कऱ्हाड - शेतकऱ्यांची दौलत म्हणून बैलांकडे बघितले जात होते. ज्याच्या दावणीला जास्त बैल तो मोठा शेतकरी, अशी ओळख असायची. मात्र, अलीकडे शेतीत यांत्रिकीकरण आल्याने बैलांचा वापर कमी झाला. त्यामुळे बैलांची संख्याही कमी झाली होती. बैलांची प्रजात संपुष्टात येते, की काय अशी भीती असताना अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने पुन्हा बैलांची जोपासना होऊ लागली आहे.
व्यापारी किंवा उद्योजकांकडे जशा बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या असतात, तसे घरंदाज शेतकरी हे शर्यतीचे बैल अलीकडच्या काळात पाळू लागले आहेत. पोटच्या पोराप्रमाणे त्याची देखभाल करून बदाम, दूध, अंड्यासह विविध प्रकारच्या डाळीच्या खाद्यांचा खुराक बैलाला दिला जातो. सध्या शर्यतीचा बैल घरी असणं म्हणजे स्टेट्स सिम्बॉल बनले आहे. अशी देखणी खोंड-बैलं सांभाळून हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीसारखी मोठी मैदाने गाजवत त्या शर्यती जिंकून सातारा जिल्ह्याचा नावलौकिक शर्यतीचे बैले वाढवत आहेत. शुक्रवारी बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शर्यतीच्या निवडक बैल व त्यांची होत असलेली जोपासना यावर टाकलेला प्रकाश...
कलेढोणकरांचा लक्ष्मणराव
कलेढोणचे (ता. खटाव) राजुशेठ जुगदर यांचा लक्ष्मणराव हा देखणा खोंड असून, तो दोन्ही बाजूने पळतो आणि जिथे मोठं मैदान असते तिथे लक्ष्मणराव फायनलला राहतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याला घरातील मुलांप्रमाणे सांभाळून जुगदर कुटुंबीयांनी वाढवला आहे. त्यामुळे तो प्रेमळ असून, तो कोणालाही मारत नाही. त्याने आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने नाव गाजवले आहे.
अनेक बक्षिसांवर उठवली मोहोर
लक्ष्मणराव याने भारत केसरीचा प्रथम क्रमांक पुरस्कार पटकावून तो महिंद्रा पिकअप गाडीच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. त्याचबरोबर त्याने फुरसुंगी-पुणे येथे सव्वालाख आणि म्हैस बक्षिसाची शर्यत जिंकली आहे. त्याचबरोबर लक्ष्मणरावने पेडगाव हिंदकेसरी मैदानात तृतीय क्रमांक, महान भारत केसरी शर्यतीत चौथा क्रमांक पटकावून तो दुचाकीचा मानकरी ठरला आहे. त्याचबरोबर त्याने सोनहिरा केसरी २०२३ यासह अनेक १०० हून अधिक पुरस्कार आणि बक्षिसांचा तो मानकरी ठरला आहे.
लक्ष्मणरावचा खुराक
लक्ष्मणरावला उडीद डाळ, मका चुणी, गहू भुसा, शेंगदाणा पेंड, गोळी पेंड आणि मिक्स खाद्याचा खुराक दिला जातो. त्याला गार पाण्यानेच अंघोळ घातली जाते.
अक्षय मोरेंचा बलमा
साताऱ्याच्या गोडोलीतील अक्षय शिवाजी मोरे यांचा राज्यभरात राजधानी सातारा एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या बलमा बैलाने विजयाच्या गुलाल उधळणीची परंपरा कायम राखली आहे. राज्यातील एकही मैदान बलमाने शर्यतीसाठी बाकी ठेवलेले नाही.
अनेक पुरस्कारांचा मानकरी
सलग दोन वेळा पेडगावचे मैदान हिंदकेसरीचा किताब बलमाने पटकावला. त्यानंतर कोरेगाव, पुसेगावच्या मैदानात बलमाने पुन्हा हिंदकेसरीचा किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी, खासदार, आमदार केसरीसह अनेक असंख्य किताब बलमाने जिंकले आहेत. भुकम, वडकी, शेवाळवाडी, कापूरहोळ यासह इतर महत्त्वाच्या मैदानात बलमाची कामगिरी नजर लागेल अशीच राहिली आहे. राज्यातील सगळ्या पहिल्या क्रमांकाच्या बैलाबरोबर बलमाने मैदाने मारलीत. यामुळे बलमाचे नाव शर्यतशौकिनांनी राजधानी सातारा एक्स्प्रेस असे ठेवले आहे.
बलमाचे खाद्य
बलमाला उडीद, खपरी पेंड, कट्टीचा मारा करत त्याचे पोषण करण्यात येते. उन्हाळ्यात गार, पावसाळा, थंडीत गरम पाण्याने त्याची अंघोळ घातली जाते.
