Mangal Prabhat Lodha sakal
सातारा

Mangal Prabhat Lodha : लोढांमुळे भाजप बॅकफूटवर

मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्रा सुटकेशी तुलना

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : शिवप्रतापदिनाच्या मुख्य सोहळ्यात राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रा सुटकेच्या घटनेशी केल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी याच मुद्यावरून धारेवर धरल्याने भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोढा म्हणाले, ‘‘औरगंजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे स्थानबद्ध करून ठेवले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली व त्यानंतर त्यांनी स्वराज्य व हिंदूराष्ट्र स्थापन केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील नुकतीच आपली सुटका करून हिंदुत्ववादी विचारांचे सरकार स्थापन केले. औरंगजेबाने शिवरायांना रोखले; त्याचप्रमाणे शिंदे यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला; पण त्यांनी आपली सुटका करून घेतली. शिंदे हेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले.’’

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून, मंत्री लोढा यांच्या आजच्या वक्तव्यावरूनही राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मुंबईत परतलेल्या लोढा यांनी सारवासावर केली. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत. आम्ही सर्व इथे खाली आहोत. मग, त्यांच्याशी कुणाची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल? मी तर कधीच करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या विधानाचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्याविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

येथून पुढे भाजप, आरएसएस किंवा कोणीही शिवाजी महाराजांचा अपमान केला तर बुक्क्यांशिवाय पर्याय राहणार नाही. याद राखा, शिवाजी महाराजांची तुलना फितुरांसोबत करणार असाल तर ही अत्यंत निंदणीय गोष्ट आहे.

- मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांना शिवरायांचा इतिहास माहिती नसेल तर बोलले कशाला?

- छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

लोढा यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. केवळ मोठमोठ्या इमारतीच त्यांनी उभारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलणाऱ्या लोढा यांना भाजप नेत्यांचे बळ आहे. या लोकांना महाराष्ट्र माफ करणार नाही.

- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

‘गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण’

प्र तापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तत्काळ दिला जाईल. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. शिवकालीन गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतागड (ता. महाबळेश्वर) येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजवंदन केले. त्यानंतर भवानीमातेची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, भरत गोगावले, मकरंद पाटील, महेश शिंदे, महादेव जानकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्यकलेची उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तत्काळ दिला जाईल. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून प्रतापगडावरील अतिक्रमण जसे हटविण्यात आले आहे, त्याचप्रमाणे राज्यातील इतर किल्ल्यांवर असलेले अतिक्रमणदेखील हटविण्यात येईल. महाराजांचा इतिहास हा प्रेरणा देणारा आहे, याचे जतन करणे हे आपले काम आहे. हे राज्य सर्वसामान्य लोकांचे राज्य हे मी कामातून दाखवून देणार. विरोधक टीका करतात. परंतु, टीका करणे हे त्यांचे काम आहे. अशा टीकेला मी कामातून उत्तर देत असतो. मी काम करणारा आहे. मी गावी आलो तर, शेती करतो. परंतु, मला येताना हेलिकॉप्टर आणावे लागते यावरूनदेखील टीका होते. हेलिकॉप्टरमध्ये बसून शेती करणारा शेतकरी, अशी टीका केली जाते. शेतकरी याचा मुलगा हेलिकॉप्टरमध्ये बसू शकत नाही का, असा सवालदेखील शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. आज सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भवानीमातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोड्शोपचार पूजा बांधण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली. भवानीमातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्याचे ध्वजवंदन कुंभरोशीच्‍या सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजतगाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे लेझीम-तुताऱ्या, ढोल-ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचा लढा गेली वीस वर्षे लढणारे सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे हे या सोहळ्‍यासाठी साडेसातशे मावळे घेऊन आले होते. सर्व मावळ्‍यांच्या डोक्यावर भगवी टोपी होती व त्यावर शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन असे लिहिले होते. हे मुक्ती आंदोलन उभे करणारे माजी आमदार नितीन शिंदे यांचा खास प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तर माजी आमदार नितीन शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे, पर्यटनमंत्री लोढा, पालकमंत्री देसाई व अतिक्रमणाची कारवाई करणारे सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा अफजलखान वधाचे चित्र असलेले स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मान केला.

याप्रसंगी साहसी खेळ झाले. पोवाडे गायन झाले. अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थिनी शाहीर पियुषी भोसले हिने शिवप्रतापदिनाचा पोवाडा सादर करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अपंगत्वावर मात करून पियुषी हिने पोवाडा गायन कलेत प्रावीण्य मिळविले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे खास शब्दात कौतुक करून तिचा विशेष सत्कार केला व तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

आग्रा येथून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले होते, त्यांनी स्वराज्य स्थापन केले नसते तर आताचे हे जे तुलना करणारे आहेत ते कोठेतरी कुर्निसात करत बसले असते.

- उद्धव ठाकरे, प्रमुख, ठाकरे गट

ज्यांना महाराष्ट्र ‘गद्दार’ आणि ‘खोके सरकार’ म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत महाराजांची तुलना करणे, हा काही चुकून आलेला शब्द नाही. हे पूर्णपणे नियोजित आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करावे हे या सरकारचे आणि पक्षाचे नियोजन दिसते. राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तुस्थिती लोकांसमोर आलेली आहे.

- आदित्य ठाकरे, युवासेनेचे नेते

राज्यपालांसह अगदी दिल्लीतील भाजपचे नेतेही छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत अवमान करीत आहेत. अशा घटना लोक विसरणार नाहीत. लोढा यांच्या प्रकरणात भाजपने माफी मागावी.

- बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते

वाचाळविरांना आवरा हे मी सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चुका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागले आणि बोलले पाहिजे याचे भान असायला हवे.

- अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT