Jawan Ajinkya Kisan Raut esakal
खटाव (सातारा) : वीर जवान अजिंक्य किसन राऊत यांच्यावर रात्री उशिरा येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजिंक्य यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी ‘हुतात्मा जवान अजिंक्य राऊत अमर रहे’च्या घोषणा व साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. अंत्यविधीच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. वीर जवान अजिंक्य यांचे पार्थिव सिंकदराबादवरून खटाव येथे आणण्यात आले. त्यानंतर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. नंतर फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्यावर रांगोळी व फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जनसागर लोटला होता. येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात चौथरा सजवण्यात आला होता. अंत्ययात्रा अंतिम ठिकाणी पोहचताच लष्कर व पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. वीर जवान अजिंक्य यांच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगी ध्वज काढून लष्करी अधिकाऱ्यांनी वीर पत्नी कोमल यांना सुपूर्त करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.
यावेळी वीर जवानाला मानवंदना देण्यात आली. अक्षयने वीरबंधूच्या पार्थिवाला भडाग्नी दिली. यावेळी आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, युवा नेते राहुल पाटील, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, सहायक सैनिक कल्याण अधिकारी इथापे, लष्करी अधिकारी, पोलीस, महसूल व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. अजिंक्यांच्या पश्चात आई- वडील, भाऊ व पत्नी असा परिवार आहे. दोनच महिन्यांपूर्वी सुट्टीनंतर ते कामावर हजर झाले होते. लहान भाऊ अक्षय हा इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत आहे. अजिंक्य यांच्या आई- वडील व पत्नीला मृत्यूची वार्ता कळताच त्यांनी सिंकदराबादकडे, तर नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असलेल्या मित्रमंडळीनी खटावला धाव घेतली. गावच्या सुपुत्राला वीरमरण आल्याचे वृत्त गावात कळताच वातावरण सुन्न झाले. त्यानंतर गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. त्यांच्या मित्रांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रध्दांजली वाहिली. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.