अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या आदल्या रात्री पाचगणी येथे फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मात्र, याबाबतची पुसटशीही कल्पना कोणास लागू दिली नव्हती.
भोसे : अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यात अनधिकृत बांधकामे नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिली आहेत. अशातच आज अचानक भिलार, भोसे, खिंगर यासह तालुक्यात पाच ठिकाणी पहाटे साडेपाचच्या सुमारास एकाच वेळी अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized Construction) हातोडा उगारला.
यामध्ये भिलार येथील संकला, भोसे येथील प्रवीण छेडा, खिंगर येथील खंबाटा अशा बांधकामांवर काल (शनिवार) मोठ्या फौज फाट्यासह प्रशासनाने बुलडोझर फिरवला आणि बांधकामे जमीनदोस्त केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi) यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर ही कारवाईची मोहीम पहाटे नियोजनबद्धरीत्या सुरू झाली.
या वेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसीलदार विजय पाटील, महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय टीम, महसूल अधिकारी तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी व तलाठी आदी घटनास्थळी उपस्थित होते. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दहा ते बारा जेसीबी आणि पोकलेन अशा यंत्रसामग्रीसह आलेल्या पथकांनी अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्याचे काम सकाळपासून सुरू झाले. अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम नियोजनबद्धरीत्या राबवली गेली. सर्व फौजफाटा कालपासूनच पाचगणीत दाखल झाला होता. सकाळी कोणालाही समजण्याआधी पहाटेच सर्व यंत्रणा ठरलेल्या बांधकामांवर पोचली आणि अचानक या मोहिमेने वेग घेतला.
सकाळ होताच यातील काही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सकाळी पहाटे अचानक मोहीम सुरू करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती मिळू शकली नाही. या कारवाईने अनेक बांधकाम व्यावसायिक व बांधकाम मालकांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक भूमिपुत्रही धास्तावले आहेत.
प्रशासनाची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम स्वागतार्ह असली, तरी किती अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, याची माहिती नाही. त्यामुळे ही मोहीम कायम सुरू राहणार, की मोजक्याच बांधकामांवर कारवाई होऊन थांबणार, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या आदल्या रात्री पाचगणी येथे फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मात्र, याबाबतची पुसटशीही कल्पना कोणास लागू दिली नव्हती. अतिशय गुप्तपणे मोहीम राबविण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.