Kargil war Martyr jawan sakal
सातारा

Kargil Vijay Diwas : कारगिल ! दिवस जोशाचे... स्फूर्तीचे अन्‌ अश्रूंचेही...!

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही प्रत्येक युद्धात देशाला ज्या ज्या वेळेस पराक्रमाची गरज पडली, त्या वेळी सातारा जिल्ह्यातील जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कारगिल युद्धातही साताऱ्यातील जवानांच्या पराक्रमाची, शौर्याची परंपरा कायम राहिली.

दिलीपकुमार चिंचकर

सातारा - शौर्य, सैनिकी परंपरा आणि साताऱ्याचे अतूट नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही प्रत्येक युद्धात देशाला ज्या ज्या वेळेस पराक्रमाची गरज पडली, त्या वेळी सातारा जिल्ह्यातील जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कारगिल युद्धातही साताऱ्यातील जवानांच्या पराक्रमाची, शौर्याची परंपरा कायम राहिली. या युद्धात जिल्ह्यातील सहा जवानांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान दिले. कारगिल विजय दिनास उद्या (शनिवार) २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील हुतात्म्यांची ही वीरगाथा...

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तानमध्ये तीन मे ते २६ जुलै १९९९ मध्ये लढले गेले. पाकिस्तानी घुसखोर सैनिकांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाण्यांवर कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले अन्‌ या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

कारगिल क्षेत्रात पाकचे सैनिक उंच टेकड्यांवर होते. घुसखोरी लक्षात आल्यानंतर आपल्या सैन्याने घुसखोरांना परतविण्यासाठी हल्ले केले. मात्र, आपल्या सैनिकांवर पाक सैनिक वरून गोळीबार करत होते. आपल्या सैन्याला लक्ष्य करणे त्यांना सोपे जात होते; पण आपल्या युद्धकलेत तरबेज असलेल्या जवानांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. जमिनीवरून लढणाऱ्या जवानांना बोफोर्स तोफा, मिग विमाने यांनी मोलाची मदत केली. आपल्या धाडसी जवानांनी जिवाची पर्वा न करता पाक सैनिकांना टिपले. आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांपुढे पाक सैनिकांनी गुडघे टेकले. अनेक पाक सैनिक यमसदनी गेले, तर अनेक जण पळून गेले. अखेर पाकिस्तान सैन्याने काबीज केलेली कारगिलसह सर्व ठाणी आपल्या जवानांनी २६ जुलैला ताब्यात घेऊन त्यावर तिरंगा फडकावला आणि अवघा देश विजयाच्या जल्लोषात न्हाऊन गेला.

साताऱ्यात कारगिलवरील विजयाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिक उत्स्फूर्तपणे भारताच्या विजयाच्या घोषणा देत, तिरंगा फडकावत रस्त्यावर आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला होता. प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला. या आनंदाला, अभिमानाला जवानांच्या पराक्रमाची किनार होती, तशीच एक जवानांच्या हौतात्म्याची किनारही होती.

या युद्धात भारताच्या शेकडो जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. साताऱ्यातील सहा जवानांचा त्यामध्ये समावेश होता. जवानास वीरमरण आल्याची बातमी येताच सारा जिल्हा सुन्न होऊन जात होता. हुतात्म्यांच्यात तर चूल पेटत नव्हती. सारा गाव हुतात्म्याच्या घरापुढे बसून राहायचा. जिल्ह्यातील अनेक गावांतून नागरिकही हुतात्म्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गावात यायचे. युवक गावात, गावाबाहेर, नजीकच्या मार्गावर फ्लेक्स लावून आदरांजली वाहायचे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी, पोलिस विभागाचे पथक दाखल व्हायचे.

लष्करी गाडीतून हुतात्मा जवानाचे पार्थिव येण्याची सारा गाव वाट पाहात असायचा. लाडक्या हुतात्म्याचे पार्थिव गावात आणण्यासाठी गावकरी, जवानाचे मित्र फुलांनी वाहन सजवायचे. लष्कराचे वाहन पार्थिव घेऊन येताच नागरिकांनी विजयाच्या, हुतात्म्याच्या पराक्रमाच्या घोषणा देत आणि सारा आसमंत भरून जायचा. हुतात्म्याच्या कुटुंबात आक्रोश सुरू व्हायचा. त्या आक्रोशाने सर्वांची हृदये पिळवटून जायची. पाकिस्तानच्या विरोधात सर्वांच्या मुठी नकळत आवळल्या जायच्या.

हुतात्म्याची अंत्ययात्रा सुरू होताच आबालवृद्ध, विद्यार्थी, महिलांसह सारा गाव रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून पार्थिवावर फुलांची उधळण करायचा. हुतात्म्याच्या पराक्रमाच्या घोषणा, ‘भारत माता की जय’चा जयजयकार अव्याहत सुरू राहायचा. अंत्यसंस्कारांच्या वेळी हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध व्हायचे. अशा शांत वातावरणात पोलिसांचा मानवंदनेचा बिगूल वाजायचा अन्‌ सर्वांच्या अंगावर शहारे यायचे. लाडक्या जवानाला बंदुकीच्या फैरी

झाडून पोलिस पथक अखेरची मानवंदना द्यायचे... आणि सारा आसमंत भारतमातेच्या जयजयकाराने भरून जायचा.

कळंभेतील हुतात्मा शशिकांत शिवथरे

कळंभे (ता. वाई) येथील भारतीय लष्करातील सिग्नलमन शशिकांत आबासाहेब शिवथरे हे सन १९९६ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. प्रशिक्षणानंतर लष्करात युनिट ७ राष्ट्रीय रायफल पंजाबमध्ये ते कार्यरत होते. जम्मू काश्‍मीरमध्ये अनंतयाग जिल्ह्यातील पथरीवालगाव भागात काही दहशतवादी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर शशिकांत शिवथरे यांची तुकडी त्या दहशतवाद्यांचा नि:पात करण्यासाठी निघाली.

दहशतवाद्यांच्या समूहाने या तुकडीवर बेछूट गोळीबार सुरू केला. धाडसी शशिकांत शिवथरेंनी एका हातात रेडिओ सेट धरून दुसऱ्या हाताने गोळीबार करत तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात शशिकांत यांना वीरमरण आले. तो दिवस होता पाच ऑगस्ट १९९९. या कामगिरीबद्दल लष्कराने त्यांना मरणोत्तर शहादत पदक आणि शौर्यपदक बहाल केले. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना पदक देऊन गौरविले होते.

शशिकांत यांचे प्राथमिक शिक्षण कळंभे, तर माध्यमिक शिक्षण रहिमतपूरला, तसेच महाविद्यालयीन शिक्षण पाचवड (ता. वाई) येथे झाले होते. ते गावातील सामाजिक कार्यात आघाडीवर असत. त्यांचा स्वभाव लोकाभिमुख होता. खो-खो, कबड्डी, लेझीम यामध्ये ते पारंगत होते. धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

शिवथरे कुटुंबीयांनी घराच्या अंगणात शशिकांत यांचे स्मारक उभारून त्यांच्या स्मृती कायम ठेवल्या आहेत. शशिकांत यांनी वापरलेल्या सर्व वस्तू, पाठविलेली पत्रे या स्मारकात जपून ठेवण्यात आली आहेत. शशिकांत यांच्या स्मरणार्थ परिसरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना मदत केली जाते.

तडवळे सं. वाघोलीतील हुतात्मा चंद्रकांत भोईटे

तडवळे सं. वाघोली (ता. कोरेगाव) येथील दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हुतात्मा चंद्रकांत बळीराम भोईटे २९ डिसेंबर १९९५ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. त्यांना कबड्डी आणि मल्लखांबाची विशेष आवड होती. ते उत्कृष्ट शिलाईकाम करत असत. ऑपरेशन चक्रव्यूह अंतर्गत मोहिमेत त्यांचा सहभाग होता.

कॅप्टन सतीश हांगे यांच्यासमवेत जम्मू काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील बलजोई गावातील घनदाट जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा शोध घेताना झालेल्या चकमकीमध्ये ३० एप्रिल १९९९ मध्ये चंद्रकांत वयाच्या २२ व्या वर्षी हुतात्मा झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी व तीन मुले असा परिवार आहे. भोईटे कुटुंबीयांनी घरासमोर चंद्रकांत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक उभारले आहे.

अंतवडीचे सुपुत्र महादेव निकम

कऱ्हाड तालुक्यातील अंतवडी गावचे सुपुत्र हुतात्मा महादेव यशवंत निकम हे वयाच्या २१ व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते.

महादेव निकम हे आपले सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेच्या ७ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये रुजू झाले. महादेव हे घरातील एकुलता एक मुलगा. वडिलांनी महादेव यांचा विवाह सहा जून १९९८ रोजी उज्ज्वला यांच्याबरोबर करून दिला; परंतु नियतीला त्यांचा संसार मंजूर नसावा.

पाकिस्तानी सैन्याने कारगिल, द्रास, बटालिक येथील भारतीय सैन्य चौकीवर धोकेबाजीने कब्जा केला आणि तीन मे १९९९ ला भारतीय सैन्याने पाकिस्तान सेनेविरुद्ध युद्ध सुरू केले. या युद्धात महादेव निकम ७ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमधून सहभागी होते.

