'ईडी आणि इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राज्य सरकारला आज वाटले आणि उद्या कारवाई केली असे होत नाही.'
कऱ्हाड : ईडी आणि इन्कमटॅक्स (ED and Income Tax) हे स्वतंत्र विभाग आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यात राजकीय आणि शासकीय हस्तक्षेप नसतो. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. न्यायालय योग्य पद्धतीने दखल घेऊन न्याय देईल, असे मत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले.
ईडीच्या कारवाईवरून ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘‘ईडी आणि इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राज्य सरकारला आज वाटले आणि उद्या कारवाई केली असे होत नाही.
ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारीची त्यांच्याकडून अगोदर स्वतंत्र चौकशी त्यांच्या सोर्समार्फत केली जाते. त्यातून आवश्यकता वाटली, तर ज्यांच्याविरोधी तक्रार आली असेल त्यांना समन्स देऊन चौकशीला बोलविले जाते. संबंधितांना म्हणणे मांडण्यास संधी दिली जाते. यानंतर त्या तक्रारीत त्या यंत्रणेला तथ्य वाटले, तर ते त्यांच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करतात.
सरकारला वाटले एखाद्यावर कारवाई करावी, तर ते तसे होत नाही. त्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे ज्यांना अटक होतात, चौकशीला समन्स दिले जातात त्याची माहिती राज्य सरकारला दिली जाते. मी गृहराज्यमंत्री होतो. त्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने काहीतरी उद्देश ठेवून कारवाई केली जात नाही.’’
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दावोस परिषदेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘‘परकीय गुंतवणूक आणण्यासाठी एखाद्या उद्योजकाला, उद्योगपतीला, त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला बरोबर घेऊन गेले तर त्याला दलाल म्हणणे योग्य नाही. जी गुंतवणूक राज्यात आणणार आहेत, त्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तर आदित्य ठाकरे त्यांना कोणत्या आधारे दलाल म्हणताहेत. त्यापेक्षा त्यांनी आमदार प्रसाद लाड यांनी यापूर्वी दावोसला गेलेल्या शिष्टमंडळातून केलेल्या काही मान्यवरांनी पाठीमागे दोन-तीन दिवस थांबून काय केले, हे सांगायची वेळ आणू नका असे म्हटले आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करावे आणि मग मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे.’’
पाणीटंचाई तीव्र होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले, की पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा विचार करून त्यानंतर शेतीच्या पाण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.