देवाच्या कृपेमुळे व जनतेच्या आशीर्वादामुळे यमालाही माघारी जावे लागले.
बिजवडी : माणच्या उत्तरेकडील उर्वरित 32 गावांनाही पाणी दिल्याशिवाय आपण निवडणूक लढवणार नाही, हा जनतेला दिलेला शब्द माझ्या लक्षात आहे. जिहे-कटापूरचे पाणी आणण्याचे सर्व नियोजन झाले आहे. आम्ही वाट पाहतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वेळ देऊन फक्त एक बटण दाबले, की जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणात येईल, असं आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सांगितलं.
येत्या पंधरवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आपण वेळ घेतली असून, जिहे -कठापूरचे पाणी माणच्या उत्तरेकडील गावांना देण्याचा भूमिपूजन सोहळाही लवकरच घेत या भागातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोरे यांनी केले.
बिजवडी (ता. माण) येथे अक्षता ट्रेडर्सचा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अंकुश गोरे, अरुण गोरे, हरिभाऊ जगदाळे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय भोसले, अक्षय महाराज भोसले, वैशाली वीरकर, संजय दा. भोसले आदी प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, ''माण- खटाव तालुक्यातील जनतेचा पाणी हा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न होता. या भागात उसाचे एक कांड पिकत नव्हते. आपण आमदार झाल्यापासून पाण्याचा प्रश्न सोडवला. आता मतदारसंघात चार कारखाने सुरू आहेत. पाचव्याचे काम सुरू आहे. आज 102 गावांना कालव्याचे पाणी जातेय. आघाडी सरकार नसते तर आज जिहे- कटापूरचे पाणी या भागात असते. मात्र, जिहे- कटापूर कामाचे टेंडर आघाडी सरकारने अडीच वर्षे लांबवले. टेंडर न काढल्यामुळे पैसे माघारी गेले.''
अधिवेशनात या विरोधात आवाज उठवून माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून एक महिन्याच्या आत टेंडर काढतो, म्हणून आश्वासन घेतले. टेंडर जाहीरही झाले. मात्र, याचे श्रेय गोरेंनाच मिळेल, म्हणून जलयुक्त शिवारच जनक म्हणवून घेणाऱ्यांनी हे टेंडर रद्द करण्यासाठी काम केले. या योजनेतून माणच्या उत्तरेकडील उर्वरित बिजवडी, तोंडले, टाकेवाडी, थदाळे, शिंगणापूर आदी १४ गावांनाही पाणी दिल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही. त्यामुळे विरोधकांनी पाण्याची काळजी करू नये, तुम्हाला जिहे- कठापूरच्या पाण्यात लवकरच अंघोळ घालू, असंही गोरे म्हणाले. या वेळी संजय भोसले, मामूशेठ वीरकर यांचीही भाषणे झाली. प्रतीक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. अमित भोसले यांनी आभार मानले.
फलटणमधील स्मशानभूमीच्या बाजूला माझा अपघात झाला. त्या वेळी अनेकांचे वेगळे विचार सुरू झाले. आमदार आता काय यातून वाचत नाही. निवडणूक लागेल. मग अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली; पण देवालाही माहिती होत, की अजून जयकुमारला जनतेची कामे करायची राहिलीत. त्यामुळे देवाच्या कृपेमुळे व जनतेच्या आशीर्वादामुळे यमालाही माघारी जावे लागले, असे गोरे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.