छत्रपती शिवरायांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आम्ही जपत असून, आम्ही साताऱ्यातील जातीय सलोखा बिघडून देणार नाही.
सातारा : महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना आलेले मेसेज हे पाकिस्तानस्थित क्रमांकावरून नसल्याचे, तसेच ते पाठविण्यासाठी एका ॲपची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
आंदोलकांना धमकीचे मेसेज स्थानिक पातळीवरून पाठविण्यात आल्याची व त्यासाठी वापरलेल्या प्रोफाइलची माहिती मिळाल्याची पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याशी चर्चेदरम्यान दिली.
महापुरुषांची समाज माध्यमांवर झालेल्या बदनामीप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेत निवेदन दिले. महापुरुषांची बदनामी करत सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या, तसेच त्यासाठी त्याला प्रोत्साहन देणाऱ्या, मदत करणाऱ्यांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उदयनराजेंनी केली.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, गीतांजली कदम, विजय बडेकर आदी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ‘‘बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार करण्यात आली. त्यापूर्वी दोन दिवस हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न होणे हे दुर्दैवी आहे.
याबाबत तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्यांना नंतर धमकीचे मेसेज आले. एकंदरच हा प्रकार गंभीर असून, त्याची दखल आपण गांभीर्याने घ्यावी. ज्यांना धमकी आली आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे. महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस होतेच कसे, हा प्रश्न मनाला वेदना देणारा आहे. अशा अपप्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत. या अपप्रवृत्तींमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत आहे. सातारा शांतताप्रिय असून, कोणत्याही अप्रिय घटना यापूर्वी घडलेल्या नाहीत.
एकदा का जर ठिणगी पडली, रान पेटले तर मग त्याला कोणीही अडवू शकणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या आणि उपलब्ध पोलिस यंत्रणेचा विचार करता त्यांनाही ते शक्य होणार नाही. हे टाळायचे असेल तर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कोणीही असो. कोणत्याही जातिधर्माचा असो. त्याला धडा शिकवलाच पाहिजे.
असे झाले तरच इतरांना पायबंद बसेल. छत्रपती शिवरायांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आम्ही जपत असून, आम्ही साताऱ्यातील जातीय सलोखा बिघडून देणार नाही. उदयनराजे यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारल्यानंतर समीर शेख म्हणाले, ‘‘या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे. तपासासाठी दिल्ली येथील यंत्रणेशी, तसेच त्यांच्या पुणे येथील कार्यालयाची मदत घेत आहोत. या प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.