सातारा : वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी सक्रिय झाली असून गेल्या सहा दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान ७४९ आकडे व इतर साहित्य वीज वितरणने जप्त केले आहे. वीज वितरणच्या वडूज मंडलात सर्वाधिक २६९ वीज चोऱ्या समोर आल्या आहेत. या प्रकरणी वीज नियामक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वाढत्या उन्हाळ्याबरोबरच विजेची मागणीत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील व्यस्ततेमुळे शहरासह ग्रामीण भागातील जनतेला गेले काही दिवस भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. कोळसा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बहुतांश प्रकल्पांमधील वीजनिर्मितीवर तसेच उन्हाळ्यामुळे पाणी मागणी वाढल्याने जलनिर्मितीवरही मर्यादा आल्या आहेत. वारंवार सूचना करूनही अनेकांनी वीज वापराची बिले न भरल्याने सध्या वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. समोर असणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी वीज वितरणची धडपड सुरू आहे. याचदरम्यान अनेक ठिकाणी वीज चोरीत वाढ झाल्याचे लक्षात आल्याने वीज वितरणने त्या उघडकीस आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी विभाग, मंडलानुसार पथके तयार करत मुख्य वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
गेल्या सहा दिवसांत वीज वितरण कंपनीच्या पथकाने जिल्ह्यात वीज चोरीचे ७४९ प्रकार उघडकीस आणले. त्यामध्ये सर्वाधिक वीज चोरी करणाऱ्यांची संख्या वडूज मंडलात आहे.
इतर ठिकाणांहून आकडे किंवा केबल टाकून चोरीद्वारे वीज वापर करताना स्वतःच्या घरातील, परिसरातील लहान-मोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी. अधिकृत वीजजोडणी घेत ग्राहकांनी वीज वितरणला सहकार्य करावे तसेच भागातील वीज चोरीची माहिती द्यावी.
- गौतम गायकवाड,अधीक्षक अभियंता, सातारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.