माझ्यात आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपून देण्याचे काम ही विकृत प्रवृत्ती करत आहेत. माझे कोणाशीही वैरत्व नाही.
सातारा : ‘शिवतीर्थावरील स्मारकाच्या (Shivtirth Memorial) विषयावरून कोणताही वाद नसताना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) व माझ्यात जुंपून देण्याचे काम विकृत प्रवृत्ती करत आहे. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य जपले जाईल. अर्थात, हे जनतेचे सरकार असून, आपण सर्वांसह मीही व्यक्ती म्हणून या सरकारचा एक भाग आहे.
रयतेला डावलून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. लोकनेत्यांच्या स्मारकासंदर्भात प्रस्ताव पाहून मगच निर्णय घेतला जाईल,’ असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले. शिवतीर्थावरील लोकनेत्यांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर पॅलेस येथे पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवरही निशाणा साधला. उदयनराजे म्हणाले, ‘‘शिवतीर्थाबाबत कोणताही वाद नसताना काही लोक ज्यांची उंची नाही, बौद्धिक पात्रता नाही. कदाचित त्यांच्या वयाचा भाग असू शकतो. त्यांना अनुभव कमी पडत असेल. अशा व्यक्तींनी माझा काहीही संबंध नसताना माझ्यात व पालकमंत्री देसाई यांच्यात जुंपून देण्याचे काम करत आहेत. स्वत:चे उदो उदो करून घेणारा मी नाही.
मुलांनी स्वत:हून माझे पेंटिंग काढले. त्याला पालकमंत्र्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री देसाई व आमची फार जुनी व कॉलेजपासूनची मैत्री आहे. उगाच वाद लावून देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी द्वेषाचे, अहंकाराचे राजकारण योग्य नाही. शिवतीर्थ हा ऐतिहासिक परिसर आहे. त्यावेळी एक समिती होती. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यावेळी बाळासाहेब देसाई मंत्री होते.
त्यांच्या हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगळ्या, देखण्या पुतळ्याचे अनावरण झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे महान नेते होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाचे स्मारक होण्यासाठी आमचा बिलकूल विरोध नाही. काही जणांकडून तसे भासवले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही; पण ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्याचा आग्रह केला जातोय, त्याच्या खाली ग्रेडसेपरेटर आहे.
त्याची तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. त्यांच्या स्मारकास आमचा हातभार असेल. त्यावेळी जमीन भरीव होती. आता ग्रेडसेपरेटर झाल्यामुळे तेथे तांत्रिक तपासणी करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. सातारकरांची मागणी भावनिक आहे; पण तांत्रिकदृष्ट्या विचार करणे गरजेचे आहे. ही जागा पालिकेकडे असली तरी मालकी जिल्हा परिषदेची आहे; पण जिल्हा परिषद एक रुपयाही खर्च करत नाही. म्हणूनच ही जागा आम्ही पालिकेकडे द्या, असे सांगत आहोत.
शिवतीर्थावरील या पवित्र कामासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. एवढी वर्षे कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही पुढाकार घेतला असून, १६ कोटी रुपये या शिवतीर्थ स्मारकासाठी मंजूर करून आणले आहेत. त्यामुळे याची चेष्टा करून अहंकाराच्या भाषेत बोलण्यापेक्षा त्यांनी विचार करावा.’’
माझ्यात आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपून देण्याचे काम ही विकृत प्रवृत्ती करत आहेत. माझे कोणाशीही वैरत्व नाही. सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. अहंकारातून व्यक्तिद्वेष निर्माण करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. शिवतीर्थ परिसर ऐतिहासिक असून, तो तसाच राहावा, अशी सर्व शिवप्रेमींसह माझी व शंभूराज देसाईंची भावना आहे. हा परिसर अधिक सुशोभित कसा करता येईल, थ्रीडी स्ट्रक्चरमध्ये स्मारक उभारण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री देसाई यांनी आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ, असे म्हटले होते. यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘हे जनतेचे सरकार आहे. सरकार हा जनतेच्या व्यवस्थेचा भाग असतो. मीही व्यक्ती म्हणून सरकारचा एक भाग आहे. रयतेला डावलून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासंदर्भात त्यांनी काय प्रस्ताव केलाय, हे समोर येऊद्यात, मग त्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते ठरवू.’’
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या बदलीसंदर्भात विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘काही अधिकारी मर्जी राखण्याचे काम करतात. काही अधिकारी लोकांच्या कामांना प्राधान्य देतात. त्यामुळे जयवंशी यांची झालेली बदली ही संशयास्पद आहे.’’
सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात उदयनराजे म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुलांना केवळ बालसुधारगृहात दाखल केले जाते. मात्र, त्यांच्यावर प्रत्यक्ष कोणाचेच नियंत्रण नाही. यासंदर्भात मी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बोललो आहे. जाणीवपूर्वक गुन्हा करणाऱ्या सर्वांना चांगले चोपून काढले पाहिजे.’’ अल्पवयीन मुलांच्या संदर्भातील कायद्यामध्ये बदलही केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.