भारतामध्ये धार्मिक कारणासाठी पर्यटन सर्वांत जास्त चालते. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, साहसी क्रीडा प्रकारांसाठी पर्यटन आदी विविध पर्यटने आता येथे रुजायला लागली आहेतच.
-डॉ. संदीप श्रोत्री, सातारा
सध्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत (New Mahabaleshwar Project) चर्चा, बैठका आणि ऊहापोह चालू आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी ही सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे गेली १० दशके तरी पर्यटन नकाशावर अग्रगण्य आहेत. १०० वर्षांपूर्वी असलेली लोकसंख्या आज पाचपटीने वाढली आहे. सर्वसामान्य जनतेचा आर्थिकस्तर देखील वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या खिशामधील खळखळणारा पैसा हा चैन करणे आणि उपभोग घेणे यामध्ये अधिक रस दाखवत आहे, अर्थात त्यात वावगे काहीच नाही; परंतु हा ताण मात्र येथील निसर्गावर पडत आहे, हे नक्की.
महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या पर्यावरण संवेदनशील भागाला वाढत्या पर्यटनाचा ताण असह्य झाला आहे, त्यालाही कितीतरी दशके उलटून गेली. या पर्यटनाला (Tourism) वेळीच विविध पर्याय द्यायला हवे, याच मताचा मी आहे. तितकेच संयमित पर्यटन हे शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक आहे, हेही सत्य आहे. वाढत्या पर्यटनापायी येथील पर्यावरणावर घाला घातला जाऊ नये, हे कटाक्षाने पाहायला हवे. नवीन महाबळेश्वर व्हायला हवे; ‘पण’.... यातील ‘पण’ आणि ‘परंतु’ हे शब्द जास्त महत्त्वाचे आहेत. हा प्रकल्प जाणीवपूर्वक निसर्गस्नेही तयार व्हायला हवा.
पर्यावरणप्रेमी पर्यटन केंद्रे ठिकठिकाणी स्थापन व्हायला हवीत. ‘निसर्गाचे संवर्धन’ हाच आपल्या उत्पन्नाचा आधार आहे, हे स्थानिकांना (यात आपण पण आलो) पटवून द्यायला हवे. माझ्या शेतात घुसणारे गवे, हत्ती, रानडुक्कर, बिबटे हे शेताचे जेवढे नुकसान करतात, त्यापेक्षा जास्त फायदा या प्राण्यांचे दर्शन मचाणावर पर्यटकांना बसवून मला होऊ शकतो, हे त्यांना समजायला हवे. कोसळणारे धबधबे पर्यटकांना दाखवून त्यांना न्याहारी आणि निवारा द्यायचा असेल, तर मुळात धबधबे हे भरून कोसळायला तर हवेत ना? सोन्याच्या अंड्यासाठी कोंबडी कापायला लागून कसे चालेल?
आपले सामर्थ्य हे येथील डोंगरदऱ्यांमध्ये आहे, त्याच्या सानिध्यात वाढलेल्या निसर्गात आहे. निसर्ग हीच आपली संपत्ती आहे, तिचे रक्षण आपण करायला हवे. हे ओळखणे महत्त्वाचे. निसर्गाचे रक्षण करताना त्यांचे देखील पोट भरायला हवे, हे सर्वांनी ध्यानात घेऊन पर्यटन धोरण आखायला हवे. डोंगरउतारावरील जमिनी विकणे म्हणजे हीच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापतो आहोत, हे या स्थानिक जनतेला समजावून द्यायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासन आणि स्वयंसेवी संघटनांनी स्थानिक जनतेपुढे पर्यटनाच्या निमित्ताने रोजगार निर्मितीच्या संधीचे विविध पर्याय ठेवायला हवेत. कोणतेही पर्यटन हे पर्यावरणाचा काहीअंशी ऱ्हास करणारे असते, हे नाकारण्याचे काहीच कारण नाही.