वाईच्या सचिन चव्हाणांचा रायफल
वाई येथील सचिन चव्हाण यांचा रायफल ८१८१ हा बंदुकीसारखा पळतो. तो घरी खूप शांत असतो. मात्र, मैदानात गेला, की अंगाला हात लावून घेत नाही. रायफलला चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी बैलगाड्या शर्यतीच्या बंदीच्या काळात खरेदी केला. रायफल बिनजोडसाठी लोकांचे आकर्षण ठरला आहे. म्हणून त्याला पब्लिकचा बादशहा आणि गुलाल किंग म्हणून ओळखला जातो. सर्व रायफलप्रेमी, बैलगाडाप्रेमी, तसेच रायफलला सर्व मोठ्या मैदानांचा मोठा वस्ताद ही पदवी दिली आहे.
वन बीएचके फ्लॅटचा मानकरी रायफल
रायफलने आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान मारून वन बीएचके २२ लाख किमतीचा फ्लॅट जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने सप्तहिंद केसरी, पंचम महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. बिनजोड मैदानामध्ये ११० पैकी १०५ बिनजोड जिंकल्या आहेत. त्याचबरोबर घाटावरील २०० मैदानांपैकी १८० मैदाने रायफलने जिंकली आहेत.
रायफलचा खुराक
रायफलला डाळ, शेंगदाणा पेंड, मका, भुसा, कडवा, हत्ती घास, मका असा खुराक आहे. त्याचबरोबर त्याला उन्हाळ्यात गार, तर पावसाळा आणि हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ घातली जाते.
उदयसिंह पाटलांचा तेज्या
कऱ्हाड तालुक्यातील ओगलेवाडी येथील उदयसिंह पाटील यांचा तेज्या हा बैल चपळ आहे. त्याला तीनच महिन्यांपूर्वी पाटील यांनी तयार केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत त्याने मोठी मजल मारून सुमारे २५ मैदाने गाजवली आहेत.
कमी कालवधीत जास्त बक्षिसे
उदयसिंह पाटलांच्या तेज्या बैलाने कमी कालवधीत जास्त बक्षिसे आणली आहेत. त्याने पळशी स्टेशन, वांगी, पारे, वाठार, अमरापूर येथील शर्यतीमध्ये पहिला क्रमांक पटकावून गुलाल आणला आहे. त्याचबरोबर रहाटणी, शिरंबे, तांबवे, आणेवाडी येथील मैदाने मारून मुळशी, कांजेपूलचा तो फायनलचा मानकरी ठरला आहे. त्याचबरोबर त्याने शिर्डीजवळील काकडीत सलग दोन वेळा बिनजोडचा मानकरी ठरला आहे.
तेज्याचे खाद्य
तेज्याला दररोज अंडी, दूध, पेंड, डाळ, मकाचुनी, सर्व मिक्स खाद्य दिले जाते. त्याचबरोबर त्याला दररोज गार-गरम पाण्याने अंघोळही घातली जाते.
तांबवेकरांचा प्रसिद्ध सर्जा
तांबवे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील श्री भैरवनाथ प्रसन्न सर्जा हा खिलार जातीचा देखणा खोंड जावेद मुल्ला यांचा आहे. सर्जा हा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बैलांपैकी एक आहे. सर्जाने आतापर्यंत अनेक शर्यती जिंकून तांबवेकरांचे नाव राज्यात प्रसिद्ध केले आहे. सर्जा हा चाकोरी सोडून पळत नाही. त्याला कुटुंबातील मुलाप्रमाणे जावेद यांनी सांभाळला असल्याने तो मारका बैल नाही.
अनेक हिंदकेसरींचा मानकरी
सर्जा बैलाने हिंदुहृदयसम्राट केसरी पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर त्याने कोरेगावच्या शर्यतीत प्रथम क्रमांक, हिंदकेसरी पेडगाव आदत मैदानाचा उपविजेता तो ठरला आहे. त्याने रुस्तुम ए हिंद केसरी भाळवणी मैदानाचा फायनलची शर्यत जिंकली आहे. हिंदकेसरी सातेवडी मैदानाचा मानकरी, तसेच असंख्य मैदानाचा फायनलचा मानकरी तो ठरला आहे.
सर्जाचे खाद्य
सर्जाला खपरी पेंड, मका चुणी, गहू आटा अशा प्रकारचे खाद्य दिले जाते.
वहागावकरांचा लाडका निशान
बैलगाडी शर्यतीमध्ये वहागावमधील (ता. कऱ्हाड) नितीन पवार यांच्या निशान बैलाच्या नावाची ख्याती आहे. तो सलगर खिलार जातीचा काळा मोरा बैल असून, तो उंच आणि धिप्पाड आहे. त्या बैलाने आतापर्यंत अनेक पुरस्कार व बक्षिसे पटकावून गावाचे नाव पश्चिम महाराष्ट्रात केले आहे. त्या गावाला त्या बैलाच्या नावाने ओळखावी एवढी ओळख त्याने कमावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पटकावली बक्षिसे
निशानने आतापर्यंत अनेक बक्षिसे आणि पुरस्कार पटकावले आहेत. तो बैल कोरेगाव, माळशिरस, पुणे- कोंद्दनपूर, पुणे- उरुळी देवाची, कदमवाडी, औंध, उंबर्डे, पेठनाका, इस्लामपूर, म्हसवड, शिरवळ या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील शर्यतीमध्ये टॉप ठरला
आहे.
निशानचा खुराक
निशानला पेंड, सातू, मका, गहू, अट्टा याचा नियमित खुराक दिला जातो. त्याचबरोबर त्याला गरम-गार पाण्याने अंघोळ घातली जाते.
निनामचा देखणा सुंदर
निनाम (ता. सातारा) येथील जीवन चव्हाण यांचा सुंदर बैल नावाप्रमाणेच सुंदर आहे. हा बैल शर्यतीसाठी प्रसिद्ध असून, या बैलाने आतापर्यंत अनेक शर्यती जिंकल्या आहेत. हा बैल निकालाला हावरा असून, तो शंभर फुटात फायनलला गाडी काढतो म्हणून काढतो, अशी त्याची ख्याती असल्याचे जीवन चव्हाण सांगतात. त्यामुळे या बैलाचे अनेक फॅन आहेत.
अनेक बक्षिसांचा मानकरी
सुंदरने आतापर्यंत १०० हून अधिक शर्यतीमध्ये भाग घेतला आहे. त्याने आतापर्यंत हिंदकेसरी मैदान पुसेगाव येथे दुसरा क्रमाक, कोरेगाव हिंदकेसरी शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तीन वेळा तो अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर बारामती, पुणे, माळशिरस, नागाचे कुमठे, चोराडे विटा, झरे, सोनहिरा केसरी, अजितदादा केसरी या शर्यतीत तो अव्वल ठरला आहे.
सुंदरचा खुराक
खपरी पेंड, बैल आटा, उडीद डाळ, मक्याची कणसे हा सुंदरचा खुराक आहे.
पै. विलास देशमुखांचा ‘पब्लिक किंग’
पैलवान विलास देशमुख (वाई-सोळशी) यांच्या मालकीचा सरपंच हा बैल असून, त्याने सलग सात वर्षे आपल्या मालकाचा नावलौकिक बैलगाडी क्षेत्रात वाढविला आहे.
सरपंच हा २०१८ पासून आजपर्यंत मुंबईमध्ये बिनजोड किंग आणि घाटावर प्रत्येक हिंदकेसरी मैदानात हिंदकेसरीचा मानकरी असलेला बैल आहे. बिनजोडच्या शर्यतीमध्ये त्याने २०२१ मध्ये सलग ८५ शर्यतींमध्ये विजय नोंदवत जवळपास ४५ लाख रुपयांची बक्षिसे प्राप्त केलेली आहेत. हा बैल दोन्ही साइड पब्लिकला पळणारा महाराष्ट्रातील एकमेव बैल आहे. म्हणून त्याला ‘पब्लिक किंग’ असंही संबोधलं जातं.त्याचा खुराक उडीद डाळ, सातू, नाचणी मका भरडा आणि शेंगदाणे पेंड असा आहे. बैल पळायला जाण्याच्या अगोदर त्याला गरम पाण्याने धुतले जाते व पळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने त्याला शेकले जाते.पैलवान विलास देशमुख हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत.
थार गाडीचा मानकरी महिब्या
काही बैलं आपल्या वेगळ्या वैशिष्ट्ये आणि प्रसिद्ध असतात तसाच रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील सदाशिव कदम यांचा महिब्या हा बैल सुद्धा आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहे. मैसुरी जातीचा हा तीन वर्षांचा खोंड असून, त्याने आतापर्यंत अनेक मैदाने मारली आहेत. महिब्या शर्यतीमध्ये कधीही चाकोरी सोडत नाही. त्याचबरोबर शांत असा बैल आहे. या बैलाला जोडीला कोणताही बैल दिला, तरी तो मैदान मारतो, अशी त्याची ख्याती आहे.
रेठरे बुद्रुक येथील हिंदकेसरी महिब्याने रुस्तुमे हिंदकेसरी भाळवणी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा थार गाडीचा मानकरी ठरला आहे. आदत हिंदकेसरी पेडगाव मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, शंभरहून अधिक शर्यती महिब्याने पार केले आहेत. महिब्याला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आली आहे.
महिब्याचा खुराक
उसाचे वाडे, कडबा, मका चुणी, गहू भुसा, सातू डाळ असा त्याचा खाद्य आहे.
२०११ च्या पूर्वी बैल आणि देशी गोवंशात घट झाली होती. मात्र, शर्यती पुन्हा सुरू झाल्याने बैलांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आता प्रत्येक गावात २० ते २५ खिलार बैल पाहायला मिळतात. शर्यत सुरू झाली नसती, तर कदाचित पुढच्या पिढीला बैल पुस्तकातच दाखवावे लागले असते. आम्ही संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात लढा दिल्याने बैलांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
- पै. विलास देशमुख, सचिव, अखिल भारतीय बैलगाडी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.