MP Sharad Pawar esakal
सातारा

'राज्य चुकीच्या माणसांच्या हातात, महाराष्ट्राला योग्य दिशा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा इशारा

MP Sharad Pawar : आतापर्यंत जे झाले ते झाले, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. त्यासाठी एकेकाळी माझ्यासारखी व्यक्ती काँग्रेसमध्ये होती.

सकाळ डिजिटल टीम

यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींची समजूत घातली. इंदिरा गांधींनी जवाहरलाल नेहरूंची समजूत घातली आणि मराठी लोकांचे राज्य झाले.

कोळकी : फलटणच्या भागात उद्योग कसा उभा करायचा, हे आम्ही दाखवून दिले आहे. आता फलटण नव्हते, तर संपूर्ण राज्याचा विचार करायला हवा. सध्या चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता असून, एका बाजूला महिला, मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्यकर्ते मुली व महिलांच्या संरक्षणासाठी कमी पडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. राज्य चुकीच्या माणसांच्या हातात आहे. ही स्थिती बदलायची आहे. महाराष्ट्राला योग्य दिशा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केला.

फलटणचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर (Sanjivraje Naik- Nimbalkar), आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, सुभद्राराजे नाईक- निंबाळकर, प्रतिभा शिंदे, अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी आज आपल्या समर्थकांसह कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, उत्तमराव जानकर, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. #ElectionWithSakal

शरद पवार म्हणाले, ‘‘माळेगाव असो, अन्य कारखानदारी असो या कारखानदारीचा पाया मालोजीराजे निंबाळकरांनी घातला आहे. त्याकाळी सरकारी काम असले, की आम्ही फलटणला यायचो. महाराज साहेबांना भेटायचो. आतापर्यंत जे झाले ते झाले, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. त्यासाठी एकेकाळी माझ्यासारखी व्यक्ती काँग्रेसमध्ये होती. महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळीत फलटणमधील हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले. लोकांना मराठी भाषिकांचे राज्य हवे होते. ते राज्य झाले, यशवंतराव चव्हाणांसारखा नेता महाराष्ट्राला मिळाला. या चळवळीचा इतिहास पाहिला, तर त्यांना मुख्यमंत्रिपदावर नेण्यात फलटणच्या राजेसाहेबांनी ठराव मांडला होता. यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींची समजूत घातली. इंदिरा गांधींनी जवाहरलाल नेहरूंची समजूत घातली आणि मराठी लोकांचे राज्य झाले. यशवंतराव चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदात फलटणकरांचे योगदान कधी विसरू शकत नाही.’’

आता निंबाळकरांच्या नवीन पिढीने काम हाती घेतले आहे. संजीवराजे व त्यांचे सगळे जिवाभावाची हजारो सहकारी असोत त्यांनी भूमिका कायम ठेवली आहे. चिंता करू नका, ९८ टक्के लोक मागे आहेत. एक जण (रामराजे) दिसत नाहीत. चिंता करू नका. त्यांची मानसिकता काय आहे, हे पाहा. धैर्यशीलच्या निवडणुकीवेळी ते लक्षात आले. धैर्यशील मोहिते- पाटलांना मोठ्या मतांनी निवडून देशाच्या राजकारणात पाठविले. त्याबद्दल मी अंत:करणापासून धन्यवाद व आभार मानतो. आता महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा. सर्वसामान्यांच्या की आणखी कोणाच्या, हे ठरविण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

MP Sharad Pawar

जयंत पाटील म्हणाले, ‘‘फलटण मतदारसंघात तुतारीच्या उमेदवाराला जास्तीतजास्त मतांनी निवडून आणा. तुमच्यावर किती अन्याय झालाय, कार्यकर्त्यांना किती त्रास झालाय. पोलिसांचा वापर किती टोकांचा झाला आहे? याची कल्पना आहे. एमआयडीसीसाठी एक हेक्टरला एक कोटी देणारे अजून मोबदला दिला नाही. लाखांची भरपाई आणि घोषणा कोटीची आहे. भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरण्याची बुद्धी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पूर्ण बदल कराल. फलटणसह खटाव, माणची जागाही निवडून आणण्याचे काम करा.’’

