fear of wild animal sakal
सातारा

Satara News : वन्यप्राण्यांच्या भीतीतच उजाडतो दिवस; व्यथा ढेण ग्रामस्थांची

व्यथा अभयारण्यग्रस्त वेळे ढेण ग्रामस्थांची : पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम

डॉ. प्रमोद फरांदे

सातारा : गावात धड रस्ता नाही, की दवाखाना नाही. पायवाटच हा त्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग... फोनची रेंज नाही, की कोणाकडे साधा टीव्हीही नाही. काही घरांत वीजही नाही. वीज गेलीच तर महिनोंमहिने अंधारात काढायचे. रोजगार नसल्याने तुटपुंजी शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. मात्र, तेही वन्य प्राण्यांपासून वाचली तर! हे कमी की काय त्यात सतत वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती. ही स्थिती आहे, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या वेळे ढोणधगगरवाडा गावची.

साताऱ्याच्या पश्‍चिमेकडे ठोसेघरपासून साधारण १२ किलोमीटरवर सडापठारालगत वसलेले जावळी तालुक्यातील वेळे ढेणधगरवाडा हे गाव. या गावासह १२ गावांचा १९८५ मध्ये कोयना अभयारण्यात समावेश झाला. यातील पाटण तालुक्यातील पाच गावांचे कऱ्हाड आणि पलूस तालुक्यांत, तर जावळी तालुक्यातील पाच गावांचे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पुनर्वसन झाले. मात्र, वेळे ढेणधगगरवाडाच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे पडले आहे.

एक पिढी संपली, तरी या लोकांच्या आयुष्याची परवड काही संपेना. सुमारे २०० लोकसंख्या असलेल्या या गावात जाण्यासाठी अद्याप साधा रस्ता देखील नाही. अभयारण्यातील झाडझुडपातून वाट काढत जाणे, हाच त्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग. गावात पूर्वापार जी तुटपुंजी जमीन आहे. हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन.

अर्थात, तीही वन्यप्राण्यांपासून वाचल्यानंतर. रानगवे, डुकरे, अस्वल, मोर आदी प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना लोकांना नाकीनऊ येते. वन्यप्राण्यांकडून लोकांवर हल्लेही होतात. दोन वर्षांपूर्वी अस्वलाने अनेकांना जखमी केले होते. रानगव्याने गावातील एका युवकाला ठार केले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची सतत भीती या लोकांना असते. गावात कशीबशी पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे.

जवळपास माध्यमिक शाळा नसल्याने गावातील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी जकातवाडीतील आश्रमशाळेचा आसरा घ्यावा लागतो. आश्रमशाळेत जेवढे शिक्षण मिळेल तेवढेच त्यांचे शिक्षण. गावात कोणताही दवाखाना नाही. त्यामुळे कोणी जास्त आजारी पडले तर झोळीत घेऊन सडापठारवर चालत व तेथून गाडीने साताऱ्याला यावे लागते. गावातील प्रत्येकाकडे रेशनिंग कार्ड आहे.

मात्र, रेशनिंगसाठी १२ किलोमीटरवर ठोसेघरला यावे लागते. या गावात आजतागायत कधी कोणतेही लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. कार्यकर्त्यांमार्फत निरोप पाठवून मतदान करवून घेतले जाते. मतदानासाठीही गावापासून सहा किलोमीटर वेळेमायणी येथे झाडी, जंगलातून पायवाटेवरून चालत जावे लागते. गावात लाइटची सोय आहे. मात्र, यातील काही घरे आजही अंधारातच आहे. खांबावरील गेलेले बल्ब दोन वर्षे बदलले जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात कोणाकडे साधा टीव्ही नाही, की फोनही नाही.

मोबाईलची रेंजही येत नाही. झाडाझुडपातून चालत सडापठारावर येऊन रेंज मिळेल तेथून फोन करायचा. रात्री कोणी व्हीसीडीवर पिक्चर लावला, तर तो पाहण्यासाठी सारा गाव लोटतो. पुनर्वसनासाठी पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील जमीन निश्‍चित केली होती.

मात्र, त्यातील काही क्षेत्र रस्त्यांसाठी, तसेच आदिवासी गेल्याने तेथे सर्व गावाचे पुनर्वसन करणे शक्य नसल्याने ६१ खातेदारांनी पसंतीनुसार भोळी, धनगरवाडी (ता. खंडाळा) येथे पुनर्वसन मागितले आहे. सध्या गावात राहात असलेल्या १६ खातेदारांची पूर्वीपासून पळस्पे (ता. पनवेल) येथे पुनर्वसनाची मागणी आहे. देऊर येथील खातेदारांनी बोपेगाव (ता. वाई) येथे पुनर्वसन मागितले आहे. पळस्पे येथील प्रस्तावित २६ हेक्टर क्षेत्रावर १६ खातेदारांचे पुनर्वसन होऊ शकते. मात्र, त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची!

यंत्रणेला फुटेना पाझर!

ज्ञान, विकासाच्या कोणत्याही सुविधा नसलेल्या या गावातील गावकरी पुनर्वसनासाठी अनेक वर्षांपासून धडपडत आहेत. आपली कैफियत घेऊन सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यांच्या चपल्या झिजल्या. मात्र, सरकारी यंत्रणेला काही पाझर फुटेना झाला आहे. पुनर्वसनासाठी वनखात्याची जमीन द्यायची आहे. कोणत्या जमिनी द्यायच्या हे निश्‍चितही आहे, तरीही पुनर्वसनाचे घोंगडे का भिजत आहे? असा या निमित्ताने प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आमच्या भागाचा ८५ च्या अधिसूचनेनुसार अभयारण्यात समावेश झाला. मात्र, आमच्या गावचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. अनेक सरकारे आली अन्‌ गेली मंत्र्यांसोबतच्या बैठकांमध्ये चर्चा होऊन निर्णय झाले. मात्र, त्याची अंमलबजावणी काही होत नाही. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही आम्ही विकासापासून लांब आहोत. सरकारने आमचे पुनर्वसन करावे, अन्यथा गोळ्या घालून मारून तरी टाकावे.

- रामचंद्र कोकरे-पाटील, अध्यक्ष, कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्रपकल्पग्रस्त पुनर्वसन समन्वय समिती,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT