सचिन शिंदे : सकाळ वृत्तसेवा
Karhad News: शाळा सुटली, की विद्यार्थ्यांसह पालक व शहरातील स्थानिक नागरिकांच्या जिवाला घोर लागतो आहे. शाळेतील शेकडो विद्यार्थी सायकलींसह शहराच्या रस्त्यावर अचानक येत असल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसते. यावर उपाय करण्याच्या वाहतूक पोलिसांकडून केवळ वल्गनाच होताना दिसतात, तर पालिकेशीही त्याबाबत काहीही संवाद झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे दोन-चार मोठ्या घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येणार काय? असा नागरिकांचा प्रश्न आहे.
शाळांबाहेर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अद्यापही ठोस पर्याय काढता आलेला नाही. पोलिस व पालिकेच्या समन्वय नसल्याने तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. बाजारपेठेतील यशवंत हायस्कूलबाहेरील वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी पोलिस प्रयत्न करताना दिसतात. मात्र, अन्य चार ठिकाणी मात्र कोणत्याच उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.
त्यामुळे शाळा सुटल्यानंतर होणारी कोंडी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनाही अधिक अडचणीची ठरते आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच जिवाला घोर लागतो आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यावर ठोस उपायांची गरज आहे.
पालिका शहरात सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य देणार होती. वाहनांचा अॅटोमॅटिक नंबरप्लेट कॅप्चरिंग सिस्टम व पब्लिक असिसमेंट सेवा असणारे कॅमेरे बसविले जाणार आहेत. पोलिसांची गरज व सुरक्षितता ओळखून बसविले जाणार आहेत. त्या बैठकीला तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, सध्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक बडवे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. ठरलेल्या एकावरही कार्यवाही झालेली नाही. सध्या ती होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.
शहरात मुख्य बाजारपेठेचा रस्ता शाळा सुटताना कोंडताना दिसतो. यशवंत हायस्कूल व शाळा क्रमांक तीनमुळे बाजारपेठेचा चौक, संत तुकाराम हायस्कूलमुळे आझाद चौक परिसर, कन्या शाळेमुळे कमानी मारुती, मंगळवार पेठ परिसर, टिळक हायस्कूल, नूतन मराठी व एसएमएस स्कूलमुळे एलजी चौकासहीत कृष्णा नाक्यापर्यंतचा परिसर शाळा सुटल्या कोंडीत अडकताना दिसतो. त्यावर काहीही उपाय अद्याप नाहीत. पोलिसांनी पत्र लिहून पालिकेला आठवणी करून दिल्या आहेत. तरीही त्यावर उपाय शून्यच दिसत आहेत. पोलिसही प्रत्यक्षात काही आराखडा आखताना दिसत नाहीत. पर्यायाने शाळा सुटताना त्या चौकातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक, व्यापारी कोंडीत अडकत आहेत. त्याच बागांत रिक्षा थांब्याचा विषयही कठीण होतो आहे. तो न सोडवल्याने अर्धवट आहे. वाहतूक कोंडीच्या उपाययोजना मार्गी लागू नयेत, यासाठी होणारे प्रयत्न पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने वाढच आहेत. त्यामुळे त्यावर एकत्रित ठोस उपायांची गरज आहे.
शहरातील वाहतूक कोंडीच्या उपायांच्या अंमलबजावणीला राजकारण आडवे येते आहे. दोन वर्षांपूर्वी वाहतूक कोंडीवर उपायांच्या निर्णयावर आजअखेर काहीच अंमलबजावणी नाही. कोरोना सरला तरीही उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. स्थानिक पातळीवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासह त्याच्या चर्चेसाठी स्थानिक सल्लागार समितीची स्थापना केली जाणार होती. तीही झालेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये स्थायी समितीची सदस्य व पोलिस अधिकारी यांच्यात वाहतूक कोंडीवरील उपायांबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत ठरलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात राबवलेल्या नाहीत. शहरातील कृष्णा नाका, कृष्णा पूल, कोल्हापूर नाका, कृष्णा घाट परिसर, बाजारपेठ, रिक्षा थांबे, सीसीटीव्ही, शाळांबाहेरील वाहतूक कोंडी अशा महत्त्वाच्या विषयावर बैठकीत एकमताने चर्चा होऊन आराखडा होणार होता. तोही झालेला नाही. कृष्णा नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीच हालचाली दिसत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.