उत्तमराव जानकर म्हणाले, ‘‘आम्ही ज्यांना निवडून दिले त्यांनी अन्याय अत्याचार केला. एखाद्याच्या हातात सत्ता मिळाली, त्या माध्यमातून कोणाचे घर पेटवावे, त्यातून त्यांनी आपल्याच घराच्या आजूबाजूची घरे पेटवली आणि स्वत:च्या घराची राख करून घेतली. फलटण तालुक्यात त्यांनी धुमाकूळ चालवला होता. मोहिते- पाटलांच्या घरातील उमेदवारी ठरल्यानंतर मीही त्यांच्यासोबत राहिलो. येथील उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू.’’

अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘आजचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. देशाची परिस्थिती बिकट आहे. या सरकारला जागा दाखवायची वेळ आली आहे. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. विविध योजना आणून सरकारी तिजोरीवर होळी करायला चालली आहे. महाराष्ट्र पुन्हा घडवण्याची वेळ आली आहे.’’दीपक चव्हाण म्हणाले, ‘‘आपण का, कशासाठी गेलो, याची सर्वांना कल्पना आहे. गेल्या दीड वर्षात आपला अनुभव चांगला नव्हता. विरोधकांच्या दहशतवाद, गुंडगिरीला सामोरे जात होतो. विरोधी नेतृत्वाला राज्याच्या भाजपच्या पातळीवरून ताकद दिली जात होती. आपल्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविले जात होते. संसार उद्ध्वस्त करण्यासाठी ताकद दिली जात असेल, तर महायुतीत राहून उपयोग काय?’’

खासदार धैर्यशील मोहिते- पाटील म्हणाले, ‘‘जनता हुशार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे राहतील, त्यांना विधानसभेत पोचवायचे आहेत. मला माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील जनतेचे आभार मानायचे आहेत. तुम्ही मोठे मन दाखवले, साहेबांकडे आग्रह धरला. त्यामुळे मी विजयी झालो. आगामी काळात नीरा देवघर, कोरेगावचा पाणीप्रश्न, पंढरपूर रेल्वे मार्ग हे मोठे प्रकल्प मार्गी लावणार आहे. माझ्या निवडणुकीला संजीवराजे निंबाळकर यांची अदृश्य शक्ती सोबत होती. आता ही शक्ती उघड-उघड आपल्या सोबत आली आहे. आता आपण सगळे मिळून काम करून शरद पवार यांचे हात बळकट करूया.’’ प्रास्ताविकात संजीवराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. अस्तित्व, स्वाभिमान राखायचा असेल, तर महाराष्ट्राला तसेच देशाला शरद पवारांच्या विचाराशिवाय पर्याय नाही.’’

शरद पवार म्हणाले...

  • लोकसभा निवडणुकीनंतरच तुम्हाला बहीण का आठवली?

  • कमिन्स कंपनीसाठी रामराजेंचे योगदान

  • शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त होतो, कारण त्या पुतळ्यातही त्यांनी भ्रष्टाचार केला. सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार करणे ही आजच्या राजकारण्याची नीती आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेणे आवश्यक आहे. ते काम आपल्याला करायचे आहे.

MP Sharad Pawar

म्हणून आपला राम दिसत नाही...

जयंत पाटील म्हणाले, ‘‘भाजपमध्ये राम राहिला नाही. जिथं जिथं रामाची मंदिर आहेत, तिथं तिथं भाजप उमेदवाराचा पराभव झाला. रामानेच भाजपचा पराभव केला. मग आमचा राम तिकडं कसा राहिलाय, असा प्रश्‍न आम्हाला पडायचा; पण परत योग्य ठिकाणी आपला राम यायला लागला आहे.’’ देव कधी आपल्याला दिसत नसतो. तसाच आपला रामही आज व्यासपीठावर दिसत नाही, असे म्हणताच एकच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT