राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा : महायुती व मविआ यांचा उमेदवारीचा खेळ सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्रपणे माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) या मतदारसंघातून शड्डू ठोकणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून गावोगाव पिंजून काढला आहे.
याचा पुढील टप्पा म्हणून शनिवारी (ता. १७) फलटणमध्ये विजय निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे महायुती (Mahayuti) व मविआच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहेत.
लोकसभा निवडणुका (Loksabha Election) घेण्याबाबत प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. राजकीय पक्षांचीही निवडणुकीची बांधणी सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा बिगूल वाजणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा जवळ आली असली, तरी जिल्ह्यामध्ये महायुती, मविआतील कोणत्या घटक पक्षाकडे कोणती जागा जाणार? याबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही. सर्वच पक्ष जागांवर दावा ठोकत आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सातारा तसेच माढ्यातूनही कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल, याबाबत संभ्रम आहे. माढ्यामध्ये तर भाजपचा विद्यमान खासदार असताना महायुतीमधील अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या उमेदवारीसाठी दंड थोपटला आहे. मविआमध्ये राष्ट्रवादीतून कोण? हे अद्याप ठरलेले नाही.
कोणत्या पक्षाच्या पारड्यात उमेदवारी पडणार, हे अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी कोणत्याच पक्षातील उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
माढा मतदारसंघांमध्ये पक्षाची बांधणी करण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर मतदारसंघातील फलटण, माण, माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला या सहा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची निवड करण्यात आली होती. त्यातील फलटण व माण मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे सातारा जिल्हा प्रभारी अजित पाटील यांच्याकडे देण्यात आली होत. त्यांनी व अन्य चार समन्वयकांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात घोंगडी बैठका घेऊन ग्रामस्थांपर्यंत पक्षाची भूमिका पोचविली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघनिहाय बूथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच त्यांनी माढ्यातूनच निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. माढा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार हे माढ्यातून उभे राहिले होते. त्या वेळी जानकरांनी विरोधात उभे राहून सुमारे एक लाख मते घेतली होती.
गावपातळीवरील बांधणी पूर्ण झाल्याने पक्षाने शनिवारी फलटण येथे माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त शिंगणापूर येथील शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. शिंगणापूर-कोथळे- जावली- मिरडे- वडले- सोनवडी- सोनवडी बुद्रुक- कोळकीमार्गे ही रॅली मेळाव्याच्या ठिकाणी पोचणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.