भारतामध्ये धार्मिक कारणासाठी पर्यटन सर्वांत जास्त चालते. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, साहसी क्रीडा प्रकारांसाठी पर्यटन आदी विविध पर्यटने आता येथे रुजायला लागली आहेतच. खिशात खळखळणारा पैसा, सहज उपलब्ध असणाऱ्या गाड्या, मोबाईल आणि गुगलसारख्या सोप्या संपर्क व्यवस्था, मुक्काम आणि जेवणखाण बघणाऱ्या प्रवासी कंपन्या, पर्यटनाचा आनंद द्विगुणित करणारी स्वस्त छायाचित्रण यंत्रणा आणि त्यांना प्रसिद्धी देणारी समाज माध्यमे आदी अनेक कारणांमुळे चैनीचे ‘वीकेण्ड पर्यटन’ आता फोफावले आहे. कुटुंब, नोकरी, शिक्षण यादरम्यान वाढत्या तणावापासून काही काळापुरती मुक्ती मिळवण्यासाठी तरुण वर्ग सुद्धा या ‘चैनी’च्या पर्यटनामध्ये अग्रेसर आहे. या सर्व निमित्ताने पर्यटन वाढते आहे आणि भविष्यात कैक पटीने वाढणार आहे.
संवेदनशील सुसंस्कृत पर्यावरणप्रेमींना सध्याचे ‘महाबळेश्वर-पाचगणी-कास- कोयनानगर’ अमर्याद पर्यटन पाहून यातना होत आहेत. निसर्ग पर्यटनाचे ‘फॅड’ सध्या फोफावते आहेच. हे सर्व हवेच; परंतु त्यांच्या संख्येवर मर्यादा असायला हवी. याच महिन्यात सध्या दिल्ली येथे युनेस्कोचे अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये कास, कोयना (सह्याद्री) आणि राधानगरी या वारसाहक्क स्थळांबाबत चर्चा होणार आहे. जून २०१२ मध्ये सह्याद्री (पश्चिम घाट) मधील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली अशी प्रातिनिधिक स्वरूपाची तब्बल ३९ ठिकाणे जागतिक नैसर्गिक वारसाहक्कामध्ये समाविष्ट झाली. त्यात सातारा जिल्ह्यातील कास पठार, कोयना- चांदोली व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश झाला.
काही निसर्गप्रेमींना आनंदाचे भरते आले, तर काहींच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. निसर्गाने बहाल केलेली संपत्ती ‘जगभरातील’ पर्यटकांपुढे खुली होण्याची ती एक सुरुवात होती. आज १२ वर्षांनंतर आपण या परिसरातील पर्यटनाबाबत फार पुढे गेलो आहोत; परंतु संवर्धनाबाबतीत मात्र मागे आहोत. आजही कास येथे ‘माहिती केंद्र’ सुरू झालेले नाही. हॉटेल्स मात्र बेफाम वाढली आहेत. तीनतीन मजली बांधकामे चालू आहेत. अगदी ‘जंगल में मंगल’ देखील चालू आहे. फटाके काय, डीजे काय, आरडाओरडा काय, निसर्गातील शांती बिघडवणे हाच एकमेव अजेंडा असल्यासारखे चालू आहे. पठाराला लागून हजार हजार माणसांची गर्दी बघून मन उद्विग्न होते.
मला तर कित्येक जणांनी विचारले, की वाढत्या पर्यटनाला काय करायचे? केवळ निसर्गपर्यटनच नव्हे, तर कोणतेही पर्यटन हे माझ्यामते ‘डोळस’ असायला हवे. निसर्ग भटकंती तर अधिक जबाबदारीची आणि संयमित असायला हवी. जसा भुंगा कमलपुष्पावर बसतो, मधमाशा फुलातील मध गोळा करतात, फुलपाखरे फुलांचे चुंबन घेतात, त्याचप्रमाणे निसर्गाच्या पोटातील रहस्ये टिपणारे; परंतु त्याचवेळी आपल्या अस्तित्वाची कोणतीही झळ निसर्गाला सोसायला न लावणारे पर्यटन असायला हवे. प्रत्येक स्थळासाठी वेगळी ‘पर्यावरणीय पर्यटन नियमावली’ करायला हवी आणि मगच सुसंस्कृत, डोळस पर्यटकांचे स्वागत करायला हवे. पर्यावरण साक्षर पर्यटकांना फक्त तिथे प्रवेश हवा. या कार्यात स्थानिक जनतेचा जास्ती सहभाग असायला हवा.
