Kandati Vally Land esakal
सातारा

गुजरातच्या GST आयुक्तांनी कांदाटी खोऱ्यात बळकावली 620 एकर जमीन; महाबळेश्वरातलं 'झाडाणी' का आलं चर्चेत, जमिनीचा काय आहे दर?

गुजरात येथील एका सनदी अधिकाऱ्याने (Gujarat GST Commissioner) कांदाटीतील (Kandati Valley) ६२० एकर जमिनीचा ताबा घेतल्‍याचे समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

झाडाणी येथील ६२० एकर जागा खरेदी केल्‍यानंतर गुजरात येथील वरिष्‍ठ सनदी अधिकारी चंद्रकांत वळवी, त्‍यांचे नातेवाईक व इतरांनी त्‍यातील ४० एकर जागेत वन, वन्‍यजीव कायद्याचे उल्‍लंघन करत बांधकाम केले होते.

सातारा : जैवविविधता, निसर्गसंपदा जपण्यासाठी सुरू केलेल्या सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत माहिती अधिकारात मिळालेल्‍या माहितीत गुजरात येथील एका सनदी अधिकाऱ्याने (Gujarat GST Commissioner) कांदाटीतील (Kandati Valley) ६२० एकर जमिनीचा ताबा घेतल्‍याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित जबाबदार घटकांवर फौजदारी कारवाईचे आदेश पारित करावेत, यासाठी ता. १० जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्‍याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे (Sushant More) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

'झाडाणी'चं काय आहे प्रकरण?

मोरे म्हणाले, ‘‘अतिदुर्गम व पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या कांदाटी खोऱ्यात गुजरात येथील वरिष्‍ठ सनदी अधिकाऱ्याने तसेच त्‍याचे कुटुंबीय, नातेवाईक अशा १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील संपूर्ण गावाची जमीन खरेदी केली आहे. ती जमीन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (Sahyadri Tiger Reserve) बफर क्षेत्राजवळ आहे. विविध कारणे सांगत एकरी आठ हजार रुपये दराने त्‍या सनदी अधिकारी, नातेवाइकांनी ६२० एकर जागा खरेदी केली आहे. यापैकी ३५ एकरांत जंगल रिसॉर्ट प्रकल्प उभा करण्‍यात येत असून, त्‍याठिकाणी बांधकाम, खोदकाम, वृक्षतोड झाली आहे. त्‍याकडे सर्व यंत्रणांचे दुर्लक्ष असल्‍याचे दिसून येत आहे.

झाडाणी येथील बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणावर शासन निधीतून वीज, पाणीपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशी मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे. अवैध बांधकाम, खाणकाम, वृक्षतोड, वीज-पाणी पुरवठ्यासाठी शासनाच्या निधीचा झालेला दुरुपयोगाची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी दाखल करण्‍याची मागणी करणार आहे. यानुसार कार्यवाही न झाल्‍यास ता. १० जूनपासून उपोषण करणार असल्‍याचेही श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले.

झाडाणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

आमच्या वडिलोपार्जित जमिनी बळकाविणाऱ्या वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, आमच्या जमिनी परत कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे. येत्या ९ जूनपर्यंत आमच्या जमिनी परत न केल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन झाडाणी (Jhadani) ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

अवैध बांधकाम, खाणकाम, जंगलतोडीमुळे पर्यावरणास धोका

झाडाणी गावाबरोबरच उचाट आणि दोडणी गावातही कमाल जमीनधारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसते. या सर्वांनी केलेले अवैध बांधकाम, खाणकाम, जंगलतोडीमुळे पर्यावरणास धोका आहे. उचाट येथे शासनाच्या जमिनीत अतिक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही सह्याद्री वाचवा मोहिमेतील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.

कांदाटी-नंदुरबार-गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय?

झाडाणीतील संबंधित भूखंडमाफिया हा गुजरातमधील एका मातब्बर नेत्याच्या आशीर्वादानेच एवढे मोठे अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम करत आहे. दरम्यान, रेणुसे ते झाडाणीवरून उचाट ते रघुवीर घाट (Raghuveer Ghat) हा दोन पदरी रस्तादेखील होत आहे. या रस्त्याची आवश्यकता नसतानाही हा रस्ता केला जात आहे, यासाठी डांबर प्लांट सुद्धा रेणुसे गावात अनधिकृतपणे सुरू आहे. या कांदाटी- नंदुरबार- गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे मोरे यांनी सांगितले.

