भाजपच्या आमदारांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाची ऑफर देऊन टाकली.
बारामती : आमची राजकीय भूमिका काहीही असो, पण मी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा फॅन आहे... त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, हे जाहीरपणे सांगायला मला संकोच वाटत नाही, अशा शब्दांत भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी आज बारामतीत अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अनुपस्थितीत आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यासमोर अगदी सहजतेने जयकुमार गोरे यांनी मोकळेपणाने ही कबुली दिल्याने आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का, याची चर्चा सुरू झाली आहे.
येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्घाटन अजित पवार यांनी केले. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उद्घाटन उरकून अजित पवार निघून गेले होते. जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. राजकीय मते वेगळी असली तरी मी अजितदादांचा फॅन असल्याची कबुली देत मला हे जाहीरपणे कबूल करण्यास फार काही वाटत नाही, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. दादांकडे निर्णय घेण्याची धडाडी व धाडस आहे, ते स्पष्टवक्ते आहेत, त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असे श्री. गोरे म्हणाले.
हाच धागा पकडत दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच त्यांना ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी ‘तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ,’ असे ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा. त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरला. बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने आता पुन्हा काही राजकीय समीकरणे बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.