शिवारातून शहराकडे गेली काही दशके तरुणाई जात होती, तिला पुन्हा गावाकडे वळविणे हे या पर्यटनामुळे साध्य होणार आहे, हे आपण ओळखायला हवे. पर्यटकांना जे हौस-मौज करण्यासाठी हवे असते, ते न देता, त्याला बळी न पडता, फक्त स्थानिक आहार देणारी आणि साधी होम-स्टेची सुविधा असणारी न्याहारी-निवास केंद्रे असायला हवी. त्यांच्यासाठी फाइव्ह स्टार बांधकामे, सप्तखंडातील पदार्थ देणारी हॉटेले, प्रचंड आवाजाने धुराला उडवीत जाणारी वाहने येथे अजिबात नकोत.
स्थानिक निसर्गाला ओरबाडणारी यंत्रणा नको. पर्यटन हे दुधारी शस्त्र आहे. निसर्गाच्या संपत्तीला धक्का न लावता, पर्यटन वाढले तर स्थानिक जनतेसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामध्ये वनखात्याचे सहकार्य असायला हवे. स्थानिक जनतेमध्ये जागृती करताना संबंधित कायद्यांची त्यांना माहिती करून द्यायला हवी. जनतेकडूनच निसर्ग अबाधित ठेऊन मर्यादित पर्यटकांसाठी मूलभूत सुखसोयी देता येण्याची मागणी केली जावी आणि त्यासाठी, अर्थसाहाय्याच्या विविध योजना सरकारी खाती आणि पर्यटन विकास महामंडळाकडून केला जाणे गरजेचे आहे. काही विशिष्ट पर्याय मी वानगीदाखल देत आहे.
१) निवास आणि न्याहारी योजना- निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला स्वच्छ टॉयलेटस् असणारी साधी खोली आणि पिठलं-भाकरीचे स्थानिक पदार्थ असणारे जेवण अपेक्षित असते.
२) अभयारण्ये किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या प्रवेशकर आणि वाहन थांब्यांचे उत्पन्न स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे जमा करायला हवे.
३) स्थानिक तरुण कार्यकर्त्यांमधून पर्यावरण रक्षक आणि मार्गदर्शक तयार करावेत. त्यांना हंगामापुरता रोजगार निर्माण करता येतो.
४) पर्यटनस्थळी माहिती केंद्र असावे.
५) पुस्तके, पत्रके, सीडी, छायाचित्रे आदी माहितीपर वस्तूंची विक्री करणे.
६) वनोपज उत्पादनांची विक्री करणे.
सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम डोंगररांगेमध्ये स्थानिक जनतेमध्ये सर्वांत जास्त रोजगार निर्मिती ही साहसी पर्यटनामध्ये आहे, असे मला वाटते.
जंगलभ्रमंती, ट्रेकिंग, पर्वतारोहण, रॅपलिंग, क्लाइंबिंग, हायकिंग, रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग, माऊंटन सायकलिंग, माऊंटन बायकिंग, ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, बंगीजंपिंग, तंबू-कॅम्पिंग करणे, घळी, गुहा यांचा वेध घेणे, मॅरेथॉनसारख्या स्पर्धा.
सातारा जिल्हा हा मिनी भारत आहे. येथे असंख्य देवळे, तीर्थक्षेत्रे ही निसर्गात, डोंगरात, जंगलात देवारायात लपलेली आहेत. चकदेव, मल्लिकार्जुन पर्वत, नागेश्वर ही काही उदाहरणे. धार्मिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारी केंद्रे विविध ठिकाणी दृकश्राव्य माध्यमातून सुरू झाली, तर स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. गोव्यामध्ये लोटली येथे ‘अॅन्सेस्ट्रल गोवा’, कोल्हापूर येथील ‘कण्हेरी मठ’, सज्जनगडच्या पायथ्याला नव्यानेच सुरू झालेले ‘समर्थ दर्शन’ येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. जिल्ह्यात अनेक प्रकारे धार्मिक पर्यटनावर जोर देता येईल, अष्टविनायक यात्रासारख्या (समर्थ स्थापित) अकरा मारुती दर्शन यात्रा हे केवळ एक उदाहरण. सातारा जिल्ह्यात अनेक छोट्या-मोठ्या गुहा धार्मिक म्हणून श्रद्धेने स्थानिकांनी जपल्या आहेत. रामघळ, राजापूर घळ, मोरघळ, नागेश्वर ही केवळ काही उदाहरणे. सातारा जिल्ह्यात तीनशेपेक्षा जास्त जंगल ‘देवराया’ आहेत. डोळस पर्यटनाला येथे चालना मिळू शकते.
गेल्या दोन शतकांमध्ये रोजगार निर्मितीच्या नावाखाली जैवविविधतेने समृद्ध अशा घाटातील जंगलांचा नाश चहा-कॉफी यासारख्या ‘तथाकथित’ व्यापारी पिकांच्या लागवडीमुळे झाला आहे. सातारा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास हा मुद्दा स्ट्रॉबेरीसारख्या पिकाकडे जातो. स्थानिकांच्या शेतजमिनीवर घेण्यात येणाऱ्या पीक उत्पादनामध्ये पारंपरिकपणा असायला हवा. वनौषधींची लागवड करणे, हा एक मोठा पर्यावरणपूरक व्यवसाय ठरू शकतो. नरक्या ऊर्फ मॅपिया फिटीडा हे त्याचे उत्तम उदाहरण. शोभेच्या वनफुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करता येते, डेल्फिनियम ऊर्फ नीलांबरी हे फूल चांगले दोन-तीन आठवडे टिकते. अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसणारे हे फुलांचे तुरे पश्चिम घाटामधील डोंगर उतारावर डोलताना आढळतात. तेरडा ऊर्फ इम्पेशन्सच्या काही जातींची व्यापारी तत्त्वावर फूलशेती करता येईल. अनेक प्रकारच्या ऑर्किडच्या फुलांची शेती करता येईल. भारंगी, घोळ, तांदुळजासारख्या रानभाज्यांची लागवड करता येईल. करवंदे, जांभळे, तोरण, आंबोशीसारखी जंगली ‘रानफळे’ सुद्धा मोठे उत्पादन देऊ शकते.
सर्वात सुंदर आणि संपूर्णपणे पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे मधुमक्षिका पालन. पश्चिम घाटामध्ये हजारो वर्षे पारंपरिक पद्धतीने मध गोळा करणे चालू आहे; परंतु व्यापारी तत्त्वावर सुद्धा हे यशस्वी करून दाखवता येते. कारवीचा मध हा मोठ्या आवडीने औषध म्हणून वापरले जाते. बांबू, वेत, सागवान, आदी अनेक प्रकारची झाडे आजही स्थानिकांना रोजगार निर्माण करत आहेत. करवंदे, जांभळे यासारख्या जंगलामध्ये अनंत संख्येने येणारी फळे गोळा करून त्यांचा रस काढणे, जाम करणे, वाइन करणे हे सुद्धा विविध पर्याय यशस्वी ठरले आहेत. वन्यजीवांची शिकार आणि वनौषधींची तस्करी याला स्थानिक तरुण बळी पडतो आहे, हे दुर्दैव. सागवान, चंदन, शिसम, शिवण आदी वृक्षांच्या लाकडाचे सुद्धा फर्निचर आणि घरबांधणीसाठी वापर होतो. या संपूर्ण प्रदेशामध्ये पर्यावरणप्रेमी घरे बांधणे हा मोठा उद्योग स्थानिकांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो.
गावोगावी फिरून वनौषधी, स्वयंपाकाच्या पद्धती, पाणी साठविण्याचे प्रकार, आदी कित्येक वर्षांच्या जुन्या पुराण्या निसर्ग-मानव सहचार्याची उदाहरणे आधुनिक शास्त्राची जोड देऊन टिकवायला हवीत. यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग असणे अत्यावश्यक आहे. निसर्गातील हवामानाचे बदल, भूगर्भशास्त्र, प्राणी, कीटक, पक्षी, वनस्पती, फुले फळे, तापमानातील बदल, ओझोनवायूचा परिणाम, ‘एल निनो’ परिणाम आदी अनंत विषयांवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केंद्रे चालू करता येतील. त्यामध्ये स्थानिकांना सहभागी करून घ्यायला हवे. संवर्धन हे पारंपरिक पद्धतीने ही करता येते तसेच आधुनिक जैव तंत्रज्ञानाची मदत घेऊन ‘टिशू कल्चर’ पद्धतीने सुद्धा करता येते.
येणाऱ्या पर्यटकांबरोबर स्थानिक जनतेमध्ये निसर्ग आणि पर्यावरण शिक्षणाची आणि संवर्धनाची गोडी निमार्ण व्हायला हवी. सृष्टीतील सर्व घटक हे निसर्गचक्र चालवीत आहेत, त्यासाठी त्रास सोसत आहेत. माणसाने हीच सोशिकता शिकायला हवी. हाच संयम शिकायला हवा मग तो पर्यटक असो किंवा ग्रामस्थ असो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.