सातारारोड : लोकशाहीने नागरिकांना दिलेला हक्क, अधिकारावर गदा आणणाऱ्यांच्या विरोधात कोरेगाव मतदारसंघातील जनतेने उठाव करत क्रांतीची तुतारी हातात घेतली असून, सातारा तालुक्यातील १८ गावांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्यातील वाढे, पाटखळ, वासोळे, बसाप्पाचीवाडी, रेनावळे, पाटखळमाथा, आरळे, वडूथ, बोरखळ, आसगाव, आरफळ, शिवथर, न्हाळेवाडी, मालगाव आदी १८ गावांतील मतदारांशी पदयात्रेद्वारे संवाद साधला.
पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्या वेळी पाटखळ येथे आमदार शिंदे बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून या १८ गावांनी मोठा पाठिंबा दिला आणि या गावांतील ग्रामस्थ गेली २५ वर्षे माझी पाठराखण करत आहेत. अभयसिंहराजे भोसले यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारून समाजकारण, राजकारण करताना या भागातील जनतेमुळे मला कायम ऊर्जा मिळाली.
कोरेगाव मतदारसंघातील सुसंस्कृत विचारांवर चालणारी राजकारणाची पातळी गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी रसातळाला पोचविली आहे. सिंचनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघातील वैचारिक राजकारणाचा बाज टिकवण्यासाठी माझी स्वाभिमानाची लढाई सुरू आहे. या लढाईला मतदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद, पाठबळ परिवर्तनाची नांदी आहे.’’
माजी आमदार सदाभाऊ सपकाळ म्हणाले, ‘‘गेल्या वेळी कोरेगाव मतदारसंघातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनी त्यांचेच सरकार पाडण्यासाठी पुढाकार घेऊन जनतेशी गद्दारी केली. या भागाचा समावेश असलेल्या पूर्वीच्या जावळी मतदारसंघाचे मी पाच वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. येथे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना मानणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत.
या भागातील १८ गावांतील शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. कोरेगाव मतदारसंघाला लागलेला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी गावागावांतून आमदार शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.’’
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.