सातारा : हर हर महादेव या जय जयकारात आज (गुरुवार) जिल्ह्यातील विविध महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. काेराेनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. काही मंदिराच्या गाभा-या बाहेर शंकराची मुर्ती ठेवून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली हाेती. भाविक दर्शन घेऊन काेराेनाचे संकट टळू दे असे साकडे देवाला घालत हाेते.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करावा असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना काढला हाेता. त्यानूसार जिल्ह्यातील सर्व मंदिरामंध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम तेही छाेट्या स्वरुपात करण्यात आले. येथील काेटेश्वर मंदिर, संगम माहूली , लिंबचे काेटेश्वर मंदिर आदी ठिकाणी देवदर्शनासाठी येणा-या भाविकांना सामाजिक अंतराचे पालन करावे अशा सूचना करण्यात येत हाेत्या. तशाच पद्धतीने रांगा लावण्यात आल्या. एकावेळी फक्त 20 भाविकांना दर्शनासाठी साेडण्यात येत हाेते. भाविक मास्कचा वापर व सामाजिक अंतराचे पालन करुन शंकराचे दर्शन घेत हाेते. यावेळी शंकराच्या जयघाेषाने मंदिर परिसर दुमदुमन जात हाेता. भाविक दर्शन घेऊन काेराेनाचे संकट टळू दे असे साकडे देवाला घालत हाेते. शाहूपूरी नजीकच्या शिव मंदिरात सेवेकरी महादेवा काेराना जाऊ दे...काेराेना जाऊ दे...महादेवा काेराेना जाऊ दे... असे वारंवार साकडे घालताना दिसत हाेता. दरम्यान जिल्ह्यातील ज्या शंकराच्या मंदिरात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असते तेथील मंदिर व्यवस्थापनाने मंदिर बंद ठेवण्याच निर्णय घेतला हाेती. त्याची अंमलबजावणी केली जात हाेती.
नागनाथवाडीतील मंदिर बंद
बुध : क्षेत्र नागनाथवाडी (ता. खटाव) येथील श्री नागनाथाचे प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नागनाथ सेवा विकास मंडळ, गुरव संघटना व पुसेगाव पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या इतिहासात प्रथमच महाशिवरात्रीला देऊळ बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण लॉकडाउनमध्ये हे मंदिर बंद होते. मिशन बिगीन अगेननंतर ते पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बबन पाटणकर यांनी दिली.
कोयनेतील तीनही स्वयंभू शिवस्थाने बंद
कास : कोयना नदीच्या शिवसागर जलाशय क्षेत्रातील वासोटा किल्ल्याजवळचे नागेश्वर, कांदाटी खोऱ्यातील पर्वत तर्फ वाघावळे येथील जोम मल्लिकार्जुन व चकदेव येथील चौकेश्वर महादेव ही सर्व स्वयंभू महादेवाची स्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा, जत्रा इत्यादी धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणी केल्याचे सांगण्यात आले.
श्री सिद्धनाथ मंदिरातील भुयार बंद
म्हसवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सिद्धनाथ मंदिराच्या भुयारातील स्वयंभू शिवलिंग बंद ठेवण्यात आले आहे. देवस्थान मंदिर ट्रस्टने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा आदी राज्यांतील असंख्य भाविकांचे कुलदैवत असलेल्या व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या दहाव्या शतकातील हेमाडपंथी मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग वर्षातून एकदा फक्त एक रात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्री भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.
मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून शासकीय आदेशानुसार आज येथील सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाशिवरात्रीला स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात येऊ नये, असे आवाहन श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट व मंदिर प्रशासनाने यांनी केले हाेते. त्यास ग्रामस्थ प्रतिसाद दिल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले.
अभिमानास्पद! एकाच कुटुंबातील सहा बहिणी पोलिस खात्यात: वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.