या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळसारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सातारा : पैशांचा पाऊस (Rain of Money) पाडून देतो, अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास (Kaka Maharaj Poladpur) सातारा पोलिसांनी (Satara Police) स्वतः पुढाकार घेऊन अटक केली. या प्रकरणात मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे, असा संशय आहे. त्यामुळे भोंदुगिरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
पैशांचा पाऊस ही अंधश्रद्धा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये, तसेच या प्रकरणात फसवणूक झालेले कोणी तक्रारदार असल्यास त्यांनी पोलिस अथवा अंनिस (Andhashraddha Nirmoolan Samiti) कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे.
पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगत लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो, अशा भूलथापा देऊन काही मांत्रिक लोकांना लाखोंचा गंडा घालत आहे. फसव्या विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हातचलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे अशाच प्रकारची फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मांत्रिकाने विष देऊन संपवले होते.
या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळसारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादूटोणाविरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा, तसेच पोलिस अधीक्षक समीर शेख यांना अंनिसचे शिष्टमंडळ भेटून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी जिल्हाव्यापी पोलिस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी करणार असल्याचेही डॉ. दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील वाईमध्ये काही दिवसांपूर्वी गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता. पाटणमध्ये देखील दोन वर्षांपूर्वी नरबळीची घटना झाली होती. पाटणमधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी चालते. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे आवश्यक असल्याचे मत डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, वंदना माने यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.