केवळ सांगलीला पाणी देण्यासाठी जिल्ह्यातील ४६ गावांतील उपसा सिंचन योजनांवरील मोटारींचा विद्युतपुरवठा खंडित करणे ही बाब अन्यायकारक असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
कोरेगाव : ऐन टंचाईच्या स्थितीत सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणातील (Kanher Dam) पाणी सांगली जिल्ह्यात (Sangli) पोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव व कऱ्हाड या तीन तालुक्यांतील सुमारे ४६ गावांतून जाणाऱ्या कन्हेर डावा आणि आरफळ कालव्यावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला (Mahavitaran) दिल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
कृष्णा सिंचन विभागाच्या (Krishna Irrigation Division Satara) कार्यकारी अभियंत्यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या साताऱ्याच्या अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र पाठवले असून, त्यात म्हटले आहे, की रब्बी हंगाम २०२३-२४ करिता कन्हेर प्रकल्पातून कन्हेर डावा कालवा, आरफळ डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.
हे पाणी हे १९ नोव्हेंबरपासून सांगली जिल्ह्याकरिता असल्यामुळे व कन्हेर आणि आरफळ डाव्या कालव्यावरील शेतकरी पाण्याचा उपसा करत असल्याने सांगलीसाठी आवश्यक असलेला विसर्ग मिळत नाही. त्यामुळे लोकप्रक्षोभ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते.
तेव्हा ही बाबी टाळण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम १९७६ कलम ५१ (३) ९७ मधील तरतुदीनुसार कण्हेर डावा कालवा किलोमीटर ० ते २१ व आरफळ डावा कालवा किलोमीटर ० ते ८५ मधील समाविष्ट एकूण ४६ गावांच्या कालव्यावरील उपसा सिंचन योजनांचा विद्युतपुरवठा खंडित करावा.
कार्यकारी अभियंत्यांनी या पत्रात कण्हेर डावा कालवा किलोमीटर ० ते २१ मधील कळंबे, किडगाव, नेले, वर्ये, पानमळेवाडी, म्हासवे, वाढे, पाटखळ आणि आरळे या गावांतील उपसा सिंचन योजनांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तर आरफळ डावा कालवा किलोमीटर ० ते ८५ मधील आरफळ, वडूथ, सोनगाव संमत निंब, क्षेत्रमाहुली, महागाव, चिंचणेर निंब, तांदूळवाडी, कठापूर, शिरढोण, एकसळ, मंगळापूर, गोडसेवाडी, दुघी, सासुर्वे, धामणेर, रहिमतपूर, आर्वी, वाठार किरोली, गुजरवाडी, मोहितेवाडी, तारगाव, नलवडेवाडी, कालगाव, कोपर्डे, तुकाईवाडी, मसूर, यादववाडी, शिरवडे, रिकिबदारवाडी, वडोली निळेश्वर, राजमाची, दुर्गळवाडी, बेलवाडी, कचरेवाडी या गावांतील उपसा सिंचन योजनांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये जशी सांगली जिल्ह्यात पाण्याची गरज आहे, तशीच गरज ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आहे. तेव्हा केवळ सांगलीला पाणी देण्यासाठी जिल्ह्यातील ४६ गावांतील उपसा सिंचन योजनांवरील मोटारींचा विद्युतपुरवठा खंडित करणे ही बाब अन्यायकारक असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.