आरोग्य यंत्रणांतील सुधारांबाबत मुख्यमंत्री गंभीर असल्याचे समोर आले; परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने या विषयाला पुरेशा गांभीर्याने घेतले नसल्याचे आज समोर आलेय.
सातारा : सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे राज्यभर धिंडवडे निघत असतानाही पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) व जिल्हा प्रशासनाला आरोग्य यंत्रणेतील सुधारणाबाबत अद्याप पुरेसे गांभीर्य आले नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिल्हा रुग्णालयातील (Hospital) केवळ एका वॉर्डची व औषध विभागाची पाहणी करून पालकमंत्री देसाई व जिल्हा प्रशासनाने केवळ ‘चटावरचे श्राद्ध’ उरकल्याची चर्चा आहे.
या कारभारांमुळे सर्वसामान्यांना दैनंदिन आरोग्य सुविधा घेताना येणाऱ्या अडचणी समजणार तरी कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या मृत्यूमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेचे लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली आहेत. संपूर्ण शासकीय व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
सर्वत्र शासकीय रुग्णालयातील त्रुटी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. दै. ‘सकाळ’नेही जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेत शासकीय रुग्णालयातील समस्यांची झाडाझडती घेतली. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली.
त्यात जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची पाहणी करून त्रुटी व उपाययोजनांबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. त्यातून आरोग्य यंत्रणांतील सुधारांबाबत मुख्यमंत्री गंभीर असल्याचे समोर आले; परंतु मुख्यमंत्र्यांनीही सांगूनही जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने या विषयाला पुरेशा गांभीर्याने घेतले नसल्याचे आज समोर आले.
वास्तविक, शुक्रवारी दुपारी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनातील अधिकारी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करणार होते; परंतु अचानकपणे सकाळी अकराची वेळ ठरली. तसे संदेश पत्रकारांपर्यंत गेले. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवन मरणाशी संबंधी असणाऱ्या विषयापेक्षा कोणता महत्त्वाचा मुद्दा पालकमंत्री, जिल्हा प्रशासनासमोर आला? त्यामुळे हा बदल केला, हे समजू शकले नाही.
सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले; परंतु पालकमंत्री देसाई साडेअकरानंतर रुग्णालयात आले. त्यांनी केवळ एक वॉर्ड जो तपासणी होणार असल्याने व्यवस्थित केला होता. त्याची पाहणी केली. त्यानंतर औषध विभागात जाऊन औषधांचा किती साठा आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यामुळे पितृपक्षात झालेल्या या पाहणीत ‘चटावरचे श्राद्ध’ उरकले गेले.
वास्तविक, जिल्हा रुग्णालय किंवा जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयांची पालकमंत्री देसाई व जिल्हा प्रशासनाने अचानकपणे पाहणी केली असती, तर शासकीय आरोग्य सुविधा घेताना सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची जाणीव लोकप्रतिनिधी व प्रशासनाला झाली असती. ते गांभीर्य आजच्या पाहणीत दिसले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न खरोखरच सुटणार, की दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केवळ सतर्कतेचा दिखावा ठरणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्याच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आगामी काळात गांभीर्याने उपाययोजना व्हाव्यात, हीच अपेक्षा आहे.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत
ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी हवेत
रुग्णालयातील बेडची संख्या वाढविणे
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा
जिल्हा रुग्णालयात तातडीने स्वच्छता कर्मचारी भरावेत
जिल्हा रुग्णालयातील बंद असलेल्या रक्त-लघवी तपासण्या व्हाव्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.