कुकुडवाड (जि. सातारा) : परिसरातील वळई, विरळी, जांभुळणी, पानवन, शेणवडी, वरकुटे-मलवडी या गावांतील शेतशिवारात वानरांच्या कळपांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावांसह शेतशिवारात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वानरांचा एकच नव्हे अनेक कळप एकावेळी शेतात शिरत आहेत. सध्या शेतात रब्बी भुईमूग, वाटाणा, कांदा, मका, सिमला मिरची, भाज्या आणि फळवर्गीय पिके जोमात आहेत. वानरांचे कळप शेतात शिरले की पिकांची नासधूस करत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वानरांच्या कळपाला आपल्या शेतातून हाकलून देताना बाजूच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात जात असल्याने वाद वाढत आहेत. परिसरातील गावांमधून वानरांना हाकलण्याच्या नादात अनेक वाद विकोपाला जाऊन काही ठिकाणी मारामारीचे प्रकार घडत आहेत. वानरांचे कळप शेतातून हाकलण्यासाठी शेतकऱ्यांचा सकाळचा कामाचा वेळ वाया जात आहे. यामुळे वन विभागाने या बाबतीत लक्ष घालून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावागावांतून शेतकरी वर्गातून होत आहे. वळई येथील आंब्याचे बन, पाटील मळा, चिंचमळा या परिसरातून वानरांचा उपद्रव वाढला आहे.
गावालगच्या शेतीमधून अनेक कळप गावात शिरत असल्यामुळे घरांच्या छतांचे नुकसान होत आहे. एका घरावरून हाकलले की ते दुसऱ्या घराच्या छतावर जाऊन बसत आहेत. तसेच घरातील काही ठिकाणी साहित्याची नासधूस होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. शेतशिवारातून चिंचेची झाडे फळांनी लगडलेली आहेत. वानरांचे खाणे कमी, पण नासाडी जास्त असल्यामुळे चिंचेच्या झाडाखाली चिंचा पडून ढीग जमत आहेत. पिकांचे, फुलांचे, तसेच फळांचे नुकसान होत आहे. परिसरातील वनक्षेत्रामध्ये वन विभागाच्या वतीने वन्यजिवासाठी अन्न तसेच पाण्याचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याने वन्यजीव अन्न, पाण्याच्या शोधात शेतशिवारात येत आहेत, असे जाणकार सांगत आहेत.
वानरांच्या बंदोबस्तासाठी...
वानरांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी अनेक शक्कल लढवत आहेत. फटाक्यांचा आवाज, भांड्याचा आवाज, कुत्र्याला पाटी लावणे, काही तरी फेकून मारल्यासारखे करणे असल्या क्लुप्त्या लढवत आहेत. परंतु, पाणी आणि भुकेने व्याकुळ वानरांचे कळप सर्व डाव फेल ठरवत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.