सातारा : आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणत्याही कुटुंबासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार होण्याची. कोरोना महामारीच्या या काळात प्रियजनाच्या निरोप सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, हे सर्वांनी स्वीकारलेच आहे. परंतु, तीन-तीन दिवस मृतदेहावर अग्निसंस्कार होणार नसतील तर... कुणाचेही काळीज नक्कीच चर्रर होईल. केसे (ता. कऱ्हाड) येथील कुटुंब आज याच वेदनांतून जात आहे. गेले तीन दिवस कधी सातारा पालिकेचा फोन येईल, याकडे त्यांचे कान आतुरतेने वाट पाहात होते. परंतु, प्रशासनाला या कुटुंबाच्या वेदनांची, भावनांची कोणतीच जाणीव नव्हती. प्रशासनातील या मुर्दाडपणाचे करायचे काय, असाच प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
कोरोना महामारीमुळे पूर्वीच्या सर्वच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मान्यतांचे स्वरूप बदलले आहे. प्रत्येक गोष्टीबाबतची वेगळीच नियमावली तयार झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाकडून विविध निर्बंध लादले गेले आहेत. त्यातही सर्वांत नको असलेली गोष्ट या काळात समोर येत आहे, ती माणूसपणाच्या भावनिकतेची. ती समाजात कोरोनाबाधितांच्या प्रती वर्तणुकीतून दिसते, तशीच ती प्रशासनाच्या वागण्यातही जाणवत आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वच पातळ्यांवरील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कोरोनाबाधितांसाठी सर्वकाही चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यासाठी रात्रीचा दिवस करत असल्याचे सांगत आहेत. ते काहीच करत नाहीत असेही नाही. परंतु, प्रत्यक्षात कोरोनाबाधित व त्यांच्या नातेवाईकांना सोसाव्या लागणाऱ्या गोष्टी समोर आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते करत असलेले काम अधिक वास्तवाच्या पातळीवर जावून पाहण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी
कऱ्हाड तालुक्यातील केसे गावच्या एका कुटुंबाची गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली परवड पाहता प्रशासकीय हलगर्जीपणामुळे एखाद्या जिवाला कोणत्या पातळीवर तडफड सोसावी लागू शकते, हे जिवाच्या आकांताने सांगत आहे. तेथील एका व्यक्तीला दहा ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 13 ऑगस्ट रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 15 ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. 16 ऑगस्ट रोजी त्यांनी रुग्णालयात येऊन आवश्यक कागदपत्रांवर सह्या केल्या. त्या वेळी पालिकेकडून फोन आल्यावर या, असे त्यांना सांगण्यात आले. आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी एकपर्यंत त्यांना कोणाचाही फोन गेलेला नव्हता. घरच्या कर्त्यांनी फोन येईल म्हणून 24 तास वाट पाहिली. तोपर्यंत मृत्यूची बातमी आपल्या उरातच दाबून ठेवली नाही. परंतु, वेळ जाईल तसे त्यांच्या हृदयातही थरथर होऊ लागली. किती वेळ थांबायचे, अखेरीस त्यांनी कुटुंबीयांना कल्पना दिली. अंत्यसंस्कार सरकारच करणार, हे सर्वांनी मानलेच आहे. परंतु, अंत्यसंस्कार झाले हे ऐकण्यासाठी गेले 72 तास या कुटुंबाचे कान आतुरले आहेत.
धाडसी निर्णय..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार, सातारकरांनाे अटी वाचा
जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात एका कुटुंबाच्या जिवाची चाललेली ही घालमेल प्रशासनाच्या मात्र, कानीकपाळी नव्हती. जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात एक मृतदेह 72 तास पडून आहे, त्याचे कोणी तरी नातेवाईकही आहेत, त्यांच्या त्याप्रती भावना आहेत, ही संवेदनाच प्रशासनाच्या गावी नव्हती. "सकाळ'ने अंत्यसंस्कार का थांबलेत? याचा शोध घ्यायला सुरवात केल्यावर यंत्रणा जागृत झाली. संगममाहुली येथील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणतीच अडचण नव्हती, हे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या राजेंद्र चोरगे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेच होते, नातेवाईकांच्या कागदपत्रांवर सह्याही झाल्या होत्या. मग घोडे अडले कुठे? प्रशासकीय यंत्रणेतील हलगर्जीपणाच या गोष्टीला कारणीभूत आहे.
आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानू नका; यूपीएससीत बेंदवाडीचा वैभव हिरवेचा झेंडा
एखाद्या दुर्घटनेमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला. तर, काही वेळा नातेवाईक किंवा समाज कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्याच्या किंवा तो एखाद्या कार्यालयासमोर नेऊन धरणे धरण्याचे प्रकार घडले आहेत. अशा वेळी मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून दिली जाते. कोरोनाच्या या काळात एखाद्याचा मृतदेह 72 तासांपेक्षा जास्त काळ तसाच पडून राहिला असेल तर ती त्या मृतदेहाची विटंबना नाही का?
Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर
जिल्हाधिकारी माणुसकीने दखल घेतील, अशी अपेक्षा
कोरोनाबाधितांच्या उपचारात, कोरोना केअर सेंटरमध्ये मिळणाऱ्या सुविधांमध्ये त्रुटी नक्कीच आहेत. परंतु, एकंदर संसर्गाची व्याप्ती पाहता लोक आवश्यकता नसतानाही केवळ प्रशासनावरचा ताण लक्षात घेऊन सोसत आहेत. परंतु, मृतदेहांची होणारी परवडही आम्ही सोसायची का, असा सवाल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासाठी कुटुंबीयांच्या मनात नक्कीच उमटत असणार. केसेचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. अनेकांना आपल्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारासाठी अशाच प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी त्या प्रश्नाची भावनिकतेने महत्त्वाचे म्हणजे माणुसकीने दखल घेत ठोस उपाययोजना करतील, एवढीच अपेक्षा आहे.
काय सांगता... दहा रुपयांत मिळणार एलईडी बल्ब!
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.