वाई (सातारा) : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शहरामधील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोविड टास्क फोर्स या संघटनेची स्थापना केली. या फोर्सच्या कार्याचा प्रारंभ प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले व तहसीलदार रणजित भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी समाजोपयोगी काम करणे, गरजू कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मोफत भोजन व्यवस्था, घरी विलगीकरणात असलेल्या गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरविणे, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीची दैनंदिन नोंद व त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करणे, वाई शहर, तालुका व जिल्हा स्तरावरील सरकारी, खासगी रुग्णालयांतील उपलब्ध असणाऱ्या बेडची दैनंदिन माहिती पुरविणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे, प्रशासन, आरोग्य विभाग आणि कोरोनाग्रस्त व्यक्ती तसेच कुटुंबिय यांच्यामधील समन्वयाची भूमिका घेणे, साधने, शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांकडे असणाऱ्या ऑक्सिजन मशिनच्या उपलब्धतेविषयी माहिती देणे व समन्वयकाची भूमिका पार पाडणे.
कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना लागणाऱ्या कागदपत्रांची तसेच इतर अडचणींसाठी मदत करणे, कोरोनाग्रस्त व्यक्तींना उपचारादरम्यान लवकर बरे होण्यासाठी तज्ज्ञांकडून मोफत आहार व व्यायामाचे मार्गदर्शन करणे, कोविड लसीकरण मोहिमेस सहकार्य व जनजागृती करणे आदी उद्देशाने ही संघटना स्थापन केली आहे. यावेळी वाईचे उपाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, राजेश गुरव, काशिनाथ शेलार, प्रा. डॉ. नितीन कदम, प्रदीप जायगुडे, विजय ढेकाणे, देवानंद शेलार, गणेश जाधव, डॉ. सुधाकर भंडारे, अशोक मलटणे, अमित सोहनी, हर्षद पटवर्धन, महेंद्र ढगे उपस्थित होते.
या क्रमांकांवर साधा संपर्क...
ही सेवा 24 तास उपलब्ध करण्यासाठी 9517747272, 9717746767 असे टोल फ्री मोबाईल क्रमांक देण्यात आले असून त्यावर गरजूंनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Balkrishna Madhale
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.