महादेव निकम हे पाकिस्तानी सैन्याबरोबर दोन महिने लढत होते. २६ जून रोजी महादेव निकम हे पाकिस्तानी सैन्याशी धैर्याने सामोरे जात असताना धारातीर्थी पडले. त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला आणि एका महिन्यात भारताने कारगिलवर विजय मिळवला. कारगिल लढाईला ‘ऑपरेशन विजय’ म्हणून संबोधले गेले. महादेव यांच्या वीरपत्नी उज्ज्वलाताईंनी आपल्या मुलीचे नाव विजया ठेवले आहे.

अनपटवाडीतील वीर जवान नारायण साळुंखे

अनपटवाडी (ता. कोरेगाव) येथील हुतात्मा जवान नाईक नारायण मारुती साळुंखे हे १९८४ मध्ये बेळगाव येथे ६, मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये भरती झाले. कारगिल युद्धात ऑपरेशन विजयमध्ये उरी सेक्टर येथे पाकिस्तानच्या चार सैनिकांना त्यांनी यमसदनी पाठवले.

शत्रूशी लढताना त्यांच्या डोक्याला एक गोळी लागली, तर एक गोळी छातीत घुसली. आठ जून १९९९ मध्ये ते हुतात्मा झाले. त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये त्यांना हाय अल्टिट्यूट मेडल, सैन्य सेवा मेडल (जम्मू काश्मीर), स्पेशल सेवा पदक (जम्मू काश्मीर), ५० वे भारतीय वार्षिक पदक मिळाले. त्यांच्या मागे वीरपत्नी हेमलता नारायण साळुंखे आणि मुलगा, दोन मुली, सून असा परिवार असून, तिन्ही मुले उच्चविद्याविभूषित आहेत. साळुंखे कुटुंबीय सध्या खटाव येथे राहात आहेत.

ललगुणचे वीर जवान सुभेदार कृष्णात घाडगे

खटाव तालुक्यातील ललगुण येथील हुतात्मा सुभेदार कृष्णात नारायण घाडगे हे ३० ऑक्टोबर १९७१ ला लष्करातील ११० बाँबे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये भरती झाले. देशसेवा बजावत असताना त्यांनी १९८७ मध्ये ऑपरेशन पवन, १९९३ मध्ये ऑपरेशन रक्षक व ऑपरेशन सेवाज आणि १९९९ मध्ये ऑपरेशन विजय अशा युद्धांत मोलाची कामगिरी बजावली.

ऑपरेशन विजय कारगिल युद्धात त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून पाक सैन्याशी लढा दिला. भारतभूमीचे रक्षण करताना सुभेदार कृष्णात घाडगे यांना १८ जून १९९९ रोजी वीरमरण आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ललगुण (ता. खटाव) येथे युद्धस्मारक उभारण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने नाइन इयर्स लाँग सर्व्हिस मेडल, सैन्य सेवा मेडल, युनायटेड नेशन्स मेडल, विदेश सेवा मेडल (साऊथ आफ्रिका) या पुरस्कारांनी त्यांच्या शौर्याचा गौरव केला. त्यांच्या मागे पत्नी उषा घाडगे, विवाहित पाच मुली अश्विनी जाधव, वैशाली घोरपडे, शोभा डेरे, स्नेहल कदम, शीतल फडतरे व त्यांच्या बंधूंचा परिवार आहे.

गजानन मोरेंचे स्मारक देतेय तरुणांना प्रेरणा

तारळे भागातील छोट्याशा भुडकेवाडी (ता. पाटण) गावतील गजानन मोरे हे देखील कारगिल युद्धात पराक्रमाची शर्थ करीत शत्रूला मारता मारता हुतात्मा झाले. त्यांचा भीम पराक्रम आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.

गजानन मोरे यांचा जन्म तारळे भागातील छोट्याशा भुडकेवाडी (ता. पाटण) येथील चतुराबाई व पांडुरंग मोरे यांच्या पोटी झाला. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून ते पुढे आले. केवळ १८ गुंठे शेतजमीन. त्यामुळे मोल मजुरी करून आईवडिलांनी मुलांना वाढविले. गजानन यांना लहानपणापासून सैन्य दलात भरती होण्याचे वेड होते.

गरीब कुटुंबाची पार्श्वभूमी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मेहनत करीत वयाच्या अठराव्या वर्षीच सैन्यदलात भरती झाले. बेळगाव इथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते १७ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये देशसेवेत रुजू झाले. द्रास येथे त्यांनी काहीकाळ देशसेवा बजावली. त्यानंतर ते दुर्गम भाग अशी ओळख असलेल्या कारगिलमध्ये कार्य करीत होते. कारगिल युद्धात ऐन विशीत त्यांनी हौतात्म्य स्वीकारले. त्यांच्या पश्चात कुटुंबाने गावालागत जमीन खरेदी करून स्वखर्चाने स्मारक बांधले आहे. हुतात्मा स्मारकामुळे शहीद गजानन मोरे यांचे चिरंतन स्मरण होत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT