वाई : खवल्या मांजर तस्करी प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मेहबूब विजापूरकर याच्याकडे चक्क पुणे जिल्ह्यातील वन्यजीव व सर्पमित्र संरक्षण संघटनेचे ओळखपत्र मिळाले आहे. संशयितांचे पितळ उघडे पडल्याने रक्षकच बनला भक्षक, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
खवले मांजर प्रकरण मांस किंवा अंधश्रद्धेतून काळ्या जादूसाठी वापरण्यात येणारे खवल्या मांजर विकणाऱ्या टोळीचा सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला. या टोळीचा म्होरक्या मेहबूब विजापूरकर (वय 22), निखिल खांडेकर (वय 23),आकाश धडस (वय 19), लक्ष्मण धायगुडे (वय 24), विठ्ठल भंडलकर (वय 26), महेश चव्हाण ( वय 25) अशा सहा जणांना खवल्या मांजरासह गेल्या रविवारी वेळे ता. वाई येथे महामार्गालगत एका हॉटेलच्या आवारात सापळा रचून अटक केली होती. मुख्य संशयितासह दोघांच्या वनकोठडीत वाई न्यायालयाने तीन दिवस वाढ केली आहे. तर इतर चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
वन अधिकाऱ्यांनी केलेल्या कसून चौकशीत मेहबूब विजापूरकर या युवकाकडे पुणे जिल्हा वन्यजीव व सर्परक्षक असोसिएशनचे ओळखपत्र मिळाले आहे. प्राणीमित्र असल्याच्या नावाखाली त्याने या खवल्या मांजराच्या तस्करीसह आजपर्यंत आणखी काय काय उद्योग केले आहेत? मुख्य संशयित विजापूरकर यांचा अन्य जिल्ह्यातील वन्यजीवांच्या तस्करीच्या गुन्ह्यात कितपत सहभाग आहे? ही माहिती खणून काढण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांपुढे आहे.
वन्यजीवांच्या तस्करीमध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. वन अधिकारी या गुन्ह्याच्या खोलात शिरुन सूत्रधारापर्यंत पोहचतील का, हे लवकरच स्पष्ट होईल. मुख्य सुत्रधार व त्याच्या पुणे जिल्ह्यातील साथीदाराच्या वनकोठडीत वाढ झाल्याने वन अधिकाऱ्यांच्या तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे (WCCB) रोहन भाटे यांच्यामुळे संशयित वन अधिकारी यांच्या जाळ्यात आले. भरारी पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.