भिलार - बरसणाऱ्या रिमझिम धारा.. कधी ऊन... तर कधी डोंगररांगांत कापसाच्या पुंजक्यासारखे पसरणारे दाट धुके... अशा निसर्गाच्या बदलत्या छटा आणि त्यात चिंब भिजणारे तरुण पर्यटक. यामुळे पाचगणी पर्यटनस्थळ पर्यटकांनी बहरून गेले आहे. पाचगणी परिसरात पर्यटक दाखल होऊ लागल्याने वर्षाऋतूचा हंगाम सध्या बहरू लागला आहे.
श्रावण महिन्यात पावसाने उघडीप दिली असल्याने येथील निसर्ग बहरू लागला आहे .येथील डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून उसळत्या नागाप्रमाणे फेसळणारे धबधबे वाहू लागले आहेत. त्याला धुके व थंडीची जोड मिळाल्याने येथील निसर्ग अधिक खुलला आहे. बदलत्या निसर्गाच्या विविध रूपांनी धरणीने हिरवा शालू परिधान केल्यासारखे भासत आहे. निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक येथे विकएंडचे औचित्य साधून हजेरी लावत आहेत. सततच्या पावसामुळे हिरवळीच्या लेण्याने डोंगर सजले आहेत.
येथील टेबल लॅण्ड, सिडने पॉइंट, पारसी पॉइंटवरून दिसणारे धोम जलाशयाचे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सारा परिसर पर्यटकांना मोहित करत आहे. कधी ऊन... कधी पाऊस...कधी धुक्याचे साम्राज्य पसरल्याने पिंजलेल्या कापसाप्रमाणे विस्तीर्ण ढगांचे थवे, डोंगररांगांतून गुंफलेल्या वेणीप्रमाणे उतरणारे पाणी, दूरवर असलेल्या भिलार वॉटर फॉलचे फेसाळलेले तुषाराचा हौशी पर्यटक आनंद घेत आहेत. पुस्तकाचे गाव भिलार हेसुद्धा पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण झाले आहे.
सध्या बाजारात गरमागरम चणे, उफळणारा चहा, गरम चणे, चिक्की, फज खाण्यासाठी व खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. उन्हाळी हंगामातील थंड हवेच्या या ठिकाणची खासियत असलेल्या स्ट्रॉबेरीची, मलबेरी, रासबेरीची जागा आता मक्याच्या कणसांनी व गरमागरम भुईमुगाच्या शेंगांनी घेतली आहे.
दाट धुके अन् वाहतूक कोंडी
पाचगणी, महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी धुक्याच्या साम्राज्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यात या गर्दीने नेहमीची वाहतूक कोंडी सध्या डोकेदुखी ठरत आहे. बाजारपेठेत अस्ताव्यस्त लागलेली वाहने, वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहे. तर रस्त्यावरील खड्डे ही वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.