहांवरून मिळू शकणाऱ्या माहितीहून फार वेगळं काही बलूनच्या वापरानं मिळण्याची शक्‍यता नाही. मात्र, तरीही या तंत्राची काही बलस्थानं आहेतच.

एकतर अत्यंत कमी खर्चात असले उपक्रम करता येतात. अमेरिकेसारखे कुणी फोडले फुगे तरी फार नुकसान होत नाही. दुसरीकडे, हे फुगे बराच काळ एकाच ठिकाणी राहून अधिक स्पष्ट माहिती; खासकरून, छायाचित्रं गोळा करू शकतात, जे अवकाशातील उपग्रहांना तितकं शक्‍य नसतं.

जवळून छायाचित्रं मिळण्याची शक्‍यता असल्यानं ती अधिक स्पष्ट असू शकतात. उपग्रहांना विशिष्ट वेळेत पृथ्वीभोवतीची फेरी पूर्ण करायची असल्यानं त्या गतीचा परिणाम छायाचित्रांवर होतो, त्याहून खूप कमी उंचीवरून फुग्यांचा वापर करून घेतलेली छायाचित्रं अधिक उपयुक्त असू शकतात.

अमेरिकेतील चिनी फुगे उडवण्याच्या घडामोडींनी उभय बाजूंना कुरघोड्यांची संधी दिली, देशांतर्गत राजकारणात आवश्‍यक असलेली संधीही दिली; मात्र त्यातून दोन देशांतला ताण आणखी वाढला. इतका की, चीनमधील माध्यमंच त्याचं वर्णन ‘शीतयुद्ध’ असं करू लागली. सुरुवातीला फुग्याच्या या प्रकरणात चीनचा पवित्रा ‘झालं चुकून’ असाच होता, मात्र, अमेरिकेनं फुगा फोडला आणि तो हेरगिरी करण्याचाच भाग असल्याचं जाहीर केलं,

तेव्हा चीनकडून आक्रमकपणे प्रतिवाद सुरू झाला. तो चीनच्या राज्यकर्त्यांना देशांतर्गत वातावरणात राष्ट्रवादाचा तडका देण्यासाठी उपयोगाचा‌ होता. चीन हा अमेरिकेची बरोबरी करू शकणारा प्रतिस्पर्धी आहे, याची जाणीव तिथल्या सरकारी नजरेखाली अखंडपणे असलेल्या समाजमाध्यमांतून दिली जाऊ लागली. हे अर्थातच बाहेरच्या जगापेक्षा चीनमधील लोकांसाठीचं नॅरेटिव्ह आहे.

शि जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन अमेरिकेला थेट अंगावर घ्यायची ताकद बाळगून आहे, हे दाखवणारा सूर न लपणारा आहे. तसं करताना, अमेरिका अतिरेकी प्रतिक्रिया देत आहे, असं चीनचं सांगणं होतं; आणि, अशी प्रतिक्रिया द्यावी लागते, याचं कारण अमेरिकेतील पक्षीय राजकारण, असाही चिनी बाजूचा निष्कर्ष आहे. खोट्या गोष्टींवर आधारित चीनचा धोका आहे या प्रकारचा सिद्धान्त पसरवत राहणं, हे अमेरिकेतील राजकीय नेत्याचं पक्षीय स्पर्धेतून काम बनलं असल्याची टीकाही चीन करतो आहे. अमेरिकी फुगे मागच्या वर्षात किमान दहा वेळा चिनी आकाशात आल्याचा दावाही चीननं केला.

एका बाजूला अमेरिका पश्‍चिम पॅसिफिक क्षेत्रात आपलं बळ वाढवते आहे आणि त्याकडे चीन संशयानं पाहतो तेव्हा चीनलगत बळ वाढवण्याच्या प्रयत्नांना तार्किक अधिष्ठान देण्याचा भाग म्हणून फुग्यासारख्या किरकोळ प्रकरणाचा बभ्रा केला जातो आहे, असा चीनचा दावा आहे. या चिनी दाव्यात अमेरिकेच्या चीनलगतच्या भागातील हालचालींचं

तथ्य आहेच. याचं कारण, अमेरिकेच्या सहकार्यानं चीनचा आर्थिक उदय होत असल्याच्या काळात चीननं आपलं सामरिक

बळ वाढवत अमेरिकेपुढं आव्हान उभं करण्याइतपत मजल मारली, तेव्हा ज्या प्रदेशात अमेरिका फार लक्ष देत नव्हती, त्या चीनलगतच्या भागात चीनला शह देणारी रचना अमेरिकेकडून सुरू झाली आणि अलीकडच्या काळात

चीनचा आर्थिक उदय होताना तिथली व्यवस्थाही अधिक मोकळी होईल हा भ्रम होता, हे

अमेरिकी मुत्सद्दी मान्य करू लागले आहेत. यातून आलेली अमेरिकेची आक्रमकता चीनला खुपणारी आहे. चीननं दक्षिण चिनी समुद्रातील हालचाली असोत की अरुणाचललगत खेडी उभी करण्याचे प्रयोग असोत; इतरांच्या सहन करण्याच्या मर्यादा ताणत न्यायच्या आणि नवी सर्वमान्य स्थिती तयार करायची, ही कार्यपद्धती अवलंबली आहे. इतरांच्या हवाई हद्दींचा भंग करून, फुग्याला किती गांभीर्यानं घ्यावं या प्रकारच्या समजात ठेवण्याचा असाच प्रयत्न; मात्र, अमेरिकेच्या तेवढ्याच आक्रमक प्रत्युत्तरानं आपटला.

कुरघोड्यांना बळच मिळेल

या फुगाप्रकरणानं दोन देशांत संबंध सुधारण्याच्या सुरू झालेल्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्‍यता हा सर्वांत मोठा परिणाम असेल. मागच्या काही काळात जिनपिंग यांची तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आणि देशाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ते आणि त्यांचे सहकारी जुळवून घ्यायच्या प्रयत्नात होते.

याच काळात रशियाच्या अण्वस्त्रवापराच्या धमकीच्या विरोधात चीननं सूर लावला होता, तसंच दावोसला उद्योगांसाठी मुक्त वातावरणाची वकिली केली होती. ‘जी-२०’ राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीच्या वेळी बायडेन आणि जिनपिंग यांची भेट झाली आणि त्यातून, उभय देश संबंध सुधारू इच्छितात, असं वातावरण तयार झालं, त्यापाठोपाठ अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा चीनचा दौरा ठरला...या सगळ्या वाटचालीपुढं फुग्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अमेरिकी जनमत आता, लगेच तरी तिथं चीनची बाजू घेणं कठीण बनावं, असं झालं आहे. बायडेन प्रशासन या फुग्याकडे एक स्वतंत्र घटना म्हणून पाहत नाही, तर जगभरात असे फुगे जिथं जिथं गेले आहेत, त्या सगळ्या देशांना सोबत घ्यायचा विचार अमेरिकेनं बोलून दाखवला आहे. म्हणजेच, चीनच्या या प्रकारच्या हेरगिरीच्या प्रयत्नांच्या विरोधात एक आघाडी उघडायचा अमेरिकेचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, अमेरिकाही असे प्रयत्न करत असतेच. अमेरिकेचा असाच एखादा फुगा चीननं दक्षिण चिनी समुद्रात किंवा तैवानलगत उडवला तर त्याला अमेरिकेचं उत्तर काय असेल? एकमेकांविषयीचा अविश्‍वास अशा कुरघोड्यांना बळच देईल.

चीनचा यामागचा उद्देश काय हे पुरतं स्पष्ट होणं कठीण; मात्र एका फुग्यानं जणू अमेरिका-चीन यांच्या संबंधांवर क्षेपणास्त्र डागलं गेलं आहे. दोन्ही बाजूंनी फुग्याच्या निमित्तानं आपापल्या देशातील लोकांना उभं करणारं नॅरेटिव्ह मांडलं जात असताना, संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेतच खोडा घातला गेला आहे.

चीनची ही फुगेबाजी केवळ अमेरिकेपुरतीच मर्यादित नाही, तर पंचखंडांत किमान ४० देशांवर चिनी फुग्यांनी टेहळणी केल्याचं अमेरिकेचं सांगणं आहे. या सगळ्या फुगेबाधितांची मोट बांधायचंही अमेरिकेचं सूतोवाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT