सातारा : शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आठवडाभरात पालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विषयपत्रिका तयार करण्याचे काम पालिका प्रशासन सध्या करत आहे. सभेत प्राधान्यक्रमाने कोणते विषय मंजूर करून घ्यायचे यासाठीची मोर्चेबांधणी नगरसेवकांनी सुरू केली आहे.
12 फेब्रुवारीला पालिकेची सभा झाली होती. यानंतर कोरोनाचा फैलाव, देशव्यापी लॉकडाउन व इतर कारणांमुळे पालिकेच्या कारभारावर मर्यादा आल्या होत्या. आरोग्याशी निगडित असणाऱ्या बाबी विशेषाधिकारात मंजूर करत पालिकेने शहर परिसरात आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास सुरवात केली होती. कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे पाहून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अनलॉकनंतर पालिकेच्या कारभार काहीअंशी सुरळीत झाला. फेब्रुवारीनंतर पालिकेची सर्वसाधारण सभाच न झाल्याने त्याचा परिणाम शहरातील सार्वत्रिक विकासकामांवर झाला होता. रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी पालिकेने सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. यानुसार सभा घेण्याची परवानगी मागणारी पत्रे पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवली आहेत. या पत्रांवर अजूनही निर्णय होणे बाकी आहे. सभा घेण्यास परवानगी मिळेल, असे गृहित धरून पालिकेचे प्रशासन सभेसाठीची विषयपत्रिका तयार करण्यात गुंतले आहे. दहा महिन्यांच्या कालावधीत विकासकामे ठप्प झाल्याने प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील कामे विषयपत्रिकेत यावीत, यासाठी आग्रही आहेत.
झोपडपट्टी हटवा अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू; शंकर माळवदेंचा सातारा पालिकेस इशारा
नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांपैकी महत्त्वाची आणि निकडीची कामे निवडत त्यांना विषयपत्रिकेत स्थान देण्याची कसरत पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द या भागांचा प्रशासकीय कारभार सध्या पालिका पाहात आहे. पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या नागरिकांच्या मनात पालिकेच्या कारभाराविषयी साशंकता आहे. ही साशंकता दूर करत त्या भागातील नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी काही कामे या नव्याने सहभागी झालेल्या भागात पालिकेस सभेच्या माध्यमातून प्रस्तावित करावी लागणार आहेत.
सभा ऑनलाइनच होण्याची शक्यता
पालिकेने सभा घेण्यास परवानगी मिळावी, यासाठीचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयाशी केला आहे. यावरील उत्तर येणे बाकी असतानाच विषयपत्रिका तयार करण्याची धांदल पालिकेत उडाली आहे. नुकतीच जिल्हा परिषदेची ऑफलाइन सभा झाली. याच धर्तीवर पालिकेची सभा घेण्याची काही नगरसेवकांची मागणी आहे. ग्रामविकास मंत्रालयाचे सभांबाबतचे पत्रक वेगळे असून, नगरविकास मंत्रालयांचे सभेबाबतचे पत्रक वेगळे आहे. ग्रामविकासने ऑफलाइन सभांना परवानगी दिली असली, तरी नगरविकासने तशी दिलेली नाही. त्यामुळे पालिकेची होणारी सभा ऑनलाइनच होण्याची शक्यता जास्त आहे.
मेडीकल कॉलेज जागा हस्तांतरणासाठी 61 कोटींची तरतूद; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार
आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार; शरद पवारांनी मराठा क्रांतीस साता-यात दिला विश्वास
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.