भिलार (जि. सातारा) : पाचगणी या पर्यटनस्थळांवर पाण्यासाठी लोक टाहो फोडत असताना दुसरीकडे मात्र, समस्या सोडवण्यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये हमरीतुमरी होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली. हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात कार्यालयाच्या कारभाराची चर्चा सुरु आहे.
गेले चार दिवस पाचगणीमधील एका भागात पाणी न आल्याने नागरिकांनी तक्रारींचा पाढा कार्यालयात वाचला; परंतु या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी वरिष्ठ अभियंता आणि कर्मचारी यांच्यात तू तू मै मै होऊन वादाला तोंड फुटले. एकमेकांतील वाद विकोपाला जाऊ लागला. एकमेकांवर धावून जाण्याच्या भाषा होऊ लागल्या आणि शेवटी कार्यालयातील खुर्च्या एकामेकांच्या अंगावर फेकून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यानिमित्ताने पाचगणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून पळापळ करावी लागत आहे. भरमसाट बिले, अवाजवी रीडिंग, पाण्याची बोंबाबोंब यामुळे पाचगणीमधील ग्राहक अक्षरशः या कारभाराला वैतागले आहे. त्यातच अशा घटनांमुळे कार्यालयातील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याने याबाबत कार्यालय व अधिकाऱ्यांची नाचक्की होत आहे.
Video पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ
याबाबत ग्राहकांनी मात्र या घटनेचा वेध घेत ग्राहकांना वेळेवर पाणी देण्याचे काम असताना ते काम बाजूला ठेऊन अशी वादावादी करून उलट ग्राहकांना हे अधिकारी आणि कर्मचारी वेठीस धरत आहेत. त्यामुळे अशा भांडखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करावा अथवा बदली करून चांगले कर्तव्यनिष्ठ कर्मचारी पाठवावेत, अशी मागणी ग्राहक राजू काकडे यांनी केली आहे.
याबाबत संबंधित अभियंत्यांना विचारले असता त्यांनी ही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे; परंतु कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मी कर्मचारी आहे. अधिकाऱ्यांनी मला कामाव्यतिरिक्त कसेही बोलणे योग्य नाही. याबाबत मी माझ्या वरिष्ठांना लेखी माहिती देत असल्याचे सांगून या घटनेला दुजोरा दिला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कसलीही तक्रार नोंद नाही.
'स्वाभिमानी'ने राेखला सातारा -पंढरपूर महामार्ग; पाेलिसांकडून आंदाेलकांची उचलबांगडी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.