दोषी आढळल्यास कठोर कारवाई

झाडाणी गावातील जमीन खरेदी प्रकरणी चौकशी अहवाल सादर झाला आहे. त्याप्रमाणे योग्य ती माहिती घेऊन प्रथमदर्शनी सुनावणी घेण्यात येईल आणि त्यानंतर कारवाई करण्यात येईल. तसेच यामध्ये दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे वाईचे प्रांताधिकारी तथा चौकशी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिंदे याच भागातील मूळ रहिवासी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे या भागातील मूळ रहिवासी असल्यामुळे याच भागात अनधिकृत बांधकाम, खोदकाम, वृक्षतोड व वनविभागांतर्गत जागेत अवैध रस्ते काढून, वनहद्दीतून वीजपुरवठा करून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे समोर येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून याठिकाणी अवैध बांधकाम, शेजारी मोठ्या प्रमाणात खाणकाम व उत्खनन सुरू आहे. मात्र, प्रशासनाला याची पुसटशी कल्पना देखील नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

झाडाणीतील ‘त्या’ बांधकामाची चौकशी करा; निवासी उपजिल्‍हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा : सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी (ता. महाबळेश्‍‍वर) येथील ६२० एकर जागेचा ताबा व त्‍यावर गुजरात येथील वरिष्‍ठ सनदी अधिकारी चंद्रकांत रावजी वळवी (Senior Officer Chandrakant Raoji Valvi) यांच्‍यासह इतरांनी केलेल्‍या बांधकामाच्‍या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन जिल्‍हा प्रशासनास दिले होते. यानुसार निवासी उपजिल्‍हाधिकारी नागेश पाटील यांनी चौकशीचे आदेश संबंधित यंत्रणा व विभागांना दिले आहेत.

झाडाणी येथील ६२० एकर जागा खरेदी केल्‍यानंतर गुजरात येथील वरिष्‍ठ सनदी अधिकारी चंद्रकांत वळवी, त्‍यांचे नातेवाईक व इतरांनी त्‍यातील ४० एकर जागेत वन, वन्‍यजीव कायद्याचे उल्‍लंघन करत बांधकाम केले होते. याबाबतची सर्व कागदपत्रे सुशांत मोरे यांनी माहिती अधिकार कायद्याखाली मिळवत खरेदी व्‍यवहारासह त्‍याठिकाणच्‍या बांधकामाच्‍या चौकशी मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार जिल्हा प्रशासनाने वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागास चौकशी करण्‍याचे तसेच त्‍याचा अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले आहेत.

वनसंपदा व वन्यजीव कायद्याचं उल्लंघन

पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असतानाही त्याठिकाणी खोदकाम, खाणकाम, रस्ते आदी कामे केली वनसंपदा व वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाले आहे. संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या नसतानाही हे झाडाणी येथे बांधकाम केल्‍याचे माहिती अधिकार कायद्यातील कागदपत्रांमुळे समोर आले होते. यामुळे सुशांत मोरे यांनी १० जूनपासून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.

झाडाणी प्रकरणी आमच्या कारवाई करण्यावर मर्यादा आहेत. यातील अतिरिक्त जमीन शासनजमा केली जाईल. अवैध बांधकामाची पाहणी करून त्यावर दंडात्मक कारवाई वा काढून टाकण्याची गरजेनुसार कारवाई केली जाईल.

–जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

झाडाणीत जमिनीचा खरेदी दर किती?

केवळ आठ हजार रुपये एकर याप्रमाणे झाडाणीतील जमीन संबंधितांनी खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून परिसरात सुरू असलेले जमीनखरेदीचे व्यवहार, अनधिकृत बांधकाम, वृक्षतोड, मोठ्या प्रमाणातील उत्खनन हे एवढं सुरू असताना प्रशासनास याकडं दुर्लक्ष तर करत नाही ना? यावर आता संशय व्यक्त केला जात आहे.

कांदाटी खोऱ्याबाबत काय म्हणाले होते शिंदे?

कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी येथे पर्यटन विकासाबरोबरच शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करून नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मागील वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते.

झाडाणी प्रकरणातील ठळक मुद्दे

  • -झाडाणीत ६२० एकर जागेचा ताबा

  • -गुजरातच्या सनदी अधिकाऱ्याकडून कांदाटीतील ६२० एकर जमिनीचा ताबा

  • -झाडाणी गावातील जमीन खरेदी प्रकरणी चौकशी अहवाल सादर

  • -10 जूनपासून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

  • -अवैध बांधकामाची पाहणी करून त्यावर होणार दंडात्मक कारवाई

  • -35 एकरांत उभारण्यात येतोय जंगल रिसॉर्ट प्रकल्प

  • -संबंधित यंत्रणांना निवासी उपजिल्‍हाधिकारी नागेश पाटलांकडून चौकशीचे आदेश

  • -अवैध बांधकाम, खाणकाम, जंगलतोडीमुळे पर्यावरणास धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT