सातारा

कोरोना काळात नगरसेवकांचे गलिच्छ राजकारण; ऑनलाइन सभेला 12 नगरसेवकांचा विरोध

अभिजीत खुरासणे

महाबळेश्‍वर (जि. सातारा) : ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरची सोय आपल्या शहरात उपलब्ध व्हावी, या संदर्भात विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या ऑनलाइन अतितातडीच्या विशेष सभेला 12 नगरसेवकांनी विरोध केल्याने ती सभा तहकूब करण्यात आली. या संदर्भात नगरसेवक गलिच्छ राजकारण करीत आहेत, असा आरोप नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी केला. 

तालुक्‍यात कोठेच ऑक्‍सिजन बेडची सुविधा नाही. ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरची सोय आपल्या शहरात उपलब्ध व्हावी, यासाठी विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षांनी अतितातडीची ऑनलाइन सभा आयोजित केली होती. या सभेला नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे व युसूफ शेख आदींसह पाच नगरसेवक ऑनलाइन जॉइन झाले होते; परंतु उपनगराध्यक्ष अफजल सुतार, ज्येष्ठ नगरसेवक किसनराव शिंदे, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, नासीर मुलाणी, रवींद्र कुंभारदरे यांच्यासह पालिकेतील 12 नगरसेवकांनी ऑनलाइन सभेस विरोध करणारे सर्वांच्या सहीचे एक निवेदन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे दिले. 

या पत्रात नगरसेवकांनी म्हटले आहे, की अशा प्रकारे सभेला उपस्थित राहण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नगरसेवकांना दिले गेले नाही, तसेच ऑनलाइन सभेत चर्चा करणे, मत मांडणे याची माहिती नाही. या शिवाय आपल्याकडे नेटवर्कचीही समस्या मोठी आहे, तेव्हा ऑनलाइन सभा रद्द करावी व ऑफलाइन सभा आयोजित करावी, अशी मागणी 12 नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली. या पत्राने ऑनलाइन सभा, तर रद्द झालीच; परंतु पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली. 

सभा रद्द झाल्यानंतर याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ऑनलाइन सभेस विरोध करणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, "महाबळेश्वर तालुक्‍यात दोन कोरोना केअर सेंटर आहेत. या ठिकाणी 70 बेड उपलब्ध आहेत; परंतु एकही ऑक्‍सिजन बेड अथवा व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काही रुग्णांना आपला तालुका सोडून इतरत्र जावे लागले. काही रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले; परंतु सर्वसामान्य महाबळेश्वरकरांना महागडे उपचार परवडणारे नाहीत. म्हणून अशा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या शहरातच अशा प्रकारची सुविधा मिळावी, याबाबत जिल्हाधिकारी यांनी पालिकेला सूचना केल्या होत्या. 

जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेच्या आधारे पालिकेची ऑनलाइन सभा घेतली होती. महत्त्वाचा विषय होता आणि सर्वांना विश्‍वासात घेऊनच हा निर्णय आपल्याला घ्यायचा होता; परंतु प्रत्येक विषयाचे राजकारण करणाऱ्यांना हेही लक्षात आले नाही, की आपण किती गंभीर विषयाचे राजकारण करीत आहोत. ते विरोधासाठी विरोध करण्याच्या भूमिकेमुळे हे नगरसेवक तोंडघशी पडले आहेत. आता भविष्यात जनताच या सर्वांना त्यांची जागा दाखवून देईल.'' या वेळी त्यांचे पती नगरसेवक कुमार शिंदे हेही उपस्थित होते.  

नगराध्यक्षा म्हणाल्या... 
- ऑनलाइन सभेला विरोध करणाऱ्या निवेदनावर ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्यातील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पार्टे या सध्या पुण्यात आहेत; परंतु त्यांचीही या निवेदनावर सही आहे. ती सही नक्की कोणी केली, हे लवकरच समजेल. 
- ज्येष्ठ नगरसेवक नासीर मुलाणी यांची व त्यांच्या नगरसेविका पत्नी जुबेदा मुलाणी यांचीही सही आहे. नासीर मुलाणी यांना कोरोनाची बाधा झाली होती. सध्या ते ज्या ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे, तरी देखील तेथील त्यांचे हॉटेल, बगीचा कसे काय चालू आहेत? 

आपल्या शहरात तब्बल सात महिन्यांनंतर पर्यटकांची पावले पडत आहेत. हळूहळू लोकांना रोजगार मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. ही जबाबदारी सर्वस्वी पालिकेची आहे. म्हणूनच ही तातडीची सभा आयोजित केली होती. या सभेत महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणे अपेक्षित होते; परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. सभेत निर्णय झाला नसला तरी महाबळेश्‍वरकरांना ऑक्‍सिजन बेडची सुविधा मिळायलाच हवी ही आपली भूमिका आहे आणि आम्ही लवकरच ही सुविधा मिळवून देऊ.  